Thursday, January 5, 2012

तुझं लगीन साळू

 मूळ प्रकाशन: मायबोली २७ ऑगस्ट २०११ (http://www.maayboli.com/node/२८४५९)

नुकतेच आम्ही पी.एच.डीरूपी डोंगर पोखरून थिसीसरूपी उंदीर बाहेर काढून मायदेशी सुट्टीला आलो. अपेक्षेप्रमाणे 'इतरे जन' या क्याटेगीरीत बसणा-या सगळ्यांना एकच जटील समस्या आहे. ती म्हणजे आमच्या बोहल्यावर चढण्याची. तू लग्न कधी करणार? या प्रश्नाकडे येण्यासाठी लोक काय काय नागमोडी वळणं घेतात वाह!
त्यातील काही निवडक उदाहरणे देऊन मी माझा थिसीस इथे मांडू इच्छिते (पी. एच. डी झाल्याचा हा एक तोटा असतो. सगळीकडे निरीक्षण-निष्कर्ष वगैरे करायची नको ती सवय लागते.). [१]
उदा. १ सुमन काकू
सुमन काकू नेहमी सकाळीच येतात. आम्ही आमच्या स्वयपाकवाल्या मावशींच्या हातचे टुम्म फुगलेले फुलके एका पाठोपाठ एक असे रिचवत असतो. आमचं सुख सुमन काकूंच्या डोळ्यावर येतं आणि पहिला गुगली त्या आमच्या दिशेने भिरकावतात.
सुमन काकू: तब्येत सुधारली बरंका मागल्या वेळेपेक्षा.
यातला 'बरंका' हा शब्द वार्निंग स्वरूपात उच्चारला जातो. आम्ही मावशींना पुढचा फुलका आमच्या ताटाऐवेजी डब्यात टाकायला सांगतो.
मी: हो. थिसीस लिहायच्या टेन्शन मध्ये पाळायला जाता यायचं नाही हो म्हणून. पण आता सुरु केलाय पुन्हा.
सुका: हो आता जरा वजन कंट्रोल मधेच ठेवलं पाहिजे काही वर्षं.
इथून आम्हाला पुढे येणा-या प्रश्नाची कुणकुण लागू लागते. मग तो प्रश्न किती वेळ चकवता येईल याचा अभ्यास आम्ही करू लागतो.
मी: अहो अजून काही वर्ष कशाला. कायमच ठेवलं पाहिजे. (नाहीतर आमची पण सुमन काकू होईल ना लवकरच.) आता अमेरिकेला गेल्यावर मी लगेच जीम सुरु करणारे. योगासनं वगैरे तर चालूच आहेत.
सुका: (आईकडे डोळे आश्चर्य-अविश्वास या विविध रसांनी डबडबून बघत) ही अमेरिकेला जाणार आता? काय हे?
मी: हो मला तिकडे पोस्ट-डॉक मिळालीये. त्यामुळे मी खूप खुशीत आहेत.
सुका: हो पण लग्नाचं काय मग?
हात्तिच्या.अपेक्षेपेक्षा आधीच आला.
मी: बघायचं. पुढे केव्हातरी.
यावर सुका मगाच्या आश्चर्य -विस्फारित डोळ्याचं व्हर्जन टू सादर करतात.
उदा. २
श्री. व सौ. देशपांडे
श्री: कशात पी. एच. डी केलीस? थिसीसचं टायटल काय होतं?
मला थिसीसचं टायटल माझ्या गाईडनी सुद्धा विचारलं नाही कधी. मी जे काय बाड समोर ठेवलं त्यावर त्यांनी "गेली एकदाची भांडकुदळ बया ही", अशा आनंदात सही केली. त्यामुळे कुणी थिसीसचं टायटल अशी बाळबोध सुरुवात केली की माझ्यातल्या नवसंशोधकेला हुरूप येतो. त्यावर मी माझ्या थिसीसचं शक्य तितकं देशपांडेकरण करून सांगू लागले. थोड्याच वेळात देशपांडे काकांच्या मुखातून एक इवलीशी जांभई सटकली. त्याचा दोष मी त्यांनी नुकत्याच पुरीनी साफ केलेल्या आमरसाच्या वाटीला दिला.
श्री.: असं असं. मग आता पुढे काय?
या प्रश्नावर शक्य तितक्या लवकर झेप मारून सभा आपल्या ताब्यात घ्यावी लागते. पुण्यात पब्लिक डिस्कशनचे वेगळे नियम आहेत. इथे संवाद साधण्याची सगळ्यात रूढ पद्धत म्हणजे पुढच्याला जिथे संवाद न्यायची सुप्त इच्छा आहे त्याच्या विरुद्ध दिशेला तो घेऊन जाणे. यासाठी विचारांची चपळाई, विनम्रतेचा संपूर्ण आभाव, आणि मोठ्ठा आवाज हे घटक महत्वाचे आहेत. हे सगळं समप्रमाणात वापरून मी सभेचा ताबा घेतला.
मी: अमेरिकेला जाणार. तिकडच्या एका बायोफुएल्स रिसर्च ग्रुपमध्ये मला पोस्ट-डॉक मिळाली आहे.
सौ: अगं? अजून शिकणार तू? बास की आता!
मी: नाही नाही. पोस्ट-डॉक म्हणजे नोकरीच असते हो (जगभरात नवीन पी.एच.डी झालेल्या लोकांना कमी पगारात सासुरवास करण्यासाठी दिलेलं ते गोंडस नाव आहे काकू. पण हे तुम्हाला सांगून मी तुमचा आनंद द्विगुणीत करू इच्छित नाही).
सौ: मग पुढे काय?
हा प्रश्न विचारताना काकूंच्या चेह-यावर, "बघतेच कशी पळून जाते आता ही" असा भाव असतो.
मी: सांगितलं की. अमेरिका.
