Monday, April 9, 2012

देनिस, कॅल्विन आणि निकोला


 कधी कधी मनाची मरगळ घालवण्यासाठी मी लहान मुलांची पुस्तकं वाचते. लहान असताना मला आजी नेहमी अरेबियन नाईट्स वाचून दाखवायची. त्यातला ठेंगू कुबड्या, ताटलीएवढ्या मोठ्या डोळ्याचा कुत्रा, जादूचा दिवा आणि त्यातून येणारा अक्राळ विक्राळ जिनी या सगळ्यांनी माझ्या मनात जणू एक सिनेमा उभा केला होता. तसंच इसापनीती, पंचतंत्र, अकबर आणि बिरबल या सगळ्या गोष्टीदेखील लाडक्या असायच्या. पण थोडी मोठी झाल्यावर जेव्हा मी स्वत: पुस्तकं वाचू लागले, तेव्हा मात्र मला मुलांसाठी लिहिलेल्या या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींपेक्षा, मुलांच्या आयुष्याबद्दल, मोठ्या माणसांनी, लहान मुलांच्या शब्दात लिहिलेल्या गोष्टी जास्त आवडू लागल्या.

यातलं मी कधीही न विसरू शकणारं उदाहरण म्हणजे देनिसच्या गोष्टी. देनिस हा साधारण सहा वर्षांचा रशियन मुलगा आहे. देनिस त्याच्या आई बाबांबरोबर सोविएत राजवटीतल्या काळातील रशियात राहतो. त्याचे आई बाबा, त्याचा मित्र मिष्का, मैत्रीण अनुष्का ही पुस्तकातली मुख्य पात्रं आहेत. हे पुस्तक वाचताना पहिल्यांदा विक्तर द्रागुनस्की हा मोठा माणूस आहे यावरच विश्वास बसत नाही. पुस्तकातली प्रत्येक कथा कुठल्याही सहा वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात घडू शकणारी आहे. माझी आवडती गोष्ट "बरोब्बर पंचवीस किलो". देनिस आणि मिष्का जत्रेत जातात. तिथे  एका खेळात, बरोब्बर पंचवीस किलो वजन असलेल्या मुलाला किंवा मुलीला बक्षिश मिळणार असतं. देनिसचं वजन पंचवीस किलोच्या जरा वर भरतं तर मिष्काचं पंचवीसच्या थोडं खाली! मग देनिस मिष्काचं वजन बरोब्बर पंचवीस किलो भरेपर्यंत त्याला लिंबू सरबत प्यायला लावतो.


 यातल्या काही गोष्टी नुसत्या मजेदार नसून थोड्या अंतर्मुख करायला लावणा-या आहेत. जेव्हा देनिसला छोटी बहिण होते, तेव्हा त्याच्या मनात तयार झालेलं छोटसं वादळ, सर्कशीत चेंडूवर चालणारी सुंदर मुलगी पाहून त्याला तिच्याबद्दल वाटणारं कौतुक/ आकर्षण, या सगळ्या हळुवार गोष्टी एखाद्या सहा वर्षाच्या मुलाच्या भाषेत लिहिण्याची प्रचंड प्रतिभा या पुस्तकात दिसते.


