Friday, February 10, 2012

एलोडी

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार असं काहीतरी आजोबा मला नेहमी ऐकवतात.
यात  उगीच कुठल्यातरी सभेत माझ्या अंगात भूत संचारलय असं चित्र माझ्या मन:चक्षूत  (वा वा. मस्त पुणेरी शब्द सापडला!) तयार होतं. पण देशाटन केल्याचे बरेच फायदे आहेत. आणि जरी प्रत्येक मित्र "पंडित" या क्याटेगिरीत मोडत नसला (मास्तर मोडला तरी नशीब), तरी अंतरराष्ट्रीय मैत्री फार फार उपयोगी पडते. माझी इकडची  पट्टमैत्रीण एलोडी हल्ली माझ्या आयुष्यात प्रभावशील झाली आहे. एलोडी मूळची फ्रेंच. तिनी फ्रान्समध्ये पी.एच.डी पूर्ण केली आणि आता माझ्या लॅबच्या शेजारच्या लॅबमध्ये तीदेखील पोस्टडॉक करते आहे. एलोडीच्या संगतीत राहून मी खूप काही शिकले. मी आता फ्रेंचमध्ये उत्तम शिव्या देऊ शकते. आणि गरजेपुरतं फ्रेंच शिकून झाल्यावर मी चांगल्या गोष्टीही बोलायला शिकले. =)
मला सलग दोन हजार मीटर पोहता येऊ शकतं हा साक्षात्कारदेखील मला एलोडीमुळेच झाला. मी कधीच बाराशे मीटरच्या वर जायचे नाही. पण एक दिवस एलोडीच्या बरोबर गप्पा मारता मारता आपण दोन किलोमीटर पोहलो असं माझ्या लक्षात आलं. आणि हा आत्मसाक्षातकार माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. शुक्रवारी संध्याकाळी कधी कधी आम्ही दोघी मिळून युरोपियन सिनेमे बघतो. तिच्याबरोबर राहून मला फ्रेंच सिनेमाबद्दल सुद्धा ब-याच नव्या गोष्टी कळल्या. या सिनेमांमध्ये शेवटी सगळे मारतात. किंवा मूळ पात्राला कर्करोग होतो किंवा सगळी पात्र डाव्या विचारांनी ग्रासलेली असतात. या सिनेमांमध्ये कधीच कुणाचीच स्वप्न पुरी होत नाहीत. किंवा स्वप्न पूर्ण व्हायच्या मार्गावर असताना, हे आपलं स्वप्न नाहीच मुळी असं पात्राला लक्षात येतं. या सिनेमांची फोटोग्राफी बघून तातडीने उन्हात जावसं वाटू लागतं. आणि एकूणच सिनेमाच्या शेवटी "असंच चालणार" असं वाटायला लागतं. अमेरिकन किंवा भारतीय सिनेमासारखी  जोषिली स्क्रिप्ट वगैरे इथे अजिबात नसते. आणि आठ दहा किलो कमी करून (आणि त्याबद्दल सगळ्या पेपरात आरडा ओरडा करून) कत्रिना इथे कैफात नाचत नाही. त्यामुळे मला युरोपियन लोकांच्या सत्य परिस्थिती पैसे देऊन बघायच्या या सवयीचं फार कौतुक वाटू लागलं आहे.
एलोडीचे आई बाबा शेतकरी आहेत. फ्रान्समधील वरदॉं या छोट्या गावात त्यांचं शेत आहे. तिचे आई बाबा कधीच फ्रान्सच्या बाहेर पडले नव्हते. या वर्षी तिला भेटायला इथे आले तो त्यांचा पहिला अंतरराष्ट्रीय प्रवास होता. आपल्या आई बाबांपासून आपण किती दूर आलो आहोत याची जाणीव सतत तिला होत असते. आणि अर्थात यात  मीही तिची "विचारसरू" आहे. पण एकमेकींच्या संपर्कात आल्यामुळे, तिच्या डोक्यातल्या भारताला आणि माझ्या डोक्यातल्या फ्रान्सला जोरदार तडा गेला आहे.फ्रेंच लोक भयानक शिष्ट असतात असं माझं ठाम मत होतं. आणि भारतीय लोक भयानक चौकशा करतात असं तिचं ठाम मत होतं. पण मला भेटून भारतीय लोकही फ्रेंच लोकांच्या मुस्काडीत मारेल इतका शिष्टपणा करू शकतात हे तिच्या निदर्शनास आलं. आणि फ्रेंच लोक इतके प्रेमळ असू शकतात हे मला उमगलं. एखाद्या दुकानात कुठलीतरी निरुपयोगी वस्तू भयानक किमतीला विकलेली बघून मी एकदा कुजकट इंग्लिशमध्ये शक्य तितका उपहास वापरून राग व्यक्त केला. तेव्हा तिनी मला  पॅरीसमध्ये राहण्यासाठी लागणारे सगळे गुण (?) माझ्याकडे आहेत असं सांगितलं. मग मी तिला माझ्यात हा कुजकट शिष्टपणा कसा आला ते समजावलं. यात लक्ष्मी रोडवरचे दुकानदार, चितळे बंधू, हिंदुस्थान बेकरी (सकाळी आठ वाजता "पॅटिस संपले" बोर्ड), पुण्यातील इतर कमी नामवंत पाट्या अशी उदाहरणे दिली.
