Wednesday, December 14, 2016

नोटबंदी आणि भ्रष्टाचार

गेला महिनाभर नोटबंदी आणि त्यातून जन्माला आलेल्या विविध अपत्यांचा अभ्यास आपण सगळेच करतोय.
निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य, त्याची अंमलबजावणी चांगली की वाईट, आणि त्याचे पुढील परिणाम कसे होतील यावर प्रचंड आणि दमवून टाकणारी चर्चा झाली आहे. पण नोटबंदी चालू असतानाच, हा निर्णय जे बंद करण्यासाठी घेतला आहे त्यालाच तो प्रोत्साहन देऊ लागलाय हे उघड व्हायला लागलेलं आहे, याचं अगदी भक्त सुद्धा समर्थन करतील. तो म्हणजे भ्रष्टाचार.
नोटबंदी जाहीर केल्यापासून दर दिवसाला सरकार नियम बदलू लागले. पहिला एक आठवडा कुठल्याही व्यक्तीला रोख जुन्या नोटांच्या बदली नव्या नोटा सगळ्या बँकेत मिळायच्या. यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागायचे. आठवड्याभरातच सरकारनी ते बंद केले कारण "काळा पैसा वाले काही नतद्रष्ट लोक", "भोळ्या भाबड्या गरिबांना" आपले पैसे घेऊन लाईनमध्ये उभे करत आहेत अशा बातम्या उघडकीला आल्या. रेल्वेची तिकिटे जुन्या नोटांनी काढायची परवानगीदेखील लगबगीने मागे घेण्यात आली कारण काही दुष्ट काळा पैसा बाळगणारे लोक जुन्या नोटांनी तिकिटं काढून ती लगेच रद्द करू लागले. परिणामी रेल्वेला नव्या नोटा रिफन्ड करता करता नाकी नऊ आले. गृहिणींच्या खात्यात अडीच लाखापर्यंत कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत या आश्वासनाचे एका आठवड्यातच धमकीत रूपांतर झाले. मग मधेच भारतीय बायकांच्या दागिन्यांच्या खणात डोकावण्याची इच्छादेखील व्यक्त झाली (अम्मांनी जाता जाता कान टोचले म्हणून बरं). त्यानंतर प्रधानमंत्रीजींच्या लाडक्या जनधन खात्यांना तंबी द्यावी लागली आणि आज अखेर तो दिवस आला, जेव्हा भ्रष्टाचार मुक्त अशा खाजगी बँकांवरदेखील छापे टाकण्याची वेळआली. महिनाभर ज्या (कॉपरेटिव्ह बँकांना डिवचून) बँकांचे मोदीजी गुणगान करत होते, त्यांच्याच दारी त्यांना पोलीस पाठवायची वेळ आली.
३५ दिवसांत सरकारने ५१ वेगळे वेगळे नियम तयार केले आणि मोडले. आणि त्यावरून सरकारला चांगलेच फैलावर घेण्यात आले आहे. अर्थात, या कोलांट्या उड्या सरकारच्या बेसावधपाणामुळेच झाल्या. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी घेतलेल्या एका निर्णयातून, गोरगरिबांनाही भ्रष्टाचार करू नका असं सांगायची जेव्हा वेळ येते, तेव्हा प्रश्न चूक बरोबर या चाकोरीच्या बाहेरून बघितला पाहिजे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना भ्रष्टाचार हा असा साधा सोपा काळा-गोरा विषय वाटतो. काही लोक भ्रष्ट असतात, विशेषतः काँग्रेसमधील जवळपास सगळेच लोक भ्रष्ट आहेत. भ्रष्ट लोकांनी साठ वर्षं सत्ता बळकावली आणि भारतात भ्रष्टाचार माजला. तो भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आणि साठ वर्षं साठलेली घाण साफ करण्यासाठी थोडी कळ सहन केली पाहिजे. आणि बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर रांगा लावून आपण देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा छोटासा त्याग करतोय.
पण या अशा लिनियर विचारसरणीचा एक फार मोठा धोका आहे. तो म्हणजे असा विचार करून त्यात समाधान मानताना आपण एका खूप मोठ्या धडधडीत वास्तवाकडे पाठ फिरवतोय. ते म्हणजे आपण सगळेच भ्रष्ट आहोत. पुढे जाऊन असं देखील म्हणता येईल की हिंदी सिनेमासारखी भ्रष्ट आणि इमानदार असे दोन गटदेखील नसतात. आपण सगळेच कधी कधी भ्रष्ट आणि कधी कधी इमानदार असतो. भ्रष्टाचार हा माणसाच्या विवेकावर जितका अवलंबून असतो तितकाच त्याच्या परिस्थितीवर देखील असतो. भ्रष्टाचार कधी घडतो? एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सत्ता मिळते. आणि सत्ताधारी असल्याचा फायदा घेऊन ती व्यक्ती भ्रष्टाचार करते. किंवा एखाद्या इमानदार व्यक्तीला सत्ता मिळते, जी टिकवण्यासाठी तिला आजूबाजूच्या दहा भ्रष्ट व्यक्तींच्या गुन्ह्याकडे कानाडोळा करावा लागतो. दोन देवाणघेवाण करणाऱ्या माणसांना एकाच सोयीच्या मार्गाने कर बुडवता येतो (रोकड देऊन) तेव्हा भ्रष्टाचार घडतो. किंवा निकाल काय लावायचा आहे हे आधीच ठरवून जेव्हा एखादा अभ्यास किंवा एखादा उपक्रम राबवला जातो तिथे भ्रष्टाचार घडतो.
जेव्हा आपण सत्ता हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गांधी टोपी, कडक स्टार्च केलेला कुडता, जॅकेट घालून लाल दिव्याच्या गाडीतून चाललेला राजकारणी डोळ्यासमोर येतो. पण नोटबंदी करून मोदींनी जनधन खाती बाळगणाऱ्या गरिबांच्या हाती देशाची आर्थिक सत्ता देऊन टाकली. जी व्यक्ती कर भरण्यास आजन्म पात्र नव्हती, जिला घाई गडबडीत कुठल्यातरी पुढच्या सोयीसाठी बँकेत खाते उघडावे लागले, आणि ते खाते चालू अवस्थेत ठेवण्यासाठी लागणारा पैसादेखील त्या व्यक्तीच्या हातात नाही, अशा व्यक्तींना आहेत ते पैसे खात्यावर जमा करायला भाग पाडून मोदींनी त्यांच्या हाती कधीही नसलेली सत्ता त्यांना मिळवून दिली. आणि अर्थातच भ्रष्टाचार घडण्यासारखी स्थिती निर्माण करून दिली.
जेव्हा एखादी गरीब व्यक्ती १०-२० % कमिशन घेऊन एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देते, तेव्हा त्या गुन्ह्याचे समर्थन करायला तिच्याकडे कित्येक भावनिक कारणे असतात. पण सगळ्यात महत्वाचे कारण हे असते की आजवर कुणीही त्यांच्या खात्यात एकरकमी दोन लाख टाकलेले नसतात. आणि इतक्या सोप्या मार्गाने त्यांना कधीही वीस हजार मिळालेले नसतात. कुठलेही तात्विक आवाहन हातात असलेल्या सोप्या वीस हजार रुपयांपुढे निष्प्रभ ठरते. आणि जनधन खात्यांपासून ते २ जी पर्यंत सगळ्या पातळ्यांवरच्या भ्रष्टाचाराला या एकाच मानसिकतेतून बघता येते. भ्रष्टाचार करण्यासारख्या परिस्थितीत आल्यावर भ्रष्टाचार न करणे अवघड असते. आणि मानवी सद्सदविवेकाचा जर बेल कर्व काढायचे कुणी कधी धाडस केले, तर सच्चे इमानदार लोक हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या बाहेर फेकले गेलेले आऊटलायर्स असतील.