सौ: ते नव्हे ग. शिक्षण वगैरे झालच की. नोक-या वगैरे पण हल्ली सगळ्यांनाच मिळतात. पण बाकीही गोष्टी असतात ना आयुष्यात. लग्ना-बिग्नाचं काही ठरवलंयस की नाही?
माझ्या साडेतीन वर्षं खस्ता खाऊन मिळालेल्या डिग्रीचा आणि रात्री दीड वाजता फोनवरून इंटरव्यू देऊन मिळालेल्या नोकरीचा सपशेल कचरा.
मी: हो करणार ना. पुढच्या वर्षी.
सौ: कुणाशी? ठरवलंयस वाटतं!
हे विचारताना सौ देशपांडेंच्या चेह-यावर, मी म्हणजे सैफ आली खानच्या हातात हात घालून फिरणारी करीना कपूर आहे असे भाव असतात. मग माझ्या मनाचा इंटेल प्रोसेसर पटकन मी करीनाइतकी बारीक झाले तर कशी दिसीन ही चित्र तयार करतो. ते बघून मी सुखावते. पण त्या चित्रापर्यंत जायला किती पाळावं लागेल, एस्पेशली सुमन काकूंचा टोमणा आठवून, याचा विचार करून माझ्या मनाची हार्ड डिस्क क्रॅश होते.
मी: नाही हो काकू. बघेल आई.
मग एक अतिशय सहानुभूतीदर्शक कटाक्ष माझ्या माऊलीच्या दिशेने टाकण्यात येतो.
या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं तरी पंचाईत होते.
लग्न करणार नाही असं म्हटलं तर लग्नाचे फायदे या विषयावर फुकट समुपदेशन होतं. त्यात हल्लीच्या मुली कशा करियरीस्ट झाल्यात आणि त्यामुळे ओघानी येणारं समाजाचं विघटन आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल मतं व्यक्त केली जातात. मग म्हातारपणातील एकटेपणा, स्त्रियांच्या (मूल)भूत गरजा, आयुष्याच्या समरात लढण्यासाठी जोडीदार (यात लढाई जोडीदाराशीच असते बरंका) वगैरे बागुलबुवा दाखवले जातात.
करीन म्हटलं तर कधी? कुणाशी? कुठे? असे एकातून एक उद्भवणारे उपप्रश्न तयार असतात.
"तुम्हाला काय करायचय?" असा (स्वाभाविक) प्रश्न विचारला तर ज्यासाठी बोलावलंय ते जेवण मिळणार नाही ही लग्न न होण्यापेक्षाही मोठी भीती असते.
काही लोक तोंडानी लग्न हा शब्द उच्चारल्यानी कुठलातरी अलिखित सामाजिक नियम मोडला जाईल या भीतीने की काय हातवारे करून लग्नाबद्दल विचारतात.
परवा एका बाईंनी मला 'आणि.." नंतर हवेत अक्षता टाकल्याचे विनोदी हावभाव करून लग्नाबद्दल विचारलं. त्यांना मी 'कधीच नाही' अशा अर्थाचे हातवारे करून गप्प केलं आणि त्यापुढे, 'पुढे व्हा' या अर्थाचे हातवारे करायची तीव्र इच्छा दाबली.
कधी कधी लग्नाचा विषय काढल्यानी आपल्याला खूप क्लेश होतात असा चेहरा केला तर लोक गप्प बसतात. मग त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी दर्दभरी दास्ताँ आहे असं वाटू लागून थोडी सहानुभूती मिळते. पण आपली पाठ फिरली रे फिरली की समस्त काक्वांचं स्टिंग ऑपरेशन सुरु होतं. जग बघितल्याचा साईड इफेक्ट म्हणून माझ्या चेह-यावर दिल के टुकडे झाल्याचे बॉलीवूड भाव यायचे कधीच बंद झालेत.
आणि आधुनिक इमान्सीपेटेड महिलेची भूमिका घेतली तर आई रागवेल अशी भीती होती (इमान्सीपेटेड सारखा मॉमसीपेटेड असा शब्द हवा.).
म्हणून मी एक दिवस या प्रश्नाचं योग्य (खरं नव्हे) उत्तर आईला विचारलं (वाह. काय पण पी. एच. डी करताय. उत्तरं आईला विचारून सांगताय अजून?).
मग कुरुक्षेत्राकडे नेणा-या सारथ्यासारखी आई माझ्या अर्जुनपणाला धावून आली. आणि मला माझ्या निरोपसमारंभात माझ्या गाईडनी केलेल्या स्तुतीइतकंच अनपेक्षित उत्तर दिलं.
"सई, लग्न हा प्रश्न जितका सामाजिक आहे तितकाच वैयक्तिक आहे."
यानंतर दोन तास मला गीता ऐकावी लागणार याची खात्री झाली. पण त्यावर आईनी
"पुढच्या वेळेपासून प्रत्येक प्रश्नकर्त्याला वेगळं (सुरस, सरस आणि चमत्कारिक) उत्तर दे." असं सांगितलं!
"शक्यतो दोन भिन्न परंतु आपापसात परिचित अशा प्रश्नाकार्त्यांना दोन अति भिन्न उत्तरं दिलीस तर तुला असे बिनकामाचे लेख लिहायला अजून खूप जिन्नस मिळेल." हे ही वर घातलं!
[१] या लेखाची मांडणी राजच्या लेखनाने प्रेरित आहे. पी. एच. डी करताना स्वत:ला मत नसेल तर दुस-याची मतं अशी कंसात आकडे टाकून मांडता येतात. त्यामुळे मला ओरीजीनल स्टाईल नसल्याने राजचा रेफरन्स.