एलोडीच्या आई-बाबांनी तिला इंजिनियर झाल्याबद्दल एक सशाचं पिलू दिलं. हे ऐकून मला लगेच आईला फोन करून, "बघा! शिका जरा!" असं म्हणावसं वाटलं. ते सशाचं पिलू घेऊन एलोडी पी. एच. डी करायला स्त्रॉसबर्गला गेली. दुर्दैवाने एका आठवड्यातच ते पिलू मेलं. आईपासून फार लवकर ताटातूट झाल्यामुळे ते मेलं असावं असा  एलोडीचा अंदाज होता. अर्धा एक तास दु:ख करून झाल्यावर ज्या दुकानदारानी  तिला पिलू विकलं होतं त्याला तिनी फोन करून झापलं. तुम्ही विकलेला ससा एका आठवड्यात मेला याची तुम्ही जबाबदारी घेतली पहिजे,  असा हट्ट केल्यावर त्या दुकानदारानी तिला मेलेला ससा परत घेऊन या, आम्ही नवा देतो असं वचन दिलं (हे ऐकून मला पुण्यात फ्रेंच लोकांनी वस्ती केली होती का, हे शोधून काढावसं वाटलं). एलोडीला घरी जायला अजून एक आठवडा बाकी होता. त्यामुळे मेलेला ससा कसा जतन करायचा याची चिंता तिला भेडसावू लागली. काही मित्रांना, "तुझ्या फ्रीजरमध्ये माझा मेलेला ससा ठेवशील का?", असं विचारल्यावर ते तिच्या आयुष्यातून कायमचे नाहीसे झाले. शेवटी तिच्या लॅबमध्ये बेन्झीन आणि टोल्वीनच्या बाटल्यांच्या मधोमध सासुल्याचा मृतदेह ठेवण्यात आला. आठवड्याच्या शेवटी बेन्झीनच्या सुगंधाने दरवळणारा दिवंगत ससुल्या बियर थंड ठेवायच्या कूलरमध्ये बर्फाच्या पांघरुणात ठेवण्यात आला. तो कूलर घेऊन लगबगीने ट्रेनमध्ये चढताना एलोडीला ठेच लागली. आणि अशा विचित्र गोष्टीला शोभेल असं वळण घेत ट्रेनमधल्या समस्त प्रवाशांना ही मुलगी या कूलरमधून काय घेऊन जाते आहे याचं दर्शन घडलं. दोन तास संशयाचे बाण झेलत एलोडी स्वत:च्या गावी पोचली. आणि दुकानदारानेही दिलेल्या शब्दाप्रमाणे तिला नवीन ससा दिला.
ही डार्क विनोदी कथा ऐकून माझा एलोडीबद्दलचा आदर एक किलोनी वाढला. एलोडीची अजून एक खोड म्हणजे तिला सायकॉलॉजीत फार रस आहे. मी इतकी भांडकुदळ का आहे याचं नातं तिनी माझ्या आणि माझ्या आईच्या नात्यातील मूलभूत आधारस्तंभांशी जोडलं. त्यामुळे माझ्या भांडकुदळपणाला माझी आई जबाबदार आहे या साक्षातकारानी मी हर्षभरीत झाले. कारण माझी आई नेहमी माझ्या भांडखोरपणाचं खापर माझ्या गरीब बिचा-या बाबाच्या डोक्यावर ठेवते. मग आमच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक गोष्टीचं आम्ही फावल्या वेळात सायको अॅनॅलिसीस करतो. कुठल्याही माणसानी आमच्याशी दुष्टपणा केला की त्याचं लहानपण कसं दु:खी असणार असे अंदाज आम्ही बांधू लागतो. आणि याचा फार मोठा फायदा म्हणजे आपल्या शत्रूबद्दल अतीव करुणा याखेरीज दुसरी कुठलीही भावना मनात येत नाही. एलोडीमुळे माझ्या मनात पुण्यातील समस्त भोचक संप्रदायाबद्दल देखील ही भावना उत्पन्न झाली आहे.
या मैत्रीचा अजून एक फायदा म्हणजे आम्हाला दोघीनाही एकाच प्रकारच्या चिंता भेडसावतात हे आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे माझ्या चिंतेचा फ्रेंच अनुवाद कसा आहे तेही माझ्या निदर्शनास आलंय. आधी मला माझ्या ब-याच काळज्या मी बिकट वाटेवरून चालणारी भारतीय अबला नारी आहे, या एकाच कारणामुळे आहेत असं वाटायचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये यातील फक्त "भारतीय" आणि "नारी" ही विशेषणं मला लागू पडतात असं माझ्या लक्षात आलं आहे. दुर्दैवानी माझी वाट बिकट नाही आणि अबला तर मी मुळीच नाही. एलोडीला भेटल्यामुळे "भारतीय" हे विशेषणदेखील त्या यादीत अत्यावश्यक नाही हे माझ्या लक्षात आलं. कारण एकाच वयाच्या दोन वेगवेगळ्या देशांतून येणा-या मुलींना एकसारख्याच चिंता असतात असं आमच्या दोघींच्याही लक्षात आलं. आणि त्या चिंतेचं सायको अॅनॅलिसीस केल्यावर असं लक्षात आलं की यातील खूप मुद्दे हे दुस-यांचं आपल्याबद्दल काय मत आहे यावर आधारित आहेत. आणि दोन हजार मीटर पोहून झाल्यावर यातील बरेच मुद्दे आमच्या मन:चक्षूतून गयाब होतात. :)