Monday, October 3, 2016

पिंक -- रिफ्लेक्शन

१. तू लग्नानंतर सुद्धा नोकरी/व्यवसाय चालू ठेवणार का?
२. घर सांभाळून काय करायच्या त्या नोकऱ्या करा
३. अगं काहीही काम करत नाही ती घरात. सगळ्या कामांना बायका लावून ठेवल्यात.
४. हल्ली काय पाळणाघरात टाका मुलांना की ह्या मोकळ्या नोकऱ्या करायला.
५. टिकली लाव. मंगळसूत्र घाल. सौभाग्यवती आहेस ना तू? दिसायला नको?
६. असंच असतं. कामावरून उशिरा येते आणि मग नवरा यायच्या आधी फोनवरून जेवण मागवते. पैसा आहे ना हातात!
७. हल्ली तर काय रस्त्यात उभ्या राहून मुलीदेखील सिगारेटी ओढायला लागल्यात. मुलांबरोबर ड्रिंक्स घेतात. निर्लज्ज!
८. आमच्या सुनेला तर काहीही येत नव्हतं. स्वयंपाकघरात जायची वेळच आली नसेल कधी.
९. अहो माझा मुलगा रोज हिला हातात नाश्ता देतो! आणि मग ही जाते ऐटीत ऑफिसला. बिचारा बाई अली नाही तर भांडी पण घासतो.
१०. तुम्ही इतक्या उच्च पदावर पोहोचलात. हे तुम्ही पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळून कसं केलं?
११. तू लग्नानंतर आडनाव बदललं नाहीस?
तुम्ही ओळखलं असेल की हे सगळे प्रश्न किंवा कॉमेंट्स बायकांना विचारले जातात किंवा त्यांच्याबद्दल केल्या जातात. पण आता एक गंमत म्हणून आपण हे सगळे प्रश्न किंवा टिप्पण्या एखाद्या पुरुषाला डोक्यात ठेऊन करू. एखाद्या मुलाला एखाद्या मुलीनी लग्नाआधी जर, "तू लग्नानंतर नोकरी करणार का?' असा प्रश्न विचारला तर तो विनोद ठरेल. नोकरी (आणि पगार) ही मुलाची लग्नाची (आणि कधी कधी हुंड्याची) लायकी ठरवते. तीच जर त्याला सोडावी लागली तर काय उपयोग. एखाद्या सासूनी आपल्या जावयाबद्दल चार चौघात, "याला काहीच स्वयंपाक यायचा नाही लग्नात. सगळं मी शिकवलं", असे उद्गार काढले तर कसं वाटेल? पुरुष घरातून बाहेर पडताना कधी "आपलं लग्न झालय" हे दाखवायला टिकली मंगळसूत्र घालून जातात का? रस्त्यात असंख्य ठिकाणी पुरुष मजेत सिगारेट ओढताना दिसतात. तंबाखू स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक करते का? दोघांनाही ती तितकीच घातक आहे. पण एखाद्या स्त्रीने सिगारेट ओढली की ती तिच्या आरोग्याचा नाही तर चारित्र्याचा निकष बनते. इंद्रा नूयी सारख्या महिलेला हमखास तुम्ही घर सांभाळून हे कसं जमवलं हा प्रश्न विचारला जातो. पण सुंदर पिचाईचं देखील घर कुणीतरी सांभाळत असतं म्हणून तो निर्धास्तपणे गूगलचा सीईओ होतो. पण स्त्रीला मदत करणाऱ्यांची (विशेष करून सासरच्यांची) नावे आणि त्यांच्याप्रती त्या स्त्रीला असलेली अपार कृतज्ञता ही त्या काळ्या शाईत उमटलीच पाहिजे.
आपल्या समाजातील या आणि अशा कितीतरी ढोंगी रूढींना पिंक हा सिनेमा वाचा फोडतो. पिंक खरंतर एका ठराविक विषयाभोवती फिरतो. तो म्हणजे स्त्रीने पुरुषाला कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास दिलेली अनुमती. ती अनुमती तिच्या कपड्यांमधून, तिच्या सवयी बघून, तिचे किती मित्र आहेत आणि ते "तसे" आहेत का हे बघून, तिनी आधी हे (कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर) अनुभवलंय म्हणून, अशा आणि यासारख्या इतर कुठल्याही कारणांनी परस्पर मिळत नाही. आणि स्त्री नाही म्हणत असताना तिच्याशी कुठल्याही मार्गाने (यात मानसिक ताणही आहे) ठेवलेले संबंध हे शोषणच आहे. तसंच तिनी आधी दिलेल्या आणि काही कारणांनी परत घेतलेल्या अनुमतीला डावलून तिच्यावर जबरदस्ती करणे हेदेखील शोषण आहे.
दिल्लीत एका घरात रूममेट्स म्हणून राहणाऱ्या, नोकरी करणाऱ्या मुलींची ही गोष्ट आहे. ओळखीच्या मुलाच्या मित्रांबरोबर रात्री डिनर आणि ड्रिंक्ससाठी त्या जातात आणि त्या रात्री जे घडते त्याचा पोलीस कम्प्लेंट कोर्टकचेरीपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवलाय. अमिताभ बच्चन यांचा अभिनय या चित्रपटाचा कणा आहे. त्यांचे बोलके डोळे, संयमित अभिनय आणि दमदार आवाज यांच्या जोरावर आधीच चांगलं असलेलं कथानक उत्कृष्ट बनून जातं. हा सिनेमा बघताना पुन्हा पुन्हा जाणवतं की अभिनय कंट्रोल केल्यानी त्याचा परिणाम सगळंच व्यक्त केल्यापेक्षा कितीतरी जास्त होतो. पण तो कसा कंट्रोल करायचा हे अमिताभ बच्चनच जाणे! तापसी पन्नू आणि इतर मुली यांचा अभिनयदेखील वाखाणण्याजोगा आहे.
या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की बाहेर आल्यावर त्यावर बराच वेळ विचार केला जातो. आणि विषय जरी बलात्कार किंवा विनयभंगापुरता मर्यादित असला तरी तिथपर्यंत जाण्यात समाजच कारणीभूत आहे हे पुन्हा पुन्हा जाणवतं. सिनेमात तापसी पन्नू पोलिसात कम्प्लेंट करायला जाते तो सीनदेखील सिनेमागृहातील लोकांच्या मानसिकतेचा आरसा बनतो. पोलीस तिला तिनी कम्प्लेंट कशी करू नये आणि त्याचे कसे तिच्यावरच वाईट परिणाम होतील हे समजावू लागतात. आणि तसं करत असताना अतिशय निर्लज्जपणे वेगवेगळी उदाहरणे देऊन (तिच्या मैत्रिणीला "एक्सपीरियन्सड" संबोधून ) तिला तो परावृत्त करताना दाखवला आहे. त्याच्या प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो.
पिता रक्षति कौमार्ये, पती रक्षति यौवने ।
पुत्रो रक्षति वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती ।।
स्त्री आपली आई, बहीण किंवा बायको असेल तर तिची रक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे, या "पारंपरिक" विचारातून स्त्री स्वत:चे रक्षण करू शकत नाही आणि तिचे रक्षण करणारा पुरुष नसेल तर ती आपली मालमत्ता होते इथपर्यंत आपण कधी पोचलो हे विचार करण्याजोगे आहे. याही पुढे जाऊन जी स्त्री स्वतंत्रपणे जगू इच्छिते तिचा द्वेष करण्याची सुद्धा परंपरा आपल्यामध्ये आलेली आहे. आणि या मोठ्या मोठ्या अपराधांना सुरुवात करून देणारे छोटे छोटे किस्से असतात जे लहानपणापासून पुरुष बघत असतात. यातील पहिला संस्कार म्हणजे आपल्या सुनेच्या किंवा बायकोच्या पोटातील जीव पुरुष असावा यासाठी केलेला धार्मिक, शारीरिक आणि तांत्रिक अट्टाहास. आणि दुःखाची गोष्ट अशी की या अट्टाहासात स्त्रियादेखील भाग घेतात. स्त्रियांना मुली (नाती) नको असणे हे आपल्या समाजाचे सगळ्यात मोठे अपयश आहे. आणि मुलींना सबळ केल्याने मुलांवर आलेल्या अवास्तव अपेक्षा कमी कारण्यासदेखील मदत होईल. एखाद्या पुरुषाला घरी बसून आपल्या मुलांची काळजी घेणे जास्त प्रिय असेल तर त्याला ते करायचीही मुभा मिळाली पाहिजे.
हे बदलायचे असेल तर काही सुभाषितांना निवृत्त करून नव्याने सामाजिक घडी बसवली पाहिजे. आणि पिंक सारखे चित्रपट बनतायत आणि आवर्जून बघितले जातायत यातच तिची सुरुवात आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर पाहावा असा चित्रपट आहे.

