Tuesday, May 10, 2016

द मॅन हू न्यू इन्फिनिटी

खूप दिवसांपासून बघायची उत्सुकता असलेला 'द मॅन हू न्यू इन्फिनिटी ' काल पहिला.
ही कथा मद्रासमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (देव पटेल) यांची आहे. चित्रपटाची सुरुवात रामानुजन यांना वेळोवेळी येणाऱ्या अपयशांनी होते. गणितात कुठल्याही प्रकारची पदवी नसताना रामानुजन यांनी कित्येक सिद्धांतांची मांडणी केलेली असते. त्याला योग्य असा वाचक त्यांना मद्रासमध्ये मिळत नसतो. त्यातच त्यांना नोकरीची अत्यंत गरज असल्याने रोज दारोदारी नोकरी मागायला जायची त्यांच्यावर वेळ आलेली असते. या प्रयासात त्यांना एका ब्रिटीश कंपनीत क्लार्कची नोकरी मिळते. त्यांच्या ब्रिटीश साहेबाच्या (स्टेफेन फ्राय) ओळखीतून ते आपलं गणिताचं काम केम्ब्रिजमधील प्रोफेसर हार्डी (जेरेमी आयर्नस) यांच्याकडे पाठवतात. आणि त्यांना केम्ब्रिजमध्ये शिकण्याचे आमंत्रण येते. त्यांचं तिथलं आयुष्य आणि बायको आणि आईपासून दूर राहून झालेली जीवाची घालमेल, यावर हा चित्रपट केंद्रित आहे. रामानुजन बत्तिसाव्या वर्षी गेले. पण या कमी वेळात त्यांनी ३९०० सिद्धांत मांडले. त्यांच्या या अभूतपूर्व कारकिर्दीबद्दल कित्येक मुरलेल्या गणितज्ञांनी आश्चर्य आणि आदर व्यक्त केला आहे. त्यांचे काही सिद्धांत अगदी अलीकडच्या काळात, जेव्हा तंत्राद्यान पुढे गेले, तेव्हा वापरले जाऊ लागले.
चित्रपटाची मांडणी अगदी साधी असली तरी रामानुजन आणि त्यांचे गाईड यांच्यातील फरक आणि द्वंद्व मनाला स्पर्श करून जातं. मायभूमी सोडून, ते देखील अशा काळात जेव्हा ब्राम्हणांना सागरोलंघन निषिद्ध होतं, शिकायला परक्या देशात जाणे सोपे नाही. एका लहान मुलाची झटपट पुढे जाण्याची अधीरता आणि त्याला दिशा देणाऱ्या गाईडचा शांत सयंम यातील विरोध दोन्ही कलाकारांनी सहजतेने रेखाटलाय. सुरुवातीला प्रचंड उत्साहानी पेपर पब्लिश करायला सज्ज रामानुजन, त्यांना इतर मुलांबरोबर लेक्चरला बसावे लागेल हे कळल्यावर प्रचंड उद्विग्न होतात. त्यांना त्यांचे सिद्धांत डोळ्यासमोर दिसायचे. पण एखाद्या शास्त्रज्ञासारखे त्यांना ते सिद्ध करायचे प्रशिक्षण नव्हते. पण त्यांना ते सिद्ध करायची गरज वाटायची नाही. त्यांना जे उमगलंय ते खरंच आहे असा दांडगा आत्मविश्वास त्यांना होता आणि यातूनच त्यांच्यात आणि त्यांच्या गाईडमध्ये पहिली ठिणगी पडते. अर्थात हे सादर करताना इंग्लिश पद्धतीने कमीत कमी भावना व्यक्त करून केलेलं असल्यामुळे ते मनाला अधिकच भावतं. एखादा अंकांच्या, आणि एक्स आणि वायच्या महाजालात हरवलेला गणितज्ञ भावनेसाठी मनात फारशी जागा ठेऊ शकत नाही. आणि जरी आपल्या विद्यार्थ्याला भावना अनावर होतायत हे त्याला समजलं, तरी तो त्याबद्दल काय करावं या बाबतीत संभ्रमितच असतो. पण आपण जे करतो आहोत ते आपल्या विद्यार्थ्याच्या भल्यासाठी आहे याबद्दल मात्र त्यांना संपूर्ण खात्री असते. दोन गणितज्ञांमधली ही भावनिक देवाणघेवाण, त्यातही एक आस्तिक आणि एक नास्तिक अशी, फार हळुवारपणे पण तितक्याच ताकदीने मांडली आहे. शेवटी मृत्युशय्येवर पडलेल्या आपल्या शिष्यासाठी डोळ्यात प्राण आणून लढणारा गाईड पाहून भरून येतं.
प्रेमासारखंच (सध्याचा सैराट ज्यासाठी चर्चेत आहे), गुरु-शिष्याचे नातं देखील युनिव्हर्सल आहे. सगळेच नातेसंबंध एका अर्थानी युनिव्हर्सल आहेत. पण गुरु-शिष्याच्या नात्यात येणाऱ्या सीमारेषा जरा जास्त ठळक असतात. तिथे असं वाट्टेल तेव्हा हातात हात घेता येत नाहीत, किंवा आपल्यामुळेच चिडलेल्या, रुसलेल्या आपल्या शिष्याची समजूत काढायला, त्याला खिशातून चॉकलेट काढून देता येत नाही. त्याच्या खाजगी आयुष्यातील तिढ्यांना सहजतेने हात घालता येत नाही. आणि शिष्यालासुद्धा गुरुवारची श्रद्धा सोडून कुठल्याही प्रकारची यशाची हमी नसते. गुरु-शिष्य मिळून करतील तेवढंच त्यांचं संचित.
पण जेव्हा शिष्य रामानुजन असतात तेव्हा त्या संचिताचा उपयोग पुढच्या अनेक पिढ्यांना होतो.

No comments:

Post a Comment