अमेरिकेतही असा एक लाडका सहा वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव कॅल्विन. कॅल्विन आणि हॉब्स ही कॉमिक स्ट्रिप १९८० - १९९० च्या सुमारास अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध झाली. कॅल्विनचे जनक बिल वॉटरसन हे ओहायो मधल्या कडाक्याच्या हिवाळ्यात लहानाचे मोठे झाले. त्यामुळे कॅल्विनच्या बाललीलांमध्ये बर्फाची माणसं बनवणं हा एक महत्वाचा उपक्रम आहे. कॅल्विनचा या सगळ्या खोड्यांतील सवंगडी म्हणजे हॉब्स -- त्याचा खेळण्यातला वाघ. हॉब्सचं वैशिष्ठ्य असं की  कॅल्विनच्या डोळ्यांना तो खराखुरा जिवंत वाघ दिसतो पण चित्राच्या पॅनेलमध्ये दुसरी कोणतीही व्यक्तिरेखा आली की हॉब्स निर्जीव खेळणं बनतो. ही कल्पना अत्यंत नाजूक आहे. आणि ती इतक्या जाणीवपूर्वक लोकांसमोर मांडणं फार अवघड आहे. पण आपल्या स्वत:च्याच लहानपणात डोकावून पाहिलं तर असे किती काल्पनिक सवंगडी सापडतील? लहान मुलांना काल्पनिक सवंगडी असू शकतात हे मोठं झाल्यावर समजणं (किंवा आपल्या लहानपणातून लक्षात राहणं) हीच कवीमनाची पहिली पावती आहे.



देनिसप्रमाणेच कॅल्विनचं आयुष्यदेखील कुठल्याही सहा वर्षांच्या मुलासारखं आहे. पण वॉटरसनकडे मोठ्यांनादेखील नीटसं न स्पष्ट करता येणारं तत्वज्ञान छोट्या कॅल्विनच्या तोंडी घालण्याचं कसब आहे. कॅल्विनच्या काही विनोदांतून वॉटरसनचं स्वत:चं निसर्गप्रेम, पशुप्रेम दिसून येतं. अर्थात, या स्ट्रिपमध्ये कॅल्विनला कुठेही कम्प्यूटरची बाधा झालेली दिसत नाही. सतत टी.व्ही बघायच्या त्याच्या हट्टालादेखील घरून शांतपणे विरोध केला जातो. आणि त्याच्या आई वडिलांची त्याला घरातून बाहेर खेळायला हाकलण्याची तळमळ आजच्या काळात जास्त उचलून धरली जाईल. एका स्ट्रिप मध्ये घरात मलूल चेह-यानी टी.व्ही बघणा-या कॅल्विनला हॉब्स सूर्यप्रकाश न मिळालेल्या फुलाची उपमा देतो. अशा छोट्या छोट्या कल्पनांमधून वॉटरसन मुलांनी बाहेर भटकावं, आणि त्यांना लहानपण तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम न होता घालवता यावं, याचे मनाला भिडणारे धडे देतात.


फ्रांसमधल्या सहा वर्षांच्या मुलाचं नाव निकोलस (निकोला) आहे. अस्टेरीक्सचे लेखक गॉसिनी आणि जॉ-जॅक सॉम्पे या दोन प्रतिभावंत चित्रकारांच्या सहयोगातून या पुस्तकांचा जन्म झाला. निकोलाचं आयुष्य १९६० च्या आसपासच्या फ्रांसमधून आलेलं आहे. त्याच्या शाळेतले मित्र, त्याचे चिडके शिक्षक (ज्यांना मोठा बटाटा असं नाव व्रात्य कारट्यांनी बहाल केलं आहे), निकोलचे आई बाबा अशी या पुस्तकांमधली "पात्रावळ" आहे. या पुस्तकांची खासियत म्हणजे अगदी लहान मुलं जशी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतात, तसेच या पुस्तकात पुन्हा पुन्हा तेच तेच रेफरन्सेस येतात. निकोला स्वत: या गोष्टी सांगतो त्यामुळे तो प्रत्येक पात्राची पुन्हा नव्याने ओळख करून देतो (जसं की "माझा मित्र अॅलेक -- जो सारखा खात असतो"). या पुस्तकात निकोलाच्या आई बाबांची त्याच्या आईच्या आईवरून होणारी भांडणंदेखील मजेदार आहेत. (जागतिक) "घरो घरी मातीच्या चुली"चा छान प्रत्यय येतो. पण या पुस्तकांची सगळ्यात सुंदर बाजू म्हणजे सॉम्पेची रेखाटनं. त्यांनी रेखाटलेली शाळेची इमारत ही इतकी बोलकी आहे की तिच्यात कुठल्याही देशातल्या मुलाच्या/मुलीच्या मनाला थेट त्यांच्या शाळेत घेऊन जायची ताकद आहे.