Monday, September 26, 2016

इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन

एप्रिल २०१६ पासून मी १० किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात. कित्येक लठ्ठ व्यक्ती आपण लठ्ठ आहोत म्हणून आधीपासूनच आहाराविषयी जागरूक असतात. जिम मध्ये जाणाऱ्या आणि शारीरिक हालचाल करण्याऱ्या कित्येक व्यक्ती लठ्ठच असतात. त्यामुळे लठ्ठ असूनसुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि आहार घेणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. एखाद्या लठ्ठ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असं कळलं की आपोआप वजन कमी करायचा सल्ला मिळतो. पण जी व्यक्ती बारीक आहे, आणि हृदयरोगी आहे किंवा जिला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत, त्यांना तोच सल्ला दिला जात नाही. त्यांना आहार बदलायचा सल्ला मिळतो. अर्थात, या सगळ्या व्याधी फक्त लठ्ठ व्यक्तींना होतात हे सतत केले जाणारे विधान फारसे बरोबर नाही. लठ्ठपणा या व्याधींना आमंत्रण देतो हे जरी खरं असलं तरी सगळ्या लठ्ठ व्यक्ती याला बळी पडत नाहीत आणि अचानक हृदयविकार होणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येत नाही.
प्रेग्नन्सीमध्ये मला गर्भधारणेत होणारा (आणि नंतर ताब्यात येणारा) डायबेटीस झाला. माझ्या डॉक्टरनी मला व्यायाम आणि आहार या दोन्हीच्या मदतीने तो ताब्यात ठेवायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे साडे आठ महिन्यापर्यंत मी रोज ३० मिनटं पोहायचे. आणि साखर, फळं आणि कर्बोदके कमी करून मी साखर ताब्यात ठेवली. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की जर ही व्याधी कायमची पदरात पडली तर आहार किती नियमित ठेवावा लागेल. आणि माझ्या वडिलांना टाईप १ डायबेटीस असल्यामुळे ती शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. म्हणून वजन कमी करण्याचा आत्ताचा प्रवास हा फारच अभ्यासपूर्ण होता.
नवव्या महिन्यापासूनच मी ऋजुता दिवेकर इत्यादी लोकांची पुस्तकं वाचू लागले आणि माझा मुलगा झाल्यावर सहा महिन्यांनी ते सगळे सल्ले अमलात आणू लागले. पण बाळ असल्यामुळे मला पूर्वीसारखा दोन दोन तास व्यायाम करता यायचा नाही आणि घरातून बाहेरदेखील पडता यायचं नाही. ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली. पण सतत डाएट करूनही आणि चालणे वगैरे व्यायाम करूनही काही केल्या माझं वजन कमी होत नव्हतं. म्हणून मी शरीरातील मेद साठवणाऱ्या आणि वितळवणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करायचं ठरवलं. तसं करायला लागल्यावर मला कित्येक साक्षात्कार झाले. आणि कुठल्याही जिम ची मेंबर न होता किंवा डाएटिशियनचा सल्ला न घेता मी हा प्रवास करू शकले. या मागे दोन कारणं आहेत:
१. डाएटबद्दल डाएटिशियन्स मध्येच असलेले काही समज जे आता शास्त्रीय दृष्ट्या चुकीचे ठरलेले आहेत
२. वजन कमी करण्यासाठी व्यायामाला दिलेलं अतिमहत्व
वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.
इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.
फक्त खाण्याचा विचार केला तर शरीराच्या दोन अवस्था होतात. एक म्हणजे पोट भरलेली अवस्था आणि उपाशी अवस्था. इन्सुलिन हे मेजवानीचे संप्रेरक आहे तर ग्लुकागॉन हे दुष्काळाचे संप्रेरक आहे. या दोघांचे एकमेकांशी असलेले नाते सीसॉ सारखे असते. याचा अर्थ जेव्हा शरीरात कर्बोदकांचा प्रवेश होऊन इन्सुलिन वर जाते, तेव्हा ग्लुकागॉन सिक्रीट होऊ शकत नाही आणि परिणामी साठवलेलं ग्लायकोजेन, फॅट वापरलं जाऊ शकत नाही. जेव्हा खाल्लेलं अन्न पचवून इन्सुलिन चे प्रमाण कमी होते आणि शरीरात काही काळ दुष्काळ तयार होतो, तेव्हाच ग्लुकागॉन त्याचे काम करून चरबी वापरू शकते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर इन्सुलिन वाढवणारे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत किंवा दिवसातील काही भाग उपाशी राहिलं पाहिजे.
कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही.
दर दोन तासांनी खाणं ही डाएट स्ट्रॅटेजी नापास होते यावर हल्ली बरंच संशोधन झालेलं आहे. आणि यातूनच इंटरमिटंट फास्टिंग हे हाय फाय नाव असलेलं पण भारतीयांना परिचित डाएट उदयास येत आहे. यात शरीराला रोज (किंवा आठवड्यातून काही दिवस) १६ ते २० तासांचे संपूर्ण लंघन देतात. म्हणजे दिवसभरासाठी ठरवलेली कर्बोदके आणि इतर घटक ४-८ तासात खाऊन उरलेले सगळे तास फक्त पाणी, कोरा चहा किंवा कोरी कॉफी पिणे. यामुळे शरीरात ग्लुकागॉन तयार होण्याची स्थिती तयार होते आणि फॅटचे विघटन होते. ही पद्धती आधी अवघड वाटली तरी एकदा सवय झाल्यावर कुठल्याही वातावरणात न मोडता वापरता येते. लंघन केल्यामुळे झोपेत सुधारणा होते (सुधारणा याचा अर्थ अतिझोपचे प्रमाण कमी होते). आणि मुख्य म्हणजे दोन वेळा पोटभर खाता येते. इंटरमिटंट फास्टिंग लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोक आठवड्यातील दोन दिवस ५०० कॅलरीज खातात आणि इतर दिवशी तीन वेळा जेवतात (फाईव्ह टू डाएट), माझ्या सारखे काही १६ तासाचा उपास करतात (ब्रेकफास्ट किंवा डिनर न घेता).
या जोडीला जर (फास्टिंग स्टेट मध्ये) ४० मिनिटापर्यंत व्यायाम केला तर थोडे जास्त वजन कमी होते. पण ४० मिनटं व्यायाम करून जर डाएट केले नाही तर मात्र वजन कमी होत नाही (आणि कधी कधी वाढते). आठवडाभर असे डाएट केले आणि रविवारी डाएट वरून सुट्टी घेतली की पुढच्या आठवड्यासाठी आपण पुन्हा सज्ज होतो. ही सुट्टीदेखील गरजेची आहे. कारण आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांसाठी भूक कधी कधी बरीचशी मनातच असते. त्यामुळे मनाला उगीच सारखं रागवून गप्प ठेवण्यात काही अर्थ नाही. स्मित
वजन कमी होणे हा लंघनाचा सगळ्यात कमी महत्वाचा फायदा आहे. माध्यम वयात होणाऱ्या डायबेटीसची (टाईप २) सुरुवात इन्सुलिन रेसिस्टन्सनी होते. जेव्हा अन्नातल्या ग्लुकोजयुक्त पदार्थांचे प्रमाण सतत जास्त असते, तेव्हा शरीरात सतत इन्सुलिन स्त्रवत राहते. आणि शरीरातील पेशींना अति इन्सुलिन असण्याची सवय होते. आणि त्यांची इन्सुलिन वापरण्याची, परिणामी ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्सुलिन असूनही रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण वाढायला लागते. लंघन केल्यानी किंवा कर्बोदके कमी केल्यानी पेशींची ही क्षमता पुनः पहिल्यासारखी होऊ शकते. थोडक्यात टाईप २ डायबेटीस योग्य आहारानी घालवता येतो (यासाठी दुसरी लिंक बघा).
लंघन केल्यानी मज्जासंस्था बळकट आणि दीर्घायुषी होते. अल्झायमर्स सारखा आजार लंघनाने दूर ठेवायला मदत होऊ शकते (यासाठी तिसरी लिंक बघा). गरजेपेक्षा सरासरी ३० टक्के कमी खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत राहते याचे पुरावे आता संशोधनातून दिसू लागले आहेत. पण आप्ल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिवसातून एकदाच जेवणारे, नव्वदी ओलांडलेले खुटखुटीत आजोबा नाहीतर आजी असतात. आणि तल्लख बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि उत्साही असण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. अशा लोकांच्या आहारात डोकावून पाहिलं तर आपल्याला अजून कितीतरी गुरुकिल्ल्या मिळतील!
या विषयावरचे संशोधकांचे काही टॉक्स आणि लिंक्स मी इथे देत आहे.
१. पीटर आटिया
२.सारा हॉलबर्ग
३. सान्ड्रीन थुरेट 

