Friday, January 20, 2012

फास्ट फूड नेशन

मूळ प्रकाशन: मायबोली  (http://www.maayboli.com/node/32089)

अमेरिकेनी जगाला काय दिलं?
या प्रश्नाच्या उत्तरांची वर्गवारी करता येईल. आणि प्रत्येक उत्तराकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघतील. पण आजच्या काळात बरेच लोक अमेरिकेनी जगाला नको त्या गोष्टी दिल्या या विचारलाच दुजोरा देतील. भारतात गेल्या दोन दशकांपासून चाललेल्या "सांस्कृतिक अध:पतनासाठी" बरेच लोक अमेरिकेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात. अर्थात, त्यात चूक काहीच नाही. अमेरिकेनी जगाला एक नवीन संस्कृती दिली. आणि सुसंस्कृत समाजानी या अतिक्रमणाचा वेळोवेळी निषेध केला.
तर काय बरं नाव देता येईल या नवीन संस्कृतीला? माझ्या मते अमेरिकेनी जगाचं "मॅकडॉनाल्डीकरण" केलं. आणि यात फक्त जिथे तळलेले बटाटे आणि बर्गर मिळतात त्या एकसारख्या दिसणार्‍या खानावळींचा समावेश नसून, त्यामागून येणार्‍या विचारधारेचाही समावेश होतो. यावर लिहिलेलं "फास्ट फूड नेशन" हे पुस्तक माझ्या नुकतच वाचनात आलं. मॅकडॉनल्ड्सचा जन्म, आणि आजपर्यंतचा प्रवास यावर हा पुस्तकवजा प्रबंध एरिक श्लॉसर यांनी लिहिला आहे. यात प्रामुख्याने मॅकडॉनल्ड्सचा इतिहास असला तरी अमेरिकेतील इतर फास्ट फूड चेन्सचा देखील धावता अभ्यास केला आहे.
फास्ट फूड या खाद्यशाखेचा जन्म हा पेट्रोलवर चालणार्‍या चारचाकी गाड्यांच्या उदायाशी निगडीत आहे. अमेरिकेत चारचाकी गाड्या सामान्य माणसांच्या हातात आल्यावर, गाडीत बसून हवं ते मागवता आणि खाता यावं, या "गरजेतून" ड्राइव इन रेस्तरांचा "शोध" लागला. गाडीचालक मुलखाचा आळशी असतो. आणि त्याच्या आळशीपणाचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल, या भावनेतून मॅकडॉनल्ड बंधूनी पाहिलं मॅकडॉनल्ड्स उघडलं. ते साल होतं १९४५. पण पहिली अमेरिकन वडापावची (हॉट डॉग) गाडी कार्ल नावाच्या जर्मन-अमेरिकन तरुणांनी लॉस एंजलीसमध्ये त्याच सुमारास टाकली. याचं रुपांतर पुढे कार्ल जुनियर या प्रसिद्ध फास्ट फूड चेनमध्ये झालं. फास्ट फूडचा जन्म आणि जागतिक उद्योगीकरण यांचा फार जवळचा संबंध आहे. अन्न पदार्थ घावूक प्रमाणात कसे बनवता येतील, हा प्रश्न त्याकाळी खूप महत्वाचा मानला जायचा. आणि ते त्या प्रमाणात बनवताना त्यांची क्वालिटी कुठेही कमी पडणार नाही अशी हमी देऊ शकणारे उद्योजक श्रेष्ठ मानले जायचे. सुरुवातीला मॅकडॉनल्डमध्ये आखूड फ्रॉक घालून वाहनचालकांकडून ऑर्डर घेणार्‍या तरुण वेट्रेसेस असायच्या. आणि सर्व पदार्थ काचेच्या बशा, धातूची कटलरी वापरून पेश केले जायचे. पण हळू हळू वेळ आणि पैसा वाचवण्याच्या हेतूने वेट्रेस आणि कटलरी दोन्हीवर काट मारण्यात आली.
