सोळा वर्षाची असल्यापासून मी बारीक राहायचा प्रयत्न करत आहे (आता बारीक होण्याचा म्हणावं लागेल). या वर्षी माझ्या या प्रयत्नांना सोळा वर्षं होतील. त्यामुळे पंचविशी ओलांडून अचानक सुटलेल्या माझ्या समवयस्क मित्र मैत्रिणींपेक्षा माझा अनुभव (माझ्यासारखाच) दांडगा आहे. पण हल्ली हल्लीच मला अचानक वजन वाढीच्या बोधी वृक्षाखाली बसल्याचा अनुभव आला आहे.
पूर्वी वजन कमी करायचे ठराविकच मार्ग होते. त्यात कुठल्यातरी जिम मध्ये वजन कमी करायचा प्रोग्रॅम घ्यायचा. यात तीन, सहा महिने किंवा एक वर्षं असे पैसे भरायचे. डाएटीशियनच्या रोज शिव्या खायच्या. आणि कसेतरी करत ठरलेल्या वजनाच्या जवळपास यायचे. पण तो सगळा प्रकार नकोसा होता. जिम मोठं, नावाजलेलं असेल तर हमखास तिथे इतर लोकांचे बिफोर आणि आफ्टर फोटो असायचे. मधेच कुठल्यातरी डीटॉक्स प्लानवर सूट आहे म्हणून आम्ही त्याचे पैसे भारायचो आणि आठवडाभर नशिबाला शिव्या देत, या भाजीचा रस, त्या फळाचा रस पीत बसायचो. पण जिम सुटलं की वर्षाच्या आत पुन्हा गाल वर यायचे. पुन्हा हेच सगळं सुरु.
याची दुसरी पायरी म्हणजे पर्सनल ट्रेनर. आमच्या जिममध्ये कळा शर्ट घातलेले ट्रेनर पर्सनल ट्रेनर असायचे. म्हणजे तुमच्या जिमच्या वेळात ते तुम्हाला सोडून कुठ्ठे कुठ्ठे जाणार नाहीत. फक्त त्यासाठी तुम्ही सहा एक हजार महिना ज्यादा भरायचे. आणि लाल शर्ट मधले ट्रेनर -- आपण त्यांनी इम्पर्सनल ट्रेनर म्हणू. हे लोक ज्यांनी सहा हजार रुपये भरले नाहीत त्यांच्यासाठी. पण ते कधीही त्यांचं काम मन लावून करत नाहीत. त्यांचे डोळे सदैव आपल्याला कळा शर्ट कधी मिळणार याच्याकडे लागलेले. त्यामुळे पर्सनल ट्रेनर घेतला नाही तर मनासारखा व्यायाम होत नाही आणि मग डाएटचा तरी काय उपयोग? असं म्हणून नुसताच व्यायाम करायचा. मग काळा शर्टवाला, "मॅडम तुम्ही वेटलॉस पॅकेज का नाही घेत", असं म्हणायचा. त्याचे ते शब्द कानावर आले की आपले एक आवर्तन पूर्ण झाले आहे याचा साक्षात्कार व्हायचा. अशी कित्येक अमावस्या पौर्णिमा आवर्तनं मी बघितली आहेत.