Wednesday, September 21, 2016

साखर संघर्ष




एखादी व्यक्ती लठ्ठ आहे असं दिसलं की न मागितलेले अनेक सल्ले तिच्याकडे फेकण्यास सुरुवात होते. लठ्ठ माणूस काहीतरी चूक करतो आहे, त्याचा त्याच्या जिभेवर ताबा नाही, आणि त्यांनी आपल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ओढवून घेतला आहे, हे बारीक असलेल्या किंवा राहणाऱ्या लोकांचंच नव्हे तर कधी कधी डॉक्टरचं सुद्धा म्हणणं असतं. लठ्ठपणामुळे डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रिदयविकार असे अनेक रोग होतात हे विधान सर्रास केले जाते. आणि त्याचा दोष हा आत्तापर्यंत मेद जास्त असलेल्या (तूप,तेल,मांसाहार, अंडी) खाद्य पदार्थांना दिला जायचा. गणित अगदी सोपं होतं. ज्या खाद्यपदार्थात मेद आहे त्यानेच मेद वाढते. ज्या खाद्य पदार्थात कोलेस्टेरॉल आहे त्यांनीच कोलेस्टेरॉल वाढणार. म्हणून १९८२ नंतर अमेरिकन आहारशाश्त्र संस्थेने या सर्व पदार्थांपुढे मोठा लाल ध्वज रोवला. तिथूनच सुरुवात झाली 'लो फॅट डाएट' ची. मागे वळून बघताना आज शास्त्रज्ञांना असं लक्षात येतंय की आहारातील मेद कमी केल्याचे विपरीत परिणामच जास्त झाले आहेत. जे आजार कमी करण्यासाठी हा बदल घडवून आणला होता, ते सगळे आजार गेल्या तीस वर्षात वाढीला लागले आहेत. आणि त्याबरोबरच स्थूलतेचे प्रमाणही वाढले आहे. हे असे कसे झाले? गेल्या तीस वर्षात आपण सरासरी २०० उष्मांक जास्त खाऊ लागलो आहोत, आणि ते सगळे उष्मांक कर्बोदकांमार्फत घेतले जातात, आणि त्यातील सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारे कर्बोदक म्हणजे: साखर.
या महिन्यातच काही शत्रद्यांनी साखर लॉबीने एकोणीशे साठच्या दशकात काही नामांकित विद्यालयांना लाच देऊन करून घेतलेलया 'रिसर्च'चे पुरावे प्रसिद्ध झाले. यामध्ये साखर खाण्याने हृदयावर होणाऱ्या दुष्परिणामांचे टेपर संपृक्त चरबीवर ठेवण्यात आले. त्यामुळे नुसत्या अमेरिकेनेच नव्हे तर अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या सगळ्या देशांनी लोणी, तूप, अंडी, लाल मांस हे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वर्ज्य ठरवले. अलीकडे असं निदर्शनास आलंय की आपल्या शरीरातील ७५ % कोलेस्टेलरोल शरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियांमधून बनतं. आणि आहारात आलेल्या कोलेस्टेरॉल पैकी खूप कमी हृदयविकारास कारणीभूत ठरतं. आणि तूप, तेल किंवा मांसाहाराचे सगळ्या आहारातील प्रमाण बघता, फक्त त्यांच्या सेवनाने एवढी हानी व्हावी हे शक्य नाही. गेल्या तीस वर्षांमध्ये जगभरात साखरेचे सेवन झपाट्याने वाढले आहे. आज भारतासारख्या खाद्यपदार्थांची विविधता असलेल्या देशातही शीतपेये, आणि अमेरिकन फास्ट फूडचे सेवन वाढले आहे. बाहेर खाण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. जिथे जिथे अन्नाचे व्यावसायिक उत्पादन होते, तिथे तिथे अन्नामध्ये दोन ठळक बदल घडवावे लागतात. पहिला, अन्नातील फायबर कमी होते आणि दुसरा, अन्नातील साखरेचे प्रमाण वाढते. या दोन गोष्टी केल्याशिवाय खाद्यपदार्थांचे शेल्फ लाईफ वाढत नाही आणि तसे झाल्याशिवाय फायदा होत नाही.
साखर ह्रिदयविकाराला कशी कारणीभूत आहे हे समजून घ्यायचे असेल तर साखरेचे दोन तुकडे केले पाहिजेत. साखर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन सध्या शर्करा अणूंनी बनलेली आहे. यातील ग्लुकोज हे मानवी शरीरात झपाट्याने वापरलं जातं. जर ग्लुकोजनी बनलेल्या १०० कॅलरीज आपण खाल्ल्या तर त्यातील ८० लगेच शरीरातील अवयवांच्या चालण्यासाठी वापरल्या जातात. उरलेल्या यकृतात ग्लायकोजेन या पदार्थाच्या रूपात साठवल्या जातात. अधेमध्ये जेव्हा शरीराला गरज लागेल तेव्हा हे ग्लायकोजेन पुन्हा ग्लुकोजमध्ये परतवून शरीराला पुरवण्यात येते. ही प्रक्रिया सगळ्या कर्बोदकांवर होते कारण सगळ्या कर्बोदकांचा पाया ग्लुकोजचा असतो, फक्त साखर सोडल्यास. साखर हे आपल्या आहारातील मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं एकच कर्बोदक आहे ज्यात अर्धा भाग फ्रुक्टोजचा असतो. आणि आपलया शरीरात यकृतसोडून कुठलाही अवयव फ्रूक्टोज जसेच्या तसे वापरू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण फ्रुक्टोजयुक्त १०० कॅलरीज खातो तेव्हा त्या सगळ्याचे फक्त मेद होऊ शकते. आणि ते होत असताना शरीरावर ताण येऊन युरिक ऍसिडचे उत्पादन होते. जे उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरते.
फ्रूक्टोजचा दुसरा धोका म्हणजे शरीराच्या जीवरासायनिक यंत्रणेत ग्लुकोज ज्या ज्या संप्रेरकांना उत्तेजित करते, जसे की इन्शुलिन, लेप्टीन, यापैकी कुठल्याही संप्रेरकाला फ्रूक्टोज उत्तेजित करत नाही. भूक लागल्याचा आणि पोट भरल्याचा संदेश देण्याचे काम ही संप्रेरके करीत असतात. त्यामुळे जेव्हा आपण ग्लुकोजयुक्त पदार्थ खातो तेव्हा स्वादुपिंडातून इन्शुलिन रक्तात सोडले जाते. आणि इन्सुलिन मेंदूला खाणे बंद करायचे आदेश लेप्टीन मार्फत देते. बऱ्याच वेळ खाल्ले नाही की घ्रेलिन नावाचे संप्रेरक भूक लागल्याचा संदेश मेंदूला देते. हे पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक लूप फक्त ग्लुकोज यशस्वीपणे चालवू शकते. त्यामुळे फ्रुक्टोज खाल्ल्याने भूक भागल्याचे समाधान मिळत नाही. आणि पोट भरल्याचा संदेशही वेळेवर मिळत नाही. परिणामी खाल्लेल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्हीचे मेदात रूपांतर होते. या प्रक्रियेतून पुढे VLDL (व्हेरी लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल) तयार होते आणि ते हृदयविकारास कारणीभूत ठरते.
साखर मेंदूमधील डोपामिन रिसेप्टरना उत्तेजित करते. याचा अर्थ अमली पदार्थांच्या सेवनातून शरीरात जे बदल घडून येतात तसेच साखरेच्या सेवनाने येतात. यामुळे एखाद्या साखरेच्या आहारी गेलेल्या माणसाला हळू हळू किक मिळण्यासाठी आधीपेक्षा जास्त साखर खावी लागते आणि परिणामी ती खाण्याचा "नाद" लागतो. हे वाचल्यावर एखाद्याच्या डोळ्यासमोर ४० वर्षाचा माणूस वाटी चमच्याने साखर खात बसलाय असं येईल, पण तो 'नाद' म्हणजे फास्ट फूड ऍडिक्शन.
शीतपेयांमध्ये साखर, मीठ आणि कॅफिन याचं खतरनाक मिश्रण असतं. यातील कॅफिन हे डाययुरेटिक आहे, म्हणजे शरीरातील फ्री फ्लुइडचा ते निचरा करतं. मिठामुळे परत लगेच तहान लागते आणि साखर जरी मिठाची चव झाकायला वापरली असली, तरी त्यातील फ्रुक्टोजमुळे भूक न भागवता शरीरातील चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरते. फास्ट फूडचे देखील हेच तत्व आहे. ब्रेड, सॉस पासून ते अगदी हेल्दी लेबल असलेल्या तयार योगर्टमध्ये सुद्धा साखर नाहीतर हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप वापरले जाते. फॅट फ्री लेबल मिरवणारे सगळे पदार्थ साखरेनी भरलेले असतात. आणि फॅट फ्री खाऊन फॅट तर कमी होतच नाही, वर आणि खिसाही रिकामा होतो.
हे सगळं वाचलं किंवा बघितलं की एकच उपाय योग्य वाटतो. पदर खोचून स्वयंपाकघरात जाणे. आपल्या शरीरात काय जातंय हे कुठल्यातरी डब्याच्या मागचं लेबल वाचून ठरवण्यापेक्षा आपण घरी स्वत: करावं. कारण जेव्हा अन्नपदार्थ नफा-तोटा या दृष्टिकोनातून बनवला जातो, तेव्हा तो जास्तीत जास्त कसा विकला जाईल याचाच विचार अग्रणी असतो. आणि आपल्या शरीराचे हे कमकुवत भाग ओळखूनच आपल्यावर असे प्रयोग केले जातात.
सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे लठ्ठपणा हे रोगांचे कारण नसून लठ्ठपणा ही देखील त्या रोगांपैकी एक अशी व्याधी आहे. आपल्या लठ्ठपणाला आपल्या शरीरात होणाऱ्या कित्येक रासायनिक प्रक्रिया जबाबदार असतात. आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी व्यायाम हा शेवटचा किंवा कदाचित चुकीचा उपाय आहे. व्यायामानी लठ्ठपणा कमी होत नाही हेदेखील आता सिद्ध झालेले आहे. आहारावर नियंत्रण, त्यातही साखरेवर नियंत्रण, ताज्या पालेभाज्या आणि फळभाज्या, दही/ताक , नियंत्रित मांसाहार आणि भरपूर पाणी या सगळ्यांच्या मदतीने आरोग्य चांगले ठेवता येते. पण यासाठी आपले जेवण आपल्या डोळ्यासमोर घरी बनवणे यासारखा दुसरा सोपा उपाय नाही.