भारतात प्रथम बुक्स ही संस्था खास लहान मुलांच्या साहित्यासाठी काम करते. भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये दर्जेदार बालसाहित्य अनुवादित करायचा उपक्रम प्रथम बुक्सने हाती घेतला आहे. माझ्या नशिबाने मला यातील एका पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद करण्याची संधी मिळाली. आणि हा अनुवाद करताना, लहान मुलांना समजेल, आवडेल अशा इंग्रजीत, मराठीतले गोंडस शब्द तितक्याच गोंडसपणे अनुवादित करणं फार म्हणजे फार कठीण गेलं. पण ते करताना अतिशय आनंद मिळाला. काही दिवसांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं (लिंक). माधुरी पुरंदरेंनी लिहिलेलं बाबांच्या मिशा! विशेष म्हणजे या पुस्तकातली सगळी चित्रं देखील त्यांनीच काढली आहेत.
देनिस, कॅल्विन, निकोला आणि माधुरीच्या पुस्तकातली अनु या सगळ्या मुलांचे आनंद एकसारखे आहेत. आणि सोविएत बर्फात काय नाहीतर कॅपिटॅलिस्ट बर्फात काय, स्लेडवर बसून घसरगुंडी खेळण्यात येणारी मजा एकसारखीच! आणि विविध भाषांमधून या लहान मुलांच्या गोष्टी ऐकताना अबालवृद्धांना होणारा निरागस आनंदही एकसारखा. :)

7 comments:

  1. कॅल्विन आणि हॉब्स बरेचदा वाचलं आहे पण त्याचं व्यसन नाही लागलं. आणि आता डिलबर्टसारख्या अतिसिनिकल कॉमिक्सची सवय झाली आहे. :)
    यादीत लिटल प्रिंस चपखल बसेल.

    ReplyDelete
  2. @ Raj
    Me calvin and hobbes 15 warshachi aslyapasun wachtiye. So I think it is embedded into my system. :)

    ReplyDelete
  3. :) देनिस, केल्विन आणि लंपन हे आयुष्यभराचे बालमित्र आहेत माझे (आणि ’चिंगी’ आणि ’उन्हाळ्याच्या सुट्टी’ मधली सई यासुद्धा! ;) ) निकोलाबद्दल पूर्वी वाचलं नव्हतं, ओळख घडवल्याबद्दल आभार! राजच्या ’लि’ल प्रिन्स’ बद्दलच्या मताला अनुमोदन , आणि त्याच रांगेत पिप्पी लॉंगस्टॉकिंग, जस्ट विलियम आणि जी.एं.चे बिम्म -मुग्धासुद्धा बसतील.

    सई, ’प्रथम’ च्या उपक्रमाबद्दलपण माहिती नव्हती मला. तुझं अनुवादित पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल खूप अभिनंदन! भारतात गेले की घेऊन वाचेनच.

    ReplyDelete
  4. Thanks Gaya. :)
    Haha Unhalyachya suttitli saee! So cute! Thankoo. Me Lampan nahi wachlay. Ani GA pan nahi. :(

    ReplyDelete
  5. Great! Wow Congrats g...tu ithe (pan) lihites maahitach navhta....:)

    Good going

    ReplyDelete
  6. छान लिहल आहेस! आता आपल्या लंपनला पण इनक्लूड कर.

    ReplyDelete
  7. इथे बरीच पुस्तकं आहेत.
    https://www.facebook.com/SovietLiteratureInMarathi


    https://docs.google.com/folder/d/0B6QdKq6q5WvFYldoNVFoakRSS0k/edit?pli=1

    ReplyDelete