Monday, April 9, 2012

देनिस, कॅल्विन आणि निकोला


 कधी कधी मनाची मरगळ घालवण्यासाठी मी लहान मुलांची पुस्तकं वाचते. लहान असताना मला आजी नेहमी अरेबियन नाईट्स वाचून दाखवायची. त्यातला ठेंगू कुबड्या, ताटलीएवढ्या मोठ्या डोळ्याचा कुत्रा, जादूचा दिवा आणि त्यातून येणारा अक्राळ विक्राळ जिनी या सगळ्यांनी माझ्या मनात जणू एक सिनेमा उभा केला होता. तसंच इसापनीती, पंचतंत्र, अकबर आणि बिरबल या सगळ्या गोष्टीदेखील लाडक्या असायच्या. पण थोडी मोठी झाल्यावर जेव्हा मी स्वत: पुस्तकं वाचू लागले, तेव्हा मात्र मला मुलांसाठी लिहिलेल्या या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींपेक्षा, मुलांच्या आयुष्याबद्दल, मोठ्या माणसांनी, लहान मुलांच्या शब्दात लिहिलेल्या गोष्टी जास्त आवडू लागल्या.

यातलं मी कधीही न विसरू शकणारं उदाहरण म्हणजे देनिसच्या गोष्टी. देनिस हा साधारण सहा वर्षांचा रशियन मुलगा आहे. देनिस त्याच्या आई बाबांबरोबर सोविएत राजवटीतल्या काळातील रशियात राहतो. त्याचे आई बाबा, त्याचा मित्र मिष्का, मैत्रीण अनुष्का ही पुस्तकातली मुख्य पात्रं आहेत. हे पुस्तक वाचताना पहिल्यांदा विक्तर द्रागुनस्की हा मोठा माणूस आहे यावरच विश्वास बसत नाही. पुस्तकातली प्रत्येक कथा कुठल्याही सहा वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात घडू शकणारी आहे. माझी आवडती गोष्ट "बरोब्बर पंचवीस किलो". देनिस आणि मिष्का जत्रेत जातात. तिथे  एका खेळात, बरोब्बर पंचवीस किलो वजन असलेल्या मुलाला किंवा मुलीला बक्षिश मिळणार असतं. देनिसचं वजन पंचवीस किलोच्या जरा वर भरतं तर मिष्काचं पंचवीसच्या थोडं खाली! मग देनिस मिष्काचं वजन बरोब्बर पंचवीस किलो भरेपर्यंत त्याला लिंबू सरबत प्यायला लावतो.


 यातल्या काही गोष्टी नुसत्या मजेदार नसून थोड्या अंतर्मुख करायला लावणा-या आहेत. जेव्हा देनिसला छोटी बहिण होते, तेव्हा त्याच्या मनात तयार झालेलं छोटसं वादळ, सर्कशीत चेंडूवर चालणारी सुंदर मुलगी पाहून त्याला तिच्याबद्दल वाटणारं कौतुक/ आकर्षण, या सगळ्या हळुवार गोष्टी एखाद्या सहा वर्षाच्या मुलाच्या भाषेत लिहिण्याची प्रचंड प्रतिभा या पुस्तकात दिसते.


अमेरिकेतही असा एक लाडका सहा वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव कॅल्विन. कॅल्विन आणि हॉब्स ही कॉमिक स्ट्रिप १९८० - १९९० च्या सुमारास अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध झाली. कॅल्विनचे जनक बिल वॉटरसन हे ओहायो मधल्या कडाक्याच्या हिवाळ्यात लहानाचे मोठे झाले. त्यामुळे कॅल्विनच्या बाललीलांमध्ये बर्फाची माणसं बनवणं हा एक महत्वाचा उपक्रम आहे. कॅल्विनचा या सगळ्या खोड्यांतील सवंगडी म्हणजे हॉब्स -- त्याचा खेळण्यातला वाघ. हॉब्सचं वैशिष्ठ्य असं की  कॅल्विनच्या डोळ्यांना तो खराखुरा जिवंत वाघ दिसतो पण चित्राच्या पॅनेलमध्ये दुसरी कोणतीही व्यक्तिरेखा आली की हॉब्स निर्जीव खेळणं बनतो. ही कल्पना अत्यंत नाजूक आहे. आणि ती इतक्या जाणीवपूर्वक लोकांसमोर मांडणं फार अवघड आहे. पण आपल्या स्वत:च्याच लहानपणात डोकावून पाहिलं तर असे किती काल्पनिक सवंगडी सापडतील? लहान मुलांना काल्पनिक सवंगडी असू शकतात हे मोठं झाल्यावर समजणं (किंवा आपल्या लहानपणातून लक्षात राहणं) हीच कवीमनाची पहिली पावती आहे.