पण हल्ली हल्लीच या सगळ्या रड्यामधून मला मोक्ष मिळाला आहे असं वाटायला लागलंय. कारण आता माझा पर्सनल ट्रेनर कायम माझ्या हातात असतो. तो म्हणजे माझा फोन! हल्ली "Activity Tracker", म्हणजेच आपली हालचाल मोजणारी यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. यात फिटबिट, जॉबोन, अंडर आर्मर अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मनगटावर बांधण्याचे पट्टे येतात. यात एक अक्सिलरोमीटर असतो, जो आपली दिवसभरातली हालचाल मोजतो. या हालचालीचं मोजमाप "पावलांमध्ये", म्हणजेच स्टेप्स मध्ये होतं. जपानी लोकांनी सगळ्यात आधी पेडोमीटर विकण्यासाठी रोज १०००० पावले चालण्याची संकल्पना रूढ केली. १०००० पावलं म्हणजे साधारण ५ मैल (८ किलोमीटर). रोज ८ किलोमीटर चालणे अर्थातच कुठल्याही ह्रिदयरोगतज्ञाच्या परीक्षेत पासच होईल. त्यामुळे आता या पद्धतीचा सर्वत्र प्रचार बघायला मिळतो. मनगटावरचा हा पट्टा ब्लू टुथद्वारे आपल्या फोनशी सतत बोलत असतो आणि दिवसभरात केलेली हालचाल एक छोटंसं ॲप उघडलं की लगेच डोळ्यासमोर दिसते. यात आपण चालण्याव्यतिरिक्त काय काय व्यायाम केला त्याची सुद्धा नोंद करता येते. आणि आपण ही सगळी हालचाल करून किती उष्मांक (कॅलरीज) जाळले हे ही आपल्याला तयार बघता येतं. अर्थात फक्त Activity Tracker घालून आणि १०००० पावलं (आणि व्यायाम करून) बारीक होता येत नाही (हो! इथेही आपलं नशीब फुटकं आहेच). आपण किती कॅलरीज जाळल्या हे कळल्यामुळे फक्त एक छोटीशी पण अति महत्वाची गोष्ट आपल्याला करता येऊ शकते. ती म्हणजे रोजच्या रोज कुणाच्याही मदतीशिवाय खाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि गरजेनुसार त्यात स्वत: बदल करणे.
खरं तर वजन कमी करणे (बाकी कुठली शारीरिक कमतरता नसेल तर) साधं गणित आहे. १ पाउंड मेद कमी करायचं असेल तर ३५०० कॅलरीज जाळाव्या लागतात. म्हणजे किलोच्या किती? ७७००! स्त्रियांना कमीत कमी १२०० तर पुरुषांना कमीत कमीत १५०० कॅलरीज दिवसाला घेतल्याच पाहिजेत. तसं न केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. "त्यामुळे १५ दिवसात ६ किलो कमी करा" वगैरे जाहिराती इथेच निकालात लागल्या. आपण एका आठवड्याचं गणित मांडू. जर एका आठवड्यात आहे त्यापेक्षा १ किलोने कमी व्हायचे असेल तर आठवड्याभरात ७७०० कॅलरीज कमी खाल्ल्या पाहिजेत. समजा तुम्ही रोज ३००० कॅलरीज खाताय, तर सरासरी रोज ११०० कॅलरीज कमी खाल्ल्या तर एका आठवड्यात तुमचे वजन १ किलोनी कमी होऊ शकते. यातील अडचण तिथे येते जिथे तुमचा रोजचा आहाराच कमी असतो आणि तरी तुमचे वजन कमी होत नसते. इथे आहार तज्ञांना भेटणे अनिवार्य आहे. कारण आपण किती कॅलरीज खातो तितकंच त्या कुठून येतात हे ही महत्वाचं आहे. आणि त्या कुठून कमी करायच्या हेदेखील.
पण नुसतं खाणं कमी करून सगळं वजन कमी करण्यापेक्षा व्यायाम करून तुम्ही तुमचं कॅलरी बजेट वाढवू शकता. समजा तुम्हाला रोज ११०० कॅलरीज कमी खायच्या आहेत. हे तुम्ही सरळ तेवढ्या प्रमाणात खाणं कमी करून करू शकता किंवा अर्धं खाणं कमी करून आणि बाकीचं व्यायामानी असंही करू शकता. ते कसं? साधारण १ किलोमीटर चालण्यानी ६२ कॅलरीज जळतात. त्यामुळे ५५० जाळायला ९ किलोमीटर (६किमी/तास प्रमाणे दीड तास) चालावे लागेल. हेच जर तुम्ही २२-२५ किमी/तास इतक्या वेगानी व्यायामाची सायकल चालवलीत तर अर्ध्या तासातच तुमच्या ५०० कॅलरीज होतील. याचा अर्थं, जसं काय खातो यावर वजन वाढणे आणि कमी होणे अवलंबून आहे, तसंच कुठला व्यायाम आणि कितीवेळ करतो, यावरदेखील वजन कमी होणे अवलंबून आहे. भारतीय पद्धतीची योगासनं, ताण तणाव कमी करणे आणि लवचिकता टिकवून राहणे यासाठी अतिशय चांगली असली, तरी त्यातून कारडीयो व्यायाम फारसा होत नाही. तसंच जिम मध्ये वजन उचलणे शरीराच्या चिरकाल आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे, पण ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी किमान ४५ मिनिट दरदरून घाम येईल असा व्यायाम करणे आवश्यक आहे.
