Thursday, January 5, 2012

चॉईस इज हेल

 मूळ प्रकाशन: मायबोली १ ऑक्टोबर २०११ (http://www.maayboli.com/node/२९४७७)

सोळा - सतरा वर्षांची असताना मी कुठेतरी "चॉईस इज हेल" हे वाक्य वाचलं होतं. तेव्हा त्यावर मी, "श्शी! काऽही काय!" अशी प्रतिक्रिया दिल्याचं मला चांगलंच आठवतंय. पर्याय हा माणसाचा शत्रू कसा असू शकेल? तेव्हा आई-बाबांच्या घरात राहणारी, अगदी कडक नसली तरी शिस्तप्रिय घरात वाढलेली, मैत्रिणींच्या रिंगणात वावरणारी अशी मी या वाक्याचा पूर्ण अर्थ समजू शकले नव्हते कदाचित. त्यामुळे या लेखकाचं काहीतरी बिनसलंय असं कनक्लूजन मी काढून रिकामी झाले. समोर असे ए, बी, सी, डी पासून ते अगदी झेड पर्यंत पर्याय हवेत असं माझं ठाम मत होतं. त्यामुळे खूप पर्याय असलेल्या आयुष्याच्या वळणाची मी आतुरतेने वाट बघत होते. ते वळण मला अमेरिकेतल्या ग्रोसरी शॉप्स मध्ये गवसलं. आणि आपण इतके दिवस इतक्या भ्रमात का वावरलो याचा खूप मोठा पश्चाताप झाला. साधा केक करायचा होता मला. भारतातली दुकानं कशी केक-फ्रेंडली नाहीत यावर मी खूप टकळी वाजवून आले होते.
मी: आई, भारतात चांगलं बटर मिळत नाही गं!
तिनी लग्गेच घरातलं लोणी दाखवलं.
आई : सई, जगात सगळीकडे मिळणारं बटर गोमातेच्या उदरातून अशाच रूपात येतं. त्यामुळे हे लोणी तू ३०० डिग्रीला नेलस तर तुझ्या परदेशी बटरचंच काम करेल.
तेव्हापासून (विनापर्याय, आज्ञेवरून) घरातल्या लोण्यातच केक करण्यात आले.
मी: आई रॉ शुगर यु नो.
आई: कनक गूळ *सणसणीत कानाखाली*
मला हवं तसं कुकिंग चॉकलेट मिळत नव्हतं म्हणून मी कोको पावडर आणि कुठून तरी उत्पन्न झालेलं इंडसट्रीयल ग्रेडचं चॉकलेट मिसळून मस्त फ्लेवर तयार केला. आणि ऑरेंज लीक्युअर वगैरे नखरे नसल्यामुळे सरळ झाडावरून आलेली मोसंबी आणि त्याची साल वापरली. झाला चॉकलेट-ऑरेंज केक! बाबांनी मुलीला केक करायला म्हणून कौतुकाने ब्रॅन्डी आणून दिली (निषेधार्थ काळ्या पिशवीतून मिळणारी). त्यातही असं बागेत फिरल्यागत दारू सेक्शनमध्ये बागडता न आल्याचा राग मला होताच!
तोच केक इथे करताना पहिल्या स्टेपलाच दहा पर्याय.
बटरमध्ये सॉल्टेड, अनसॉल्टेड, लो फॅट, नो फॅट, फुल फॅट, युरोपिअन (त्यात अॅमस्टरडॅमहून आलेलं उगीच फेटा बांधून वेगळं), बटरसारखं दिसणारं पण बटर नसणारं, बटर नसणारं पण बटरपेक्षा वाईट असणारं, तेलही नसणारं आणि तूपही नसणारं पण तरीही कुणालातरी हवं असणारं असे कैक प्रकार! हे सगळं बघता बघता पहिल्या दिवशी माझी बस चुकली. पुढच्या वेळेसाठी मी माझ्या फोनमध्ये दुकानात ज्या जागी मला हवं असलेलं बटर ठेवलाय त्याची जी पी एस नोंद केली.
चॉकलेटमध्ये ५० %, ६० %, ७० %, ८० % कोको अशी वर्गवारी असते. त्यात प्रत्येक ब्रँडचे पुन्हा हे सगळे पर्याय. त्यानंतर सेमिस्वीट, बिटर, स्वीट, असे कटू-गोड पर्याय येतात. आणि शेवटी कुठलं चॉकलेट घेतल्यानी आपण जास्तीत जास्त बचत करू (आणि न लागणारी वस्तू घेतल्याचा पश्चाताप बचत केली या खोट्या आनंदानी झाकून टाकू) हा एक अपरिहार्य पर्याय. मग चॉकलेटच्या रॅकसमोर, इतका सगळा विचार केल्यानी भूक लागते आणि त्या नादात चीप्सचं एक पाकीट बास्केटमध्ये शिरतं. सगळ्यात जास्त संताप मला तेव्हा येतो जेव्हा मी माझं समजून तसंच दिसणारं दुसरं काहीतरी उचलून आणते. जसं की ६० % कोको ऐवेजी ८० % कोको वालं चॉकलेट. त्यामुळे माझे साखरेचे अंदाज चुकतात आणि मला भयानक वगैरे मनस्ताप होतो. हे हमखास मी कुणालातरी "मी उद्या तुझ्यासाठी केक आणीन" असं आश्वासन दिलेलं असताना घडतं.