देनिसप्रमाणेच कॅल्विनचं आयुष्यदेखील कुठल्याही सहा वर्षांच्या मुलासारखं आहे. पण वॉटरसनकडे मोठ्यांनादेखील नीटसं न स्पष्ट करता येणारं तत्वज्ञान छोट्या कॅल्विनच्या तोंडी घालण्याचं कसब आहे. कॅल्विनच्या काही विनोदांतून वॉटरसनचं स्वत:चं निसर्गप्रेम, पशुप्रेम दिसून येतं. अर्थात, या स्ट्रिपमध्ये कॅल्विनला कुठेही कम्प्यूटरची बाधा झालेली दिसत नाही. सतत टी.व्ही बघायच्या त्याच्या हट्टालादेखील घरून शांतपणे विरोध केला जातो. आणि त्याच्या आई वडिलांची त्याला घरातून बाहेर खेळायला हाकलण्याची तळमळ आजच्या काळात जास्त उचलून धरली जाईल. एका स्ट्रिप मध्ये घरात मलूल चेह-यानी टी.व्ही बघणा-या कॅल्विनला हॉब्स सूर्यप्रकाश न मिळालेल्या फुलाची उपमा देतो. अशा छोट्या छोट्या कल्पनांमधून वॉटरसन मुलांनी बाहेर भटकावं, आणि त्यांना लहानपण तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम न होता घालवता यावं, याचे मनाला भिडणारे धडे देतात.


फ्रांसमधल्या सहा वर्षांच्या मुलाचं नाव निकोलस (निकोला) आहे. अस्टेरीक्सचे लेखक गॉसिनी आणि जॉ-जॅक सॉम्पे या दोन प्रतिभावंत चित्रकारांच्या सहयोगातून या पुस्तकांचा जन्म झाला. निकोलाचं आयुष्य १९६० च्या आसपासच्या फ्रांसमधून आलेलं आहे. त्याच्या शाळेतले मित्र, त्याचे चिडके शिक्षक (ज्यांना मोठा बटाटा असं नाव व्रात्य कारट्यांनी बहाल केलं आहे), निकोलचे आई बाबा अशी या पुस्तकांमधली "पात्रावळ" आहे. या पुस्तकांची खासियत म्हणजे अगदी लहान मुलं जशी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतात, तसेच या पुस्तकात पुन्हा पुन्हा तेच तेच रेफरन्सेस येतात. निकोला स्वत: या गोष्टी सांगतो त्यामुळे तो प्रत्येक पात्राची पुन्हा नव्याने ओळख करून देतो (जसं की "माझा मित्र अॅलेक -- जो सारखा खात असतो"). या पुस्तकात निकोलाच्या आई बाबांची त्याच्या आईच्या आईवरून होणारी भांडणंदेखील मजेदार आहेत. (जागतिक) "घरो घरी मातीच्या चुली"चा छान प्रत्यय येतो. पण या पुस्तकांची सगळ्यात सुंदर बाजू म्हणजे सॉम्पेची रेखाटनं. त्यांनी रेखाटलेली शाळेची इमारत ही इतकी बोलकी आहे की तिच्यात कुठल्याही देशातल्या मुलाच्या/मुलीच्या मनाला थेट त्यांच्या शाळेत घेऊन जायची ताकद आहे.