Tuesday, May 10, 2016

द मॅन हू न्यू इन्फिनिटी

खूप दिवसांपासून बघायची उत्सुकता असलेला 'द मॅन हू न्यू इन्फिनिटी ' काल पहिला.
ही कथा मद्रासमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (देव पटेल) यांची आहे. चित्रपटाची सुरुवात रामानुजन यांना वेळोवेळी येणाऱ्या अपयशांनी होते. गणितात कुठल्याही प्रकारची पदवी नसताना रामानुजन यांनी कित्येक सिद्धांतांची मांडणी केलेली असते. त्याला योग्य असा वाचक त्यांना मद्रासमध्ये मिळत नसतो. त्यातच त्यांना नोकरीची अत्यंत गरज असल्याने रोज दारोदारी नोकरी मागायला जायची त्यांच्यावर वेळ आलेली असते. या प्रयासात त्यांना एका ब्रिटीश कंपनीत क्लार्कची नोकरी मिळते. त्यांच्या ब्रिटीश साहेबाच्या (स्टेफेन फ्राय) ओळखीतून ते आपलं गणिताचं काम केम्ब्रिजमधील प्रोफेसर हार्डी (जेरेमी आयर्नस) यांच्याकडे पाठवतात. आणि त्यांना केम्ब्रिजमध्ये शिकण्याचे आमंत्रण येते. त्यांचं तिथलं आयुष्य आणि बायको आणि आईपासून दूर राहून झालेली जीवाची घालमेल, यावर हा चित्रपट केंद्रित आहे. रामानुजन बत्तिसाव्या वर्षी गेले. पण या कमी वेळात त्यांनी ३९०० सिद्धांत मांडले. त्यांच्या या अभूतपूर्व कारकिर्दीबद्दल कित्येक मुरलेल्या गणितज्ञांनी आश्चर्य आणि आदर व्यक्त केला आहे. त्यांचे काही सिद्धांत अगदी अलीकडच्या काळात, जेव्हा तंत्राद्यान पुढे गेले, तेव्हा वापरले जाऊ लागले.
चित्रपटाची मांडणी अगदी साधी असली तरी रामानुजन आणि त्यांचे गाईड यांच्यातील फरक आणि द्वंद्व मनाला स्पर्श करून जातं. मायभूमी सोडून, ते देखील अशा काळात जेव्हा ब्राम्हणांना सागरोलंघन निषिद्ध होतं, शिकायला परक्या देशात जाणे सोपे नाही. एका लहान मुलाची झटपट पुढे जाण्याची अधीरता आणि त्याला दिशा देणाऱ्या गाईडचा शांत सयंम यातील विरोध दोन्ही कलाकारांनी सहजतेने रेखाटलाय. सुरुवातीला प्रचंड उत्साहानी पेपर पब्लिश करायला सज्ज रामानुजन, त्यांना इतर मुलांबरोबर लेक्चरला बसावे लागेल हे कळल्यावर प्रचंड उद्विग्न होतात. त्यांना त्यांचे सिद्धांत डोळ्यासमोर दिसायचे. पण एखाद्या शास्त्रज्ञासारखे त्यांना ते सिद्ध करायचे प्रशिक्षण नव्हते. पण त्यांना ते सिद्ध करायची गरज वाटायची नाही. त्यांना जे उमगलंय ते खरंच आहे असा दांडगा आत्मविश्वास त्यांना होता आणि यातूनच त्यांच्यात आणि त्यांच्या गाईडमध्ये पहिली ठिणगी पडते. अर्थात हे सादर करताना इंग्लिश पद्धतीने कमीत कमी भावना व्यक्त करून केलेलं असल्यामुळे ते मनाला अधिकच भावतं. एखादा अंकांच्या, आणि एक्स आणि वायच्या महाजालात हरवलेला गणितज्ञ भावनेसाठी मनात फारशी जागा ठेऊ शकत नाही. आणि जरी आपल्या विद्यार्थ्याला भावना अनावर होतायत हे त्याला समजलं, तरी तो त्याबद्दल काय करावं या बाबतीत संभ्रमितच असतो. पण आपण जे करतो आहोत ते आपल्या विद्यार्थ्याच्या भल्यासाठी आहे याबद्दल मात्र त्यांना संपूर्ण खात्री असते. दोन गणितज्ञांमधली ही भावनिक देवाणघेवाण, त्यातही एक आस्तिक आणि एक नास्तिक अशी, फार हळुवारपणे पण तितक्याच ताकदीने मांडली आहे. शेवटी मृत्युशय्येवर पडलेल्या आपल्या शिष्यासाठी डोळ्यात प्राण आणून लढणारा गाईड पाहून भरून येतं.
प्रेमासारखंच (सध्याचा सैराट ज्यासाठी चर्चेत आहे), गुरु-शिष्याचे नातं देखील युनिव्हर्सल आहे. सगळेच नातेसंबंध एका अर्थानी युनिव्हर्सल आहेत. पण गुरु-शिष्याच्या नात्यात येणाऱ्या सीमारेषा जरा जास्त ठळक असतात. तिथे असं वाट्टेल तेव्हा हातात हात घेता येत नाहीत, किंवा आपल्यामुळेच चिडलेल्या, रुसलेल्या आपल्या शिष्याची समजूत काढायला, त्याला खिशातून चॉकलेट काढून देता येत नाही. त्याच्या खाजगी आयुष्यातील तिढ्यांना सहजतेने हात घालता येत नाही. आणि शिष्यालासुद्धा गुरुवारची श्रद्धा सोडून कुठल्याही प्रकारची यशाची हमी नसते. गुरु-शिष्य मिळून करतील तेवढंच त्यांचं संचित.
पण जेव्हा शिष्य रामानुजन असतात तेव्हा त्या संचिताचा उपयोग पुढच्या अनेक पिढ्यांना होतो.