हे सगळं मोजमाप करण्यासाठी आता तज्ञांची सारखी मदत लागत नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की आहाराबद्दलचे निर्णय सगळे आपणच घ्यावेत. आपण जेव्हा स्वत:वर लक्ष ठेवतो तेव्हा त्या प्रक्रियेत थोडा बायस येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे वजन कमी करायच्या मार्गावर असताना आहार तज्ञांना भेटणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी असेल तर जिम लावण्याआधी डॉक्टरचा सल्ला घेणेदेखील गरजेचे आहे.
पण एकदा प्रवास सुरु झाला की रोजच्या रोज काही ॲप्स वापरून आहाराचं आणि व्यायामाचं मोजमाप करता येतं. आहार लिहून ठेवायसाठी माय फिटनेस पॅल हे ॲप मला अत्तापर्यंत वापरलेल्या सगळ्या ॲप्समध्ये सरस वाटले. याचं महत्वाचं कारण हे की या ॲपमध्ये भारतीय पदार्थांच्या कॅलरीज सोप्या पद्धतीने शोधता येतात. आणि जगभरातील लोकांनी आपापल्या पाककृतींच्या नोंदी यात आधीच करून ठेवल्या आहेत. हे वापरायला देखील अतिशय सोपे आहे. व्यायाम मोजण्याचे मला भावलेले ॲप म्हणजे मॅप माय फिटनेस. यात तुम्ही दिवसभरात केलेला व्यायाम, घेतलेल्या स्टेप्स, खालेल्या कॅलरीज आणि विश्रांती या सगळ्याचं एक सोपं ग्राफिक बघायला मिळतं. या व्यतिरिक्त तुमच्या activity tracker चं स्वत:चं असं एकॲप आहेच. ही सगळी अॅप्स आपण काहीही न करता एकमेकांशी आपली माहिती शेयर करतात. त्यामुळे इकडून तिकडे माहिती टाकायचे कष्टदेखील घ्यावे लागत नाहीत. हल्ली वायफायला जोडता येणारे वजनकाटे पण मिळतात. ते अचूक ठरलेल्या वेळी आपले त्या दिवशीचे वजन आपल्या फोनकडे पाठवतात.
आता साहजिक प्रश्न, "एवढं मोजमाप कशाला करायचं?"
याचं उत्तर असं आहे, की जी व्यक्ती दिवसातून तासाभरापेक्षा जास्त दमवून टाकणारी हालचाल करते किंवा व्यायाम करते, तिला मोजमापाची गरज नाही. पण जर तुम्ही व्यायामासाठीदेखील वेळ काढायला घडाळ्याशी मारामारी करत असाल, आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर काटेकोर मोजमाप, प्रचंड धीर आणि पुन्हा पुन्हा शून्यातून सुरू करायची जिद्द, या तिन्हींची नक्कीच गरज आहे.
फोन आणि सोशल मिडियामुळे लोक किती बिघडलेत हे रोजच कानावर येतं. आणि काही अंशी ते सत्य आहे. पण आज तंत्रद्यानाचा योग्य उपयोग करून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, तेदेखील अगदी कमी खर्चात, हा आजच्या काळातील एक उपयुक्त बदल आहे. एखादं activity tracker अगदी कमीत कमी दीड हजार ते जास्तीत जास्त वीस हजारमध्ये येऊ शकतं. पण जिमला आणि वेट लॉस प्रोग्रॅम साठी यापेक्षा कितीतरी जास्त वार्षिक फी भरावी लागते. आणि जरी तुम्ही तुमचा ट्रॅकर वापरणं बंद केलं, तरी पुन्हा कधीही डोक्यात वजन कमी करायचा किडा आला, तरी तुम्ही लगेच तो वापरायला सुरुवात करू शकता. त्या जोडीला वापरली जाणारी सगळी अॅप्स विनामुल्य डाउनलोड करता येतात. त्यामुळे ज्यांना पुन्हा वजन कमी करायच्या मायाजालात उतरायचे आहे त्यांच्यासाठी हा एक कमी जोखमीचा मध्य मार्ग नक्कीच बनू शकतो!