भारतात प्रथम बुक्स ही संस्था खास लहान मुलांच्या साहित्यासाठी काम करते. भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये दर्जेदार बालसाहित्य अनुवादित करायचा उपक्रम प्रथम बुक्सने हाती घेतला आहे. माझ्या नशिबाने मला यातील एका पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद करण्याची संधी मिळाली. आणि हा अनुवाद करताना, लहान मुलांना समजेल, आवडेल अशा इंग्रजीत, मराठीतले गोंडस शब्द तितक्याच गोंडसपणे अनुवादित करणं फार म्हणजे फार कठीण गेलं. पण ते करताना अतिशय आनंद मिळाला. काही दिवसांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं (लिंक). माधुरी पुरंदरेंनी लिहिलेलं बाबांच्या मिशा! विशेष म्हणजे या पुस्तकातली सगळी चित्रं देखील त्यांनीच काढली आहेत.
देनिस, कॅल्विन, निकोला आणि माधुरीच्या पुस्तकातली अनु या सगळ्या मुलांचे आनंद एकसारखे आहेत. आणि सोविएत बर्फात काय नाहीतर कॅपिटॅलिस्ट बर्फात काय, स्लेडवर बसून घसरगुंडी खेळण्यात येणारी मजा एकसारखीच! आणि विविध भाषांमधून या लहान मुलांच्या गोष्टी ऐकताना अबालवृद्धांना होणारा निरागस आनंदही एकसारखा. :)

Thursday, April 5, 2012

रहस्य चिंतामणी

चिता आणि चिंता यात फक्त एका टिंबाचा फरक आहे असं मला माझ्या आजीनी फार लहानपणीच सांगितलं होतं. अर्थात माझ्या आजीनी स्वत: चिंतेत पीएचडी केली होती हे सांगायला नको. आजोबादेखील त्याच वर्गवारीतले. मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. तो प्रवास मी एकटीने केला. पण मी मुंबईहून कॅलिफोर्नियाला पोहोचेपर्यंत माझ्या बाबाला एकीकडे बायको आणि दुसरीकडे सासरेबुवा असा चिंता टेनिसचा सामना बघावा लागला होता. आईदेखील भयंकर चिंता करते. आमच्या घरात वारसाहक्काने चिंता दिली जाते. मी अगदी लहानपणीपासूनच खूप चिंता करायचे. लहान असताना आईला यायला उशीर झाला की मला तिला अतिरेक्यांनी पकडून नेलंय अशी (ती परत येईपर्यंत) खात्री असायची. मग मी दरवाज्यात भोंगा पसरून बसायचे. बाबामुळे आपल्याला शाळेला पोहोचायला उशीर होईल या चिंतेतदेखील मी कैक सकाळी वाया घालवल्या. गणितात नापास होण्याची चिंता तर मी अजूनही करते. एकूणच नापास होण्याची चिंता ही माझ्या आयुष्यातील महाचिंता आहे. पण चिंता करणा-या लोकांचा एक गुण असा आहे की ते इतर चिंतामाणींना अगदी ठामपणे चिंतेवर मात करायचे उपाय सुचवू शकतात. आणि  "मला हे आयुष्यात खूप उशिरा कळलं म्हणून मी तुला सांगते", असंही असतं वरती.

ध्यान करणे (मराठीत मेडीटेशन) हा चिंतेवर जालीम उपाय आहे असं मला लहानपणापासून सांगण्यात आलं होतं. ध्यान करायचा पहिला प्रयोग मी चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात केला. तो अत्यंत असफल झाला हे सांगून काम होणार नाही. ध्यान करायच्या शिशुगटात जाण्याऐवेजी मी सरळ पीएचडीला बसले. दोन तास वेगवेगळे अवयव ढिले करत काय झालं पुढे काही समजलं नाही. अचानक एका फिरंगी तरुणीने "उठ आणि घरी जाऊन झोप" असं हलवून सांगितलं. उठल्यावर आजूबाजूचे इतर लोक तजेलदार झालेले दिसले. मी मात्र रात्री जास्त झालेल्या हवालदारासारखी उठले. माझं ते ध्यान बघून आजूबाजूच्या लोकांची चांगली करमणूक झाली असावी. मग आता यापुढे घरी सराव केल्याशिवाय अशा वर्गांना जायचं नाही असा मी पण केला. मग चिंतेवर मात करण्यासाठी मी सगळ्या प्रकारच्या ध्यानधारणेचा अभ्यास करू लागले.