मॅकडॉनल्डच्या स्थापनेपासूनच जोरदार चालणारा खाद्य पदार्थ म्हणजे त्यांचे प्रसिद्ध फ्रेंच फ्राईज. फ्रान्समध्ये देखील हे "फ्रेंच" फ्राईज इतके प्रसिद्ध नाहीत जितके ते मॅकडॉनल्डमुळे झाले. मॅकडॉनल्डच्या प्रत्येक बर्गर बरोबर फ्राईजचं एक पाकीट विकण्यात येतं. साधारण एका बोट रुंदी आणि लांबी असलेले बटाट्याचे तुकडे एका विशिष्ट पद्धतीने तळण्यात येतात. ही तळण्याची पद्धतदेखील खूप प्रयोग करून नियमित करण्यात आली आहे. मॅकडॉनल्डची फ्राईज प्लांट्स दिवसागणिक दोन मिलियन पौंड फ्रोझन फ्राईज बनवतात. १९६६ सालापासून मॅकडॉनल्डनी फ्रोझन फ्राईज विकत घेऊन आयत्या वेळी तळून ग्राहकांना पुरवायला सुरवात केली. यात नुसता वेळ आणि पैशाचा हिशोब नव्हता. १९६० च्या दरम्यान मॅकडॉनल्डच्या साखळीने संपूर्ण अमेरिकेला वेढा घातला होता. प्रत्येक मॅकडॉनल्डमधले फ्रेंच फ्राईज एकसारखे दिसावेत आणि चाविलादेखील सारखे असावेत हा ही हेतू या बदलामागे होता. पण असा नियमितपणा आणताना, हे गोजिरवाणे बटाटे एकदा तळून गोठवण्यात येतात. आणि विक्रीच्या ठिकाणी पुन्हा एकदा तळण्यात येतात! या एका पदार्थाने अमेरिकन शेतीमध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणली. आणि अमेरिकेच्या पोटी आलेल्या या बटाटेसुराची भूक भागवण्यासाठी शेतकर्‍यांनी रसेट बटाटे उगवायला सुरुवात केली. पण या क्रांतीतून (नेहमीप्रमाणे) शेतकर्‍यांचा फार कमी फायदा झाला.
मॅकडॉनल्डनी अजून एका क्षेत्रात क्रांती घडवली. ती म्हणजे "टीनएजर" एम्प्लॉयमेंटमध्ये. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे अठरा वर्षाखालील मुलांना पार्ट टाईम कमी पैशात (मिनिमम वेज) काम करता येते. याचा सगळ्यात मोठा फायदा मॅकडॉनल्डनी करून घेतला. बिगारीवर काम करणारी लाखो तरुण मुलं मुली रोज सकाळी सहा वाजता वेगवेगळी मॅकडॉनल्ड उघडत असतात. यातील बरीच अजून आई बाबांच्या घरी राहत असतात. त्यामुळे मिळणार्‍या पैशातून गाडी घेणे, चैनीच्या वस्तू पालकांचा जाच न होता विकत घेणे अशा गरजेमधून हा रोजगार चालतो. मॅकडॉनल्डचा दुसरा कामगार वर्ग म्हणजे अनस्किल्ड इमिग्रंट्स. परदेशातून आलेले (मुख्यत्वे मेक्सिकोहून), इंग्लिश न येणारे, गरिबीत राहणारे कित्येक लोक मॅकडॉनल्डच्या आश्रयाला येतात. पण त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती (विशेष करून वैद्यकीय) दिल्या जात नाहीत. कामगारांनी कुठल्याही प्रकारचा कामगारसंघ बनवू नये यासाठी मॅकडॉनल्ड खूप प्रयत्नशील आहे. तिथलं काम इतकं नियमित केलं आहे की कुठल्याही कर्मचार्‍याच्या सोडून जाण्यामुळे नुकसान होत नाही. मॅकडॉनल्डकडे तिथे काम करणारे सगळे लोक पुढे जाण्याची एक पायरी या हेतूनेच बघतात. आणि त्यामुळे मॅकडॉनल्डचा "टर्न ओव्हर रेट" खूप जास्त आहे.