Tuesday, May 3, 2016

माझ्या हातातला पर्सनल ट्रेनर

सोळा वर्षाची असल्यापासून मी बारीक राहायचा प्रयत्न करत आहे (आता बारीक होण्याचा म्हणावं लागेल). या वर्षी माझ्या या प्रयत्नांना सोळा वर्षं होतील. त्यामुळे पंचविशी ओलांडून अचानक सुटलेल्या माझ्या समवयस्क मित्र मैत्रिणींपेक्षा माझा अनुभव (माझ्यासारखाच) दांडगा आहे. पण हल्ली हल्लीच मला अचानक वजन वाढीच्या बोधी वृक्षाखाली बसल्याचा अनुभव आला आहे.
पूर्वी वजन कमी करायचे ठराविकच मार्ग होते. त्यात कुठल्यातरी जिम मध्ये वजन कमी करायचा प्रोग्रॅम घ्यायचा. यात तीन, सहा महिने किंवा एक वर्षं असे पैसे भरायचे. डाएटीशियनच्या रोज शिव्या खायच्या. आणि कसेतरी करत ठरलेल्या वजनाच्या जवळपास यायचे. पण तो सगळा प्रकार नकोसा होता. जिम मोठं, नावाजलेलं असेल तर हमखास तिथे इतर लोकांचे बिफोर आणि आफ्टर फोटो असायचे. मधेच कुठल्यातरी डीटॉक्स प्लानवर सूट आहे म्हणून आम्ही त्याचे पैसे भारायचो आणि आठवडाभर नशिबाला शिव्या देत, या भाजीचा रस, त्या फळाचा रस पीत बसायचो. पण जिम सुटलं की वर्षाच्या आत पुन्हा गाल वर यायचे. पुन्हा हेच सगळं सुरु.
याची दुसरी पायरी म्हणजे पर्सनल ट्रेनर. आमच्या जिममध्ये कळा शर्ट घातलेले ट्रेनर पर्सनल ट्रेनर असायचे. म्हणजे तुमच्या जिमच्या वेळात ते तुम्हाला सोडून कुठ्ठे कुठ्ठे जाणार नाहीत. फक्त त्यासाठी तुम्ही सहा एक हजार महिना ज्यादा भरायचे. आणि लाल शर्ट मधले ट्रेनर -- आपण त्यांनी इम्पर्सनल ट्रेनर म्हणू. हे लोक ज्यांनी सहा हजार रुपये भरले नाहीत त्यांच्यासाठी. पण ते कधीही त्यांचं काम मन लावून करत नाहीत. त्यांचे डोळे सदैव आपल्याला कळा शर्ट कधी मिळणार याच्याकडे लागलेले. त्यामुळे पर्सनल ट्रेनर घेतला नाही तर मनासारखा व्यायाम होत नाही आणि मग डाएटचा तरी काय उपयोग? असं म्हणून नुसताच व्यायाम करायचा. मग काळा शर्टवाला, "मॅडम तुम्ही वेटलॉस पॅकेज का नाही घेत", असं म्हणायचा. त्याचे ते शब्द कानावर आले की आपले एक आवर्तन पूर्ण झाले आहे याचा साक्षात्कार व्हायचा. अशी कित्येक अमावस्या पौर्णिमा आवर्तनं मी बघितली आहेत.
पण हल्ली हल्लीच या सगळ्या रड्यामधून मला मोक्ष मिळाला आहे असं वाटायला लागलंय. कारण आता माझा पर्सनल ट्रेनर कायम माझ्या हातात असतो. तो म्हणजे माझा फोन! हल्ली "Activity Tracker", म्हणजेच आपली हालचाल मोजणारी यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. यात फिटबिट, जॉबोन, अंडर आर्मर अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मनगटावर बांधण्याचे पट्टे येतात. यात एक अक्सिलरोमीटर असतो, जो आपली दिवसभरातली हालचाल मोजतो. या हालचालीचं मोजमाप "पावलांमध्ये", म्हणजेच स्टेप्स मध्ये होतं. जपानी लोकांनी सगळ्यात आधी पेडोमीटर विकण्यासाठी रोज १०००० पावले चालण्याची संकल्पना रूढ केली. १०००० पावलं म्हणजे साधारण ५ मैल (८ किलोमीटर). रोज ८ किलोमीटर चालणे अर्थातच कुठल्याही ह्रिदयरोगतज्ञाच्या परीक्षेत पासच होईल. त्यामुळे आता या पद्धतीचा सर्वत्र प्रचार बघायला मिळतो. मनगटावरचा हा पट्टा ब्लू टुथद्वारे आपल्या फोनशी सतत बोलत असतो आणि दिवसभरात केलेली हालचाल एक छोटंसं ॲप उघडलं की लगेच डोळ्यासमोर दिसते. यात आपण चालण्याव्यतिरिक्त काय काय व्यायाम केला त्याची सुद्धा नोंद करता येते. आणि आपण ही सगळी हालचाल करून किती उष्मांक (कॅलरीज) जाळले हे ही आपल्याला तयार बघता येतं. अर्थात फक्त Activity Tracker घालून आणि १०००० पावलं (आणि व्यायाम करून) बारीक होता येत नाही (हो! इथेही आपलं नशीब फुटकं आहेच). आपण किती कॅलरीज जाळल्या हे कळल्यामुळे फक्त एक छोटीशी पण अति महत्वाची गोष्ट आपल्याला करता येऊ शकते. ती म्हणजे रोजच्या रोज कुणाच्याही मदतीशिवाय खाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि गरजेनुसार त्यात स्वत: बदल करणे.
खरं तर वजन कमी करणे (बाकी कुठली शारीरिक कमतरता नसेल तर) साधं गणित आहे. १ पाउंड मेद कमी करायचं असेल तर ३५०० कॅलरीज जाळाव्या लागतात. म्हणजे किलोच्या किती? ७७००! स्त्रियांना कमीत कमी १२०० तर पुरुषांना कमीत कमीत १५०० कॅलरीज दिवसाला घेतल्याच पाहिजेत. तसं न केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. "त्यामुळे १५ दिवसात ६ किलो कमी करा" वगैरे जाहिराती इथेच निकालात लागल्या. आपण एका आठवड्याचं गणित मांडू. जर एका आठवड्यात आहे त्यापेक्षा १ किलोने कमी व्हायचे असेल तर आठवड्याभरात ७७०० कॅलरीज कमी खाल्ल्या पाहिजेत. समजा तुम्ही रोज ३००० कॅलरीज खाताय, तर सरासरी रोज ११०० कॅलरीज कमी खाल्ल्या तर एका आठवड्यात तुमचे वजन १ किलोनी कमी होऊ शकते. यातील अडचण तिथे येते जिथे तुमचा रोजचा आहाराच कमी असतो आणि तरी तुमचे वजन कमी होत नसते. इथे आहार तज्ञांना भेटणे अनिवार्य आहे. कारण आपण किती कॅलरीज खातो तितकंच त्या कुठून येतात हे ही महत्वाचं आहे. आणि त्या कुठून कमी करायच्या हेदेखील.
पण नुसतं खाणं कमी करून सगळं वजन कमी करण्यापेक्षा व्यायाम करून तुम्ही तुमचं कॅलरी बजेट वाढवू शकता. समजा तुम्हाला रोज ११०० कॅलरीज कमी खायच्या आहेत. हे तुम्ही सरळ तेवढ्या प्रमाणात खाणं कमी करून करू शकता किंवा अर्धं खाणं कमी करून आणि बाकीचं व्यायामानी असंही करू शकता. ते कसं? साधारण १ किलोमीटर चालण्यानी ६२ कॅलरीज जळतात. त्यामुळे ५५० जाळायला ९ किलोमीटर (६किमी/तास प्रमाणे दीड तास) चालावे लागेल. हेच जर तुम्ही २२-२५ किमी/तास इतक्या वेगानी व्यायामाची सायकल चालवलीत तर अर्ध्या तासातच तुमच्या ५०० कॅलरीज होतील. याचा अर्थं, जसं काय खातो यावर वजन वाढणे आणि कमी होणे अवलंबून आहे, तसंच कुठला व्यायाम आणि कितीवेळ करतो, यावरदेखील वजन कमी होणे अवलंबून आहे. भारतीय पद्धतीची योगासनं, ताण तणाव कमी करणे आणि लवचिकता टिकवून राहणे यासाठी अतिशय चांगली असली, तरी त्यातून कारडीयो व्यायाम फारसा होत नाही. तसंच जिम मध्ये वजन उचलणे शरीराच्या चिरकाल आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे, पण ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी किमान ४५ मिनिट दरदरून घाम येईल असा व्यायाम करणे आवश्यक आहे.
हे सगळं मोजमाप करण्यासाठी आता तज्ञांची सारखी मदत लागत नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की आहाराबद्दलचे निर्णय सगळे आपणच घ्यावेत. आपण जेव्हा स्वत:वर लक्ष ठेवतो तेव्हा त्या प्रक्रियेत थोडा बायस येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे वजन कमी करायच्या मार्गावर असताना आहार तज्ञांना भेटणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी असेल तर जिम लावण्याआधी डॉक्टरचा सल्ला घेणेदेखील गरजेचे आहे.
पण एकदा प्रवास सुरु झाला की रोजच्या रोज काही ॲप्स वापरून आहाराचं आणि व्यायामाचं मोजमाप करता येतं. आहार लिहून ठेवायसाठी माय फिटनेस पॅल हे ॲप मला अत्तापर्यंत वापरलेल्या सगळ्या ॲप्समध्ये सरस वाटले. याचं महत्वाचं कारण हे की या ॲपमध्ये भारतीय पदार्थांच्या कॅलरीज सोप्या पद्धतीने शोधता येतात. आणि जगभरातील लोकांनी आपापल्या पाककृतींच्या नोंदी यात आधीच करून ठेवल्या आहेत. हे वापरायला देखील अतिशय सोपे आहे. व्यायाम मोजण्याचे मला भावलेले ॲप म्हणजे मॅप माय फिटनेस. यात तुम्ही दिवसभरात केलेला व्यायाम, घेतलेल्या स्टेप्स, खालेल्या कॅलरीज आणि विश्रांती या सगळ्याचं एक सोपं ग्राफिक बघायला मिळतं. या व्यतिरिक्त तुमच्या activity tracker चं स्वत:चं असं एकॲप आहेच. ही सगळी अॅप्स आपण काहीही न करता एकमेकांशी आपली माहिती शेयर करतात. त्यामुळे इकडून तिकडे माहिती टाकायचे कष्टदेखील घ्यावे लागत नाहीत. हल्ली वायफायला जोडता येणारे वजनकाटे पण मिळतात. ते अचूक ठरलेल्या वेळी आपले त्या दिवशीचे वजन आपल्या फोनकडे पाठवतात.
आता साहजिक प्रश्न, "एवढं मोजमाप कशाला करायचं?"
याचं उत्तर असं आहे, की जी व्यक्ती दिवसातून तासाभरापेक्षा जास्त दमवून टाकणारी हालचाल करते किंवा व्यायाम करते, तिला मोजमापाची गरज नाही. पण जर तुम्ही व्यायामासाठीदेखील वेळ काढायला घडाळ्याशी मारामारी करत असाल, आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर काटेकोर मोजमाप, प्रचंड धीर आणि पुन्हा पुन्हा शून्यातून सुरू करायची जिद्द, या तिन्हींची नक्कीच गरज आहे.
फोन आणि सोशल मिडियामुळे लोक किती बिघडलेत हे रोजच कानावर येतं. आणि काही अंशी ते सत्य आहे. पण आज तंत्रद्यानाचा योग्य उपयोग करून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, तेदेखील अगदी कमी खर्चात, हा आजच्या काळातील एक उपयुक्त बदल आहे. एखादं activity tracker अगदी कमीत कमी दीड हजार ते जास्तीत जास्त वीस हजारमध्ये येऊ शकतं. पण जिमला आणि वेट लॉस प्रोग्रॅम साठी यापेक्षा कितीतरी जास्त वार्षिक फी भरावी लागते. आणि जरी तुम्ही तुमचा ट्रॅकर वापरणं बंद केलं, तरी पुन्हा कधीही डोक्यात वजन कमी करायचा किडा आला, तरी तुम्ही लगेच तो वापरायला सुरुवात करू शकता. त्या जोडीला वापरली जाणारी सगळी अॅप्स विनामुल्य डाउनलोड करता येतात. त्यामुळे ज्यांना पुन्हा वजन कमी करायच्या मायाजालात उतरायचे आहे त्यांच्यासाठी हा एक कमी जोखमीचा मध्य मार्ग नक्कीच बनू शकतो!