फिरंगी लोक भारतीय संस्कृतीचं फिरंगायझेशन करण्यात तरबेज आहेत. जरा गुगलवर टिचकी मारली आणि माझ्या आजूबाजूला किती फिरंगी भारतीयांचा बुजबुजाट आहे हे लगेच माझ्या लक्षात आलं. ध्यान करणं उत्तम पण त्याजोडीला योगासनं करावीत असा मतप्रवाह दिसला. म्हणून मी आधी योगासनांच्या वर्गात गेले. भारतात मी दोनच प्रकारचे योगा असतात असं बघितलं होतं. पहिला प्रकार म्हणजे आजी योगा. हा प्रकार मी लहानपणी सकाळी उठल्या उठल्या आजीबरोबर करायचे. आणि दुसरा प्रकार म्हणजे छळ योगा. हा प्रकार सकाळी साडेपाचला उठून मी आई बाबांचे टोमणे झेलत करायचे. आमच्या ओळखीत एक काका योगासनांचे क्लास घ्यायचे. मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी हे वर्ग सुरु केले होते. त्यामुळे योगासनं म्हणजे दर दहा मिनिटांनी बारा सूर्यनमस्कार असं मला वाटायचं. असे सूर्यनमस्कार घालून घरी आल्यावर बोलायचीही शक्ती राहायची नाही.

पण ऑस्ट्रेलियात "हाथा" योगा, "विन्यासा" योगा, "अष्टांगा" योगा, "कुंडलिनी" योगा, झालच तर "हॉट" योगा आणि पावर योगा असे विविध प्रकार ऐकायला मिळाले. माझे पुण्यातले योगा काका कधीही मृदु आवाजात,"कनेक्ट टु युवर इनर पीस" वगैरे म्हणायचे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची योगासनं करायला मला फार मौज वाटू लागली. त्याच दरम्यात भारतात करीना कपूर पावर योगा करून हडकुळी झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून मला योगासनं करायची सवय लागली. ती सवय अजूनपर्यंत नशिबानी टिकून आहे.

दुस-यांसमोर इज्जतीचा फालुदा होऊ नये म्हणून मी मेडिटेशनची पॉडकास्ट ऐकू लागले. सुरुवातीला वातावरण निर्मितीसाठी मी भारतीय सुगंधाच्या उदबत्त्या लावून, भारतीय रजई अंथरून पद्मासन घालून ध्यान करायला बसायचे. मग एक एक सूचना ऐकून त्याप्रमाणे मनाला वळवण्याचा प्रयत्न करायचे.
श्वास आत कसा जातो, बाहेर कसा जातो याचं निरीक्षण करता करता कधी कधी माझं विमान भलतीकडेच उडू लागायचं.

म्म..आता मला माझं हृदय ऐकू येतंय..कसं ना! हृदय कायम चालू असतं. कुणी डिझाईन केलं असेल? असे पंप जर मनुष्य प्राण्याला बनवता आले तर सर्विसिंग नाही काही नाही! भारी.
शू!! चला आता परत ध्यान.
श्वास आत श्वास बाहेर. एक, दोन, तीन, चार..
जेवायला काय बरं करावं? किसलेल्या कोबीची कोशिंबीर? नको. कंटाळा आलाय डांएट करायचा. माझ्याच बाबतीत देवानी असं का केलं? कितीतरी लोक काय वाट्टेल ते खाऊन हडकुळे राहतात. माझ्याच नशिबी वजनवाढ का?
श्या. परत लिंक तुटली. श्वास आत, बाहेऽऽऽर! एक, दोन, तीन ..
कसला आवाज आहे हा? फ्रीज वाजतोय. कमाल आहे. हे जागेपणी कधीच लक्षात येत नाही. कशानी बरं वाजत असेल फ्रीज? शी! आणि टीप टीप काय आवाज येतोय? मला नळ गळलेले अजिबात आवडत नाहीत. बंद करावा का नळ? त्यापेक्षा टीप टीप तालावर श्वास घेऊया.
शुश! श्वास आत बाहेर. एक, दोन, तीन...