फ्रेंच फ्राईजनी जशी अमेरिकन शेतीत क्रांती घडवली तशीच अजून एक क्रांती मॅकडॉनल्डने बीफ उद्योगात घडवली. मॅकडॉनल्डला घावूक प्रमाणात बीफ पुरवता यावं या हेतूने बीफ उद्योगाने बरीच तांत्रिक प्रगती केली. बीफ आता छोट्या, संपूर्णपणे मानवी कौशल्याने चालणार्‍या उद्योगांकडून न येता, मोठ्या संपूर्णपणे मेकॅनाईझ्ड कारखान्यांमधून येऊ लागलं. बोनलेस बीफ खीम्याच्या स्वरूपात, तापमान नियंत्रित वाहनातून मॅकडॉनल्डला पोहोचवण्यात येऊ लागलं. या बदलामुळे बीफ उद्योगातील कामगारांच्या मिळकतीवर विपरीत परिणाम झाला. एके काळी भरपूर पैसे मिळणारा हा उद्योग अचानक आजारी झाला. आज जसे डेट्रॉइटमध्ये ओस पडलेले गाड्यांचे कारखाने दिसतात तसेच त्या काळी आजारी होऊन बंद पडलेले बीफचे कारखाने दिसायचे. बीफ उत्पादन महाग असायचं अजून एक कारण म्हणजे इथे काम करणार्‍या कामगारांना प्रचंड जोखीम पत्करावी लागायची. बर्‍याच कामगारांना अपघात व्हायचे आणि कधी बोटावर तर कधी संपूर्ण हातावर बेतायचं. एका अर्थाने बीफ उत्पादन मशिनरी वापरून होऊ लागलं हा चांगला बदल म्हणता येईल. पण त्या बदलाचा कामगारांच्या मिळकतीवर परिणाम झाल्यामुळे हे चांगलेपण झाकोळून गेलं. या उद्योगातील प्रत्येक कामगारसंघाला अगदी शांतपणे चिरडून टाकण्यात आलं. कधी कधी कारखान्यातल्या सगळ्या कामगारांना एकाच वेळी नोकरीवरून बरखास्त करण्यात यायचं आणि त्यांच्या जागी जवळपास ४०% कमी पगारात काम करणार्‍या नवीन लोकांना नेमलं जायचं. संपावर गेलेल्या कुठल्याही कामगाराला पुन्हा नोकरीवर घेतलं जायचं नाही.
हल्लीच्या काळात मॅकडॉनल्डवर केलेला अजून एक आरोप म्हणजे त्यांच्या जाहिरातींमधील लहान मुलांवर केलेलं छुपं प्रोग्रामिंग. लहान मुलं पालकांवर मानसिक दबाव आणू शकतात या अगदी साध्या "सत्यातून" मॅकडॉनल्डनी त्यांच्या जाहिराती लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बनवल्या आहेत. मार्केटिंग विश्वात आई बाबांकडे हट्ट करण्यार्‍या मुलांचं वर्गीकरण करण्यात येतं. यात नुसती भुणभुण करणारी, पुन्हा पुन्हा आठवण करून देणारी, प्रेमानी गळ घालणारी आणि तमाशा करणारी असे सोपे वर्ग केले आहेत. मॅकडॉनल्डच्या हॅपी मीलवर खूप टीका झाली. हॅपी मीलमधून लहान मुलांसाठी मॅकडॉनल्ड वेगवेगळी खेळणी वाटू लागलं. काही खेळण्यांचे संपूर्ण सेट वेगळ्या वेगळ्या डब्यांमध्ये विखुरण्यात आले. त्यामुळे पालकांवर ही खेळणी मुलांना जमवता यावीत यासाठी खूप तणाव येऊ लागला. मग अशा वेळेस आपल्या मुलाला मीलमधून मिळणा-या खेळण्यासाठी पूर्ण दिवसासाठी लागतील इतक्या कॅलरीज त्याला एकाच वेळेच्या जेवण्यात देऊ करायच्या का, असा साहजिक प्रश्न सुजाण पालकांना पडतो. पण मुलं शाळेतून घरी येतात आणि इतर मुलांची उदाहरणं देतात. अशा वेळेस पालकांनी काय करायचं? नुकताच सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये अशी खेळणी विकण्याविरुद्ध कायदा करण्यात आला आहे. पण त्यावर दहा सेंट्सला ही खेळणी वेगळी विकण्याचा "जालिम उपाय" मॅकडॉनल्डनी शोधून काढला आहे.