Monday, April 25, 2016

अरे संसार संसार

हल्ली खूप लोक मला माझं लिखाण बंद का झालं याबद्दल विचारतात. आणि जास्त डिटेलमध्ये जाऊन त्यांचा (आणि माझा) मौल्यवान वेळ घालवण्यापेक्षा एका शब्दात उत्तर देणं जास्त सोप्पं. लग्न. आपल्या ओळखीत असे अनेक लोक असतात ज्यांच्या कपाटात गिटारच्या वह्या, कवितांच्या डायऱ्या, ट्रेकचे फोटो आणि असे बरेच काही गुंडाळून ठेवलेले छंद सापडतील. त्या सगळ्या छंदांचं गुंडाळीकरण, लग्न (आणि संसार) या शब्दातच बहुधा झालेलं असतं. अर्थात असे कित्येक लोक आहेत जे "अगेन्स्ट ऑल ऑड्स" आपली कला जिवंत ठेवतात. पण ते मुळात माझ्यासारख्यांपेक्षा जास्त सरस असतात. पण माझी कला हरवलेली बिलकुल नाही. हेच सांगण्यासाठी मी वेळात वेळ काढून हा लेख लिहू घातला आहे.
कसंय ना, पूर्वी कसं म्हणायचे, अमुक अमुक राजा हा युध्द "कलेत" पारंगत होता. शस्त्रकला, युध्दकला, वक्तृत्व कला या सगळ्या पूर्वी कला मानल्या जायच्या. आणि यात लोक 'निपुण' असायचे. पण तेव्हा युद्ध आणि संसार वेगवेगळे असायचे. राण्यांना सेपरेट महाल, दास दासी असल्यामुळे या सगळ्या कला वेगळ्या ठिकाणी दाखवायला लागायच्या. हल्ली युध्दकला ही संसारातच वापरावी लागते. तसंच तह, करार, हे सुद्धा आता नॉर्मल संसारात इनकॉरपोरेट झालेत. त्यातच जर एखादं अपत्य झालं तर या सगळ्या कलांचा फुललेला पिसारा हा संसारातच वापरावा लागतो.
कला संसारत लेटंट हीट चे काम करते.एखाद्या पदार्थाचे तापमान न वाढता तो जेव्हा उर्जा ग्रहण करतो तेव्हा त्याला लेटंट हीट असे म्हणतात. मात्र या प्रकारात पदार्थ नुसता टाइम पास करत नसून, अंगभूत बदलत असतो. तसाच संसार देखील कलाकारांचं कलेचं प्रदर्शन थांबवून, त्यांच्यातील कलेचा त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोग करून घेतो.
जसं की आता माझी लेखणी व्हॉट्सॅपवर जास्त चालते. आपणच कसे बरोबर आहोत हे नवऱ्याला पटवून देणे हे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे आणि जास्त अवघड आहे. त्यामुळे कधी कधी नवराच मला सल्ला देतो की आता तू काहीतरी कम्प्युटरवर लिही, ब्लॉग वगैरे, नाहीतर अंगठ्याला कार्पेल टनल होईल उगीच. लेखनात जसं मध्ये मध्ये, "आपलं हे काय चाललंय, याचा काहीच उपयोग नाही" अशी भावना यायची तशीच इथेही येते. पण जसं पूर्वीचं लेखन आणि आत्ताचं यातील गुणात्मक फरक दिसू लागतो, तसा पूर्वीचा नवरा आणि आत्ताचा, यातही थोडा थोडा फरक जाणवू लागतो.
पूर्वी असं फेसबुकवर वगैरे जळजळीत स्टेटस टाकून त्यावर (जगभर पसरलेल्या लुख्या विद्यार्थ्यांशी) वाद घातल्यावर आपण किती फ़ेमिनिस्ट आहोत असं वाटायचं. पण आता आठवड्यातून एकदा घरकामाच्या प्रोसिजरचं फ़ेमिनिस्टिक कॅलिबरेशन करावं लागतं. यात
"माझे बाबा काहीच करायचे नाहीत घरात. तरी मी करतो"
"मी आज सकाळी उठून बाळाला चेंज केलं"
"माझी झोप पूर्ण झाली नाही"
"मी बाकीच्या नवऱ्यांपेक्षा जास्त काम करतो"
या आणि अशासारख्या अनेक वाक्यांना कुठल्याही प्रकारची कृतज्ञ प्रतिक्रिया जाणीवपूर्वक न देता, "बरं मग?" अशी प्रतिक्रिया देणे येते. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्य उच्चारली जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हा पुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, "बरं मग?" म्हणावं लागतं.
लिखाण जसं तेच तेच वाटू लागतं, तसा संसारही घिसापिटा वाटू लागतो. पण दुर्दैवाने रायटर्स ब्लॉक सारखा संसार ब्लॉक कधीच होत नाही. संसार मुळातच आपल्या खूप पुढचा असतो. त्याच्या हाती आपल्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या लोकांचे बळी गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला कितीही संसार सोडावासा वाटला तरी आपल्याला संसार सोडत नाही. शेवटी मग आम्ही नवरा बायको लग्न केल्याबद्दल एकमेकांचं सांत्वन करू लागतो. त्यातही आता नाविन्य आलंय. लग्न नवीन असताना अशी कंटाळ्याची फेज आली की आम्ही, "तुझ्यामुळे तुझ्यामुळे" करून एकमेकांवर ढकलायचो. आता अशा फेज मध्ये आम्ही सबंध विश्वाचा विचार करतो. की आपण म्हणजे या संसाराच्या यज्ञात एक तुपाचा थेंब वगैरे. अगदीच बोर झालं तर, उभय पक्षांच्या आयांवरून एखादं झणझणीत भांडण करतो. पण भांडण हा संसार रिसेट करायचा चुकीचा मार्ग आहे हे देखील आता आमच्या लक्षात येऊ लागलंय. आणि मुळात सुख-कंटाळा-भांडण-सुख या काल्चाक्रातून मुक्ती हीच संसाराची खरी शिकवण आहे असं आम्ही आता मानू लागलो आहोत.
संशोधन कलेचे देखील नवीन पैलू संसाराने दाखवून दिले आहेत. मी आणि माझ्या काही मैत्रिणी आता आमच्या सगळ्यांच्या नवऱ्यांच्या आणि सासवांच्या (गुण) दोषांवर उत्तम रिव्यू पेपर लिहू शकू. संसारात पडल्या पासून माझा मानसशास्त्राचा व्यासंगदेखील कलेकलेने वाढला आहे. विविध पुस्तकं वाचून माझ्या असं लक्षात आलंय की आपण सगळेच थोडे थोडे मनोरुग्ण आहोत. आधी निरागसपणे मी दुसऱ्यांचे वेड शोधायचे. आता मात्र मला पक्की खात्री पटली आहे की मीच सगळ्यात जास्त वेडी आहे. अशा अध्यात्मिक घटका आल्या की कौतुक वाटतं, पूर्वीच्या विचारवंतानी वानप्रस्थाश्रमाचा सिकवेन्स इतका चपखल कसा बसवला असेल. पण त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की सरायीताला जंगलात जाण्याची काय गरज? मन इतकं शांत झालं पाहिजे की संसाराच्या गोंगाटात जंगलच मनात आणता आलं पाहिजे.
तुम्ही तुमच्या संसारात शंभर टक्के सुखी असाल तर हा लेख तुमच्याबद्दल बिलकुल नाही. आणि जे लग्न करून प्रचंड सुखी झालेत (अशांच्या मी नित्य शोधात असते) त्यांच्यासाठी हा लेख लागू नाही. पण संसार इतका फूलप्रूफ सुखी असता तर एका अविवाहित प्रोड्यूसरनी त्यावर इतकी कमाई केलीच नसती. संसारातील खाचा आणि खड्डे, त्यातून येणारे चांगले वाईट अनुभव यामुळेच लग्न, या सतत चालू राहणाऱ्या संथ प्रवाहात, थोड्या लाटा वगैरे अनुभवायला मिळतात. नाहीतर नुसता इकडे सेल्फी, तिकडे सेल्फी, माझा हब्बूडी, माझी वायफी असं खोटं खोटं प्रदर्शन उरेल. संसारात पडल्यामुळे तरुणपणी आपण शाहरुख खान आहोत असं वाटणाऱ्या लोकांना आपण आता इरफान खान झालोय असं वाटू लागतं. पण हा बदल किती चांगला आहे हे ज्याला कळलं त्याचाच बेडा पार!