ऑरेंज हे फळ सुद्धा इतक्या पर्यायात येतं की हुंदका आवरत नाही. लोकल विरुद्ध स्पेनहून उडून आलेली वालेन्सिया. त्या इम्पोर्टेड फळांच्या कार्बन पाऊलखुणा (फूटप्रिंट) लोकलपेक्षा किती मोठ्या आहेत हा विचार करायचा आणि मग मनातल्या शास्त्रज्ञाचं ऐकायचं की ती फळं ज्या बुडून चाललेल्या देशातून उडून आलीयेत त्या देशाचा माणुसकीने विचार करायचा याचा विचार. एवढ्या सगळ्या विचारानंतर ते फळ उतरलेलं असेल तर कुणाच्या डोक्यावर मारायचं याचा विचार! आणि नुसतच सिट्रस असं काहीतरी हवं असेल तर अल्लाह मलिक! कारण इथे सिट्रस फळांचे इतके पर्याय आहेत की मला केशरी रंगाचं काहीच नको म्हणायची वेळ येते!
अंडी सुद्धा उडणा-या कोंबड्यांची विरुद्ध बंदिस्त कोंबड्यांची. ऑरगॅनिक विरुद्ध इनऑरगॅनिक ! स्मित
फायनली मुक्त विहार उपलब्ध असलेल्या दारू सेक्शन मध्ये केकसाठी रम आणायला जावं तर रमचेही इतके प्रकार की त्यावर अभ्यास करण्यापेक्षा एखादी बाटली इथेच मारून खरेदीचा सगळा ताण तरी घालवावा नाहीतर सरळ लॅब मधलं अब्सोल्यूट अल्कोहोल आणावं अशी हालत होते!
ऑस्ट्रेलियात असताना एकदा मी एका रोमेनियन काकूंना भेटले होते. त्यांनी कम्युनिस्ट राजवट संपल्याचं फार मार्मिक वर्णन केलं होतं. "जेव्हा आमच्याकडे कम्युनिझम होतं, तेव्हा सगळ्यांकडे नोक-या होत्या आणि पैसे होते. पण बाजारात पैसे देऊन विकत घ्यायला वस्तू नव्हत्या. आता लोकशाहीत (खुल्या बाजारपेठेत), बाजारात पैसे देऊन विकत घेता येण्यासारख्या खूप छान छान वस्तू आहेत, पण आमच्याकडे ना नोक-या आहेत, ना पैसा!" स्मित
कधी कधी खरंच, "माझ्याकडे पर्याय नाही" म्हणणारा आणि "माझ्याकडे खूप पर्याय आहेत" म्हणणारा, दोघे एकाच पायरीवर येतात. त्या पायरीची जादू वेगळीच आहे. एकाला आपण काय काय करू शकलो असतो, पण करू शकलो नाही याचं दु:ख तर दुस-याला आपण इतकं काही करू शकत होतो, पण आपण योग्य पर्याय निवडलाय का, याची हुरहूर. एकाच्या हाती न मिळालेल्या रस्त्यांचा नकाशा, तर दुस-याकडे आपण नक्की कुठे चुकलो, हे शोधण्याचं मायाजाल. आणि आयुष्याच्या मोठ्या निर्णयांमध्ये या दोन बाजू जरी टोकाच्या वाटल्या तरी त्या जी असहायता निर्माण करतात, ती सारखीच आहे. कधी कधी जगाचा विचार करताना (हो आम्ही असलेही विचार करतो! पण इथे "जगाचा विचार" हे भोचक संप्रदायातील रूपक लागू नाही) असं वाटतं की अर्धं जग बंधनांमुळे स्वतंत्र आहे आणि अर्धं स्वातंत्र्यानी बांधलेलं आहे! काही लोकांना या दोन्ही बाजू अनुभवता येतात. आणि जरी तो अनुभव थोडा अवघड असला, तरी अशा दोन बाजू अस्तित्वात आहेत हे समजण्यातसुद्धा एक छोटीशी शांती आहे. स्मित

No comments:

Post a Comment