काही दिवसांनी या अशा फुटकळ ध्यानधरणेच्या जोडीला पॉझीटीव थिंकिंग सुरु केलं.
क्षमा, दया, शांती वगैरे जुन्या मराठी सिनेमातल्या नट्यांची जोपासना करायला सुरुवात केली. वाटतं खरं, पण या सगळ्या सात्विक विचारांनी अगदी दमायला होतं. मग कधी कधी माझं मन बुद्ध धर्माची ही कैद फोडून वाट्टेल तसा गोंधळ घालू लागायचं. लहानपणी एकदा आम्ही मांजराला कपाटात कोंडून ठेवायचा एक खेळ सुरु केला होता. त्यात अर्धा तास कपाटात कोंडलेलं मांजर बाहेर आल्या आल्या दिसेल त्या पहिल्या व्यक्तीला बोचकारायचं. तसंच माझं मनही या सात्विक विचारांच्या पिंज-यातून बाहेर आल्यावर दिसलेल्या पहिल्या व्यक्ती अगर वस्तूला नांगी मारायचं. मग काही दिवस मी त्याच्यावर संस्कार करायचे नाही. पण मग पुन्हा चिंताबाई सकाळच्या एसटीत बसून डोक्यात राहायला यायच्या. पुनश्च ध्यानधारणेचा निश्चय व्हायचा. पुन्हा उदबत्त्या बाहेर यायच्या.

हिंदू/बुद्ध धर्मात सांगितलेल्या पुनर्जन्माला सगळे नास्तिक पहिल्यांदा आरोपीच्या पिंज-यात उभं करतात. पण अशी किती वर्तुळं पुन्हा पुन्हा आपल्या एकाच आयुष्यात येत असतात. आणि अशी कित्येक छोटी वर्तुळं छेदून आपल्या आयुष्यातले छोटे छोटे मोक्ष आपल्या वाट्याला येत असतात. चुकांचे, चिंतांचे, संभ्रमाचे, आसक्तीचे असे कित्येक  पुनर्जन्म या एकाच आयुष्यात पाहायला मिळतात. आणि  दोन विचारांमधल्या त्या रिकाम्या जागेला लांबवण्यातच ध्यान करायची पहिली छोटी पायरी लपलेली असते. पण त्या जागा पकडायला नक्की मनाला चपळ बनवावं की त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हेच कळत नाही. पण जेव्हा त्या जागा सापडतात तेव्हा अगदी नॅनो सेकंद का असेना, पण प्रार्थनेचं एक छोटंसं प्रतिबिंब आपल्या अंतरंगात दिसतं.

कधी कधी मनाला यशस्वीपणे गप्प बसवल्यावर आपण जेव्हा "मी" म्हणतो, तेव्हा आपण नक्की कशाला मी म्हणतो असा प्रश्न पडतो. मी म्हणजे अव्याहतपणे धडधडणारं हृदय आहे, माझ्या या जगातील अस्तित्वाला लय देणारा माझा वफादार श्वास आहे, की मला हे सगळं पुन्हा पुन्हा साठवून, गोठवून लिहायला लावणारं मन आहे? असे सुंदर, शांत विचार करताना जे मन माझी साथ देतं ते कधी कधी चिंतेच्या भोव-यात कसं काय अडकतं? आणि जसं माझ्या श्वासावर, हृदयावर मला बोट ठेवता येतं तसं माझ्या मनावर का बरं ठेवता येत नाही? आणि तरीही अदृश्यपणे माझ्या सगळ्या जाणिवांना, आनंदाला, चिंतेला आणि विचारला ते कसं काय स्वत:च्या काबूत ठेवतं?