अमेरिकेतल्या कित्येक स्टेट्समध्ये हल्ली मॅकडॉनल्ड शाळांमध्ये सुद्धा जाहिराती करतात. शाळेतल्या कॅन्टिनमध्ये मुलांना फास्टफूड विकण्यात येतं. आणि कित्येक शाळा या जाहिरातींच्या मोबदल्यात मिळणार्‍या पैशांसाठी या निर्णयाचं समर्थन करतात. अशा जाहिराती करून मॅकडॉनल्डनी एक अख्खी अमेरिकन पिढी वाढवली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात जे नवीन पालक आहेत, त्यापैकी काहींच्या मनात मॅकडॉनल्डच्या नॉस्टॅलजिक आठवणी आहेत (हे साधारण भारतीय लोकांना मॅगी बद्दल असलेल्या भावनांसारखं म्हणता येईल). त्यामुळे आता मॅकडॉनल्डशी एक भावनिक धागासुद्धा जुळला आहे.
पण या सगळ्याचा परिपाक काय? या पुस्तकातली मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे लेखकानी हे पुस्तक नि:पक्ष होऊन लिहिलं आहे. अर्थात मॅकडॉनल्डमुळे लोकांच्या खाण्याच्या संकल्पनेलाच एक नवीन वळण मिळालं. आणि ते चांगलं नक्कीच म्हणता येणार नाही. अमेरिकन समाजावर या व्यवस्थेचे बरेच वाईट परिणाम झाले. स्थूलता, आळशीपणा, हृदयविकार, डायबेटीस अशा बर्‍याच व्याधींचं मूळ हा आहार मानला जातो आणि यावर बरंच संशोधनदेखील झालं आहे. पण मॅकडॉनल्ड ही संकल्पना अतिशय नवीन होती आणि ती इतक्या दूरवर नेण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे हे मात्र निश्चितपणे म्हणता येईल. मॅकडॉनल्ड बाहेरच्या देशांनी सुरुवातीला साफ खोडून काढलं. प्रत्येक नवीन राष्ट्रात आणि त्याच्या समाजात मॅकडॉनल्डला पुन्हा नव्यानी सुरुवात करावी लागली. भारतात बिग मॅकचा महाराजा मॅक झाला. जपानमध्ये श्रिम्प बर्गर "कात्सु" सॉस बरोबर विकण्यात येऊ लागले. चिलीमध्ये केचपऐवेजी ग्वाकामोली देण्यात येऊ लागलं. ग्रीसमध्ये बन ऐवेजी पिटा विकण्यात येऊ लागला. इस्राएल मध्ये मॅकशवर्मा विकण्यात येऊ लागला. प्रत्येक देशातील लोकांच्या आवडी निवडी ओळखून आणि त्यांच्या धार्मिक भावना समजून मेन्यू आखणे आणि तो शक्य तितका नियमित करणे हे खरोखर अवघड काम आहे. हे काम करताना मॅकडॉनल्डला बरेच आर्थिक फटकेही बसले आहेत.
जरी पुस्तकातील इतर गोष्टी वाचून माझ्यातील डावी बाजू संतापली असली, तरी त्यांच्या या सृजनशीलतेचं आणि उद्योगशीलतेचं माझ्यातील उजव्या आणि कल्पक बाजूकडून कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. शेवटी इथे खायचं किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. मॅकडॉनल्डनी आपल्यावर अतिक्रमण केलं आहे असा विचार करताना, त्या जोडीला आपण मॅकडॉनल्डमध्ये का जातो, हा विचारही झाला पाहिजे.
आजकालच्या जगात टु बी ऑर नॉट टु बी वळणावर आणून ठेवणार्‍या इतरही बर्‍याच गोष्टी आहेत. त्यामुळे विरोधच करायचा असेल तर नुसताच या कंपन्यांना न करता आपल्या आतील आहारी जाणार्‍या मनालाही केला पाहिजे. नाही का?

1 comment:

  1. well said.. all things have good and bad sides its up to us, which to be prefer....

    ReplyDelete