1 comment:

  1. आईच्या गावात!

    सीरीयसली विनोदी लेख आहे हा. म्हणजे काही ओळी वाचताना 'बरं लिहिते मुलगी' असा खवचटपणा सोडावाच लागतो!

    "मला थिसीसचं टायटल माझ्या गाईडनी सुद्धा विचारलं नाही कधी. मी जे काय बाड समोर ठेवलं त्यावर त्यांनी "गेली एकदाची भांडकुदळ बया ही", अशा आनंदात सही केली. "

    "पुण्यात पब्लिक डिस्कशनचे वेगळे नियम आहेत. इथे संवाद साधण्याची सगळ्यात रूढ पद्धत म्हणजे पुढच्याला जिथे संवाद न्यायची सुप्त इच्छा आहे त्याच्या विरुद्ध दिशेला तो घेऊन जाणे. यासाठी विचारांची चपळाई, विनम्रतेचा संपूर्ण आभाव, आणि मोठ्ठा आवाज हे घटक महत्वाचे आहेत. हे सगळं समप्रमाणात वापरून मी सभेचा ताबा घेतला". - इथे तर डायरेक्ट पी यल नाच चायलेंज केलंयस॰

    "परवा एका बाईंनी मला 'आणि.." नंतर हवेत अक्षता टाकल्याचे विनोदी हावभाव करून लग्नाबद्दल विचारलं. त्यांना मी 'कधीच नाही' अशा अर्थाचे हातवारे करून गप्प केलं आणि त्यापुढे, 'पुढे व्हा' या अर्थाचे हातवारे करायची तीव्र इच्छा दाबली." - तो अक्षतेचा हावभाव मला डोळ्यांसमोर दिसतो आहे आणि 'पुढे व्हा' म्हणणारी तू सुद्धा!

    एकंदरीत जमलेलं आहे.

    ReplyDelete