Wednesday, March 30, 2016

दोन मिनिटांची सनसनी खेज

मध्यंतरी मॅगी मध्ये सापडलेल्या लेडमुळे भारतात भयंकर हा:हाकार झाला आणि कित्येक तरुणांच्या जेवणा खाण्याची गैरसोय झाली. नेसलेनी काही महिन्यांनी नवीन उमेदीने आपल्या लाडक्या मॅगीची पुन: प्रतिष्ठापना केली. आपण सगळे हॅप्पिली एव्हर आफ्टर झालो. विषय संपला.
खरंच संपला का?
गेली दोन वर्षं मी अपेडा प्रमाणित लॅॅबोरेटरी सुरु करायचे काम करते आहे. अपेडा म्हणजे "कृषी और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण", सोप्या भाषेत, Agricultural and Processed Food Products Export Development Authority. यातील निर्यात हा शब्द विशेष लक्षात ठेवावा. मॅगीच्या बाबतीत जे घडलं, त्यावर बरीच उलट सुलट मतं व्यक्त झाली. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती. ती अशी की लेडचे प्रमाण किती असावे यात प्रमाणाचा गोंधळ होता. संपूर्ण मॅगी मध्ये जर एक पुडी टेस्ट मेकर घातला तर टेस्ट मेकर मधल्या लेडचे प्रमाण कमी होते कारण १ ग्रॅम मसाल्यात जर क्ष मिलीग्रॅम लेड असेल तर लेडचे प्रमाण क्ष /१ *१०० असे होते. पण तोच मसाला जर आपण २०० ग्रॅम नूडल्स मध्ये मिसळून तपासला तर त्याचे प्रमाण क्ष*१००/२०० असं येईल, अर्थात कागदोपत्री कमी दिसेल. त्याचं सॅम्पलिंग, पृथक्करण, फेरतपासणी कशी केली होती यावर दुर्दैवाने कुठल्याही प्रकारची उघड चर्चा झाली नाही. आणि "सनसनी खेज" चा ओघ कमी झाल्यावर सगळ्यांनी त्याचा पाठपुरावादेखील बंद केला.
ही तपासणी करायची सक्ती अलीकडच्या काळात प्रस्थापित झालेल्या FSSAI अर्थात Food Safety And Standards Authority of India च्या मानकांप्रमाणे करण्यात आली. FSSAI हे भारतात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी लागू आहे. APEDA आणि FSSAI या दोन्ही संस्थांच्या नियमानुसार भारतातील कित्येक प्रयोगशाळा काम करतात. त्यातलीच आमची एक.
पण निर्यातीसाठी पाठवल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची तपासणी करायचे प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर लागू होणारे नियम, आणि भारतात विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थासाठीचे नियम यात जमीन आस्मानाचा फरक आहे. अपेडा च्या कार्यपद्धतीनुसार, शेतातून फळे व भाज्या उचलण्याचे काम लॅॅबोरेटरीकडे किंवा अपेडा नी नेमलेल्या अधिकाऱ्यानेच करायचे असते. फळे व भाज्या लॅॅबोरेटरीच्या आवारात आल्यावर त्यांना वातानुकुलीत कोल्ड रूम मध्ये ठेवण्याची सक्ती आहे. अशी कोल्ड रूम जर लॅॅबोरेटरी दाखवू शकली नाही तर प्रमाणपत्र मिळत नाही. अपेडा प्रमाणे करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे निकष पास होणे हे लॅॅबोरेटरीच्या सगळ्या यंत्रणेचा कस लावणारे असते. उदाहरणार्थ, कीटकनाशकाचे अपेडाचे प्रमाण पार्टस पर बिलियन मध्ये आहे. सरासरी कुठलेही कीटकनाशक १० पार्टस पर बिलियन पेक्षा जास्त सापडल्यास फळे व भाज्या नापास होतात आणि निर्यात होत नाहीत. तेच FSSAI चे प्रमाण पार्टस पर मिलियन मध्ये आहे. म्हणजे सरळ सरळ भारतीय लोकांनी हजार पटीने जास्त कीटकनाशक खाल्ले तरी काही फरक पडत नाही असाच मातीत अर्थ होतो!
अपेडाचे काम भारतात एका लॅॅब मध्ये होते. तिथून जर जाणारा माल पास झाला तर त्याची हुबेहूब तीच तपासणी युरोपच्या बंदरावर होते. युरपीय आणि भारतीय लॅॅबची उत्तरं दिलेल्या अनिश्चिततेच्या निकषांमध्ये बसली तर माल उतरवून घेतला जातो. नाहीतर तिथेच नाकारला जातो. यासाठी भारतीय आणि युरोपियन लॅॅब्स कडे एकसारख्या क्षमतेची आणि तांत्रिक घडणीची मशिन्स असणे आवश्यक आहे. त्यासाठी भारत सरकार कित्येक नवीन लॅॅबोरेटरीज ना ५०% अनुदान देऊ करते. आमच्या लॅॅबला हे अनुदान मिळालेले आहे. हे मिळवायचे निकष आणि नियम अत्यंत पारदर्शक आणि सोपे आहेत. अशी एक लॅॅबोरेटरी स्थापन करायचा सरासरी खर्च ५-६ कोटी असतो. त्यातील मशिनरीची किंमत साधारण २.५ कोटीपर्यंत जाते. आणि त्यातील ५० % रक्कम सरकार कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता देऊ करते. भारताचा व्यापार वाढवा यासाठी सरकारने केलेली ही अमुल्य तरतूद आहे. आणि या प्रक्रियेतून जाताना पावलोपावली आपल्या देशाचा अभिमान वाटतो. लॅॅबोरेटरीला अपेडा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दोन अतिशय अवघड ऑडिट्स पास व्हावी लागतात. पहिले म्हणजे NABL अर्थात National Accreditation Board For Testing and Calibration Laboratories. या अंतर्गत ISO 17025 हे प्रमाणपत्र नव्या चाचण्यांसाठी घ्यावे लागते. ते घेतल्यावरच अपेडा ऑडिट करायला येतात. या दोन्ही परीक्षा पास झाल्या तरच तपासणी करायचे प्रमाणपत्र मिळते. हे ऑडिट करणारे परीक्षक भारतातील मोठ्या मोठ्या संस्थामधून येतात. ही परीक्षा घ्यायची पद्धतदेखील अत्यंत पारदर्शक आणि सरळ असते. आणि ही परीक्षा कशी घ्यायची हे शिकवण्यासाठीदेखील प्रमाण आणि परीक्षा आहेत.
FSSAI साठी मात्र यातील बरेच नियम शिथिल केलेले आहेत. देशी बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी आमची अशी कसून झडती घेतली जात नाही. देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी मात्र BIS अर्थात भारतीय मानक ब्युरो, अशाच प्रकारचे नियम आम्हाला करकचून लावतात. आणि ते अत्यावश्यक आहे यात काहीही शंका नाही. कुठलीही तपासणी करण्याच्या आधी तपासणी करणाऱ्याची कुवत, त्याची तयारी आणि त्याची शास्त्रीय बैठक तपासून बघितलीच पाहिजे. पण पाण्याबरोबरच खाद्यपदार्थांचीदेखील कसून तपासणी झाली पाहिजे.
तुम्ही विकत घेतलेल्या प्रत्येक तयार खाद्य पदार्थाच्या पाकिटावर FSSAI असं चिन्ह दिसेल. त्या लायसन्सच्या नियमाप्रमाणे तुमचे खाद्यपदार्थ तपासून आलेले असतात. पण निर्यातीसाठी घेण्यात येणारी दक्षता भारतात विकल्या जाणाऱ्या अन्नासाठीदेखील घेण्यात यावी. काही वर्षांपूर्वी कोकाकोलामध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले. तेव्हापासून कोकाकोला पाणी, साखर सगळ्याची तपासणी करून मगच त्याची खरेदी करतात. पण आपण मंडईतून जी फळं आणतो, त्यावर काय फवारलं जातं याचा विचार करण्याचीदेखील गरज आहे. यावर नेहमीचा प्रतिवाद असा असतो की शेतकरी बिचारा कोकाकोला सारखा प्रचंड धंदा करत नाही. पण एक बाटली कोकाकोलापेक्षा एक पेटी आंब्यासाठी ग्राहक नक्कीच जास्ती पैसे देतो. आणि पैसेदेखील आपण थोडावेळ बाजूला ठेऊ. आंतरराष्ट्रीय कीटकनाशकांचे प्रमाण बघितले तर माणशी ज्या खाद्यपदार्थाचे सेवन सगळ्यात जास्त असते त्यातील कीटकनाशकांचे प्रमाण सगळ्यात कमी असावे लागते. या गणिताप्रमाणे पाण्याचे प्रमाण सगळ्यात कमी आहे (०. १ पार्टस पर बिलियन) कारण आपण पाण्याचे इतर कुठल्याही पदार्थापेक्षा सरासरी जास्त सेवन करतो. म्हणजे १ लिटर पाण्यात जर ०. १ पार्टस पर बिलियन प्रमाणे कीटकनाशक असेल, तर सरासरी रोज आपण ०.२ किंवा ०.३ पीपीबी कीटकनाशकाचे सेवन करू. तर या गणिताने जर आपण कोकाकोला आणि फळं किंवा भाज्या यांची तुलना केली तर अजूनही भारतात भाज्यांचे सेवन जास्त असेल. मग त्यांचे निकष जास्त कडक असायला हवेत आणि तपासणी वरचेवर व्हायला हवी.
जसं स्टिंग ऑपरेशन मॅगीचं होतं तसंच अंगणवाडीच्या जेवणाचेदेखील झाले पाहिजे. आणि कीटकनाशकांपेक्षाही भयानक असणारे ई-कोलाय, कोलीफॉर्म असे सूक्ष्मजंतू , जे अशा तयार जेवणामध्ये सर्रास आढळू शकतात त्यांचीदेखील तपासणी झाली पाहिजे आणि तीही नियमित आणि कसून झाली पाहिजे. जर बाहेरच्या देशांनी आपली निर्यात धुडकावू नये म्हणून आपण इतका खर्च करतो आणि इतकी काळजी घेतो तर आपल्या देशातील लोकांना त्याच प्रतीचे खाद्य पदार्थ मिळावेत यासाठी देखील अट्टाहास झाला पाहिजे.
एखाद्या फळावर कीटकनाशक असूच नये (पूर्णपणे सेंद्रिय) अशी काही गरज नाही. असं करायला खर्च खूप येतो आणि त्या पटीत त्याचा फारसा फायदा नाही. पण बऱ्याच ठिकाणी गरजेपेक्षा खूप जास्त रसायने वापरली जातात. याचा त्यातल्या त्यात कमी धोका खाणाऱ्याला असतो असं म्हणता येईल. आपण असा किती कोबी खातो? किंवा एका मोसमात अशी किती द्राक्षं खातो? जिथे काही थेंब पुरेसे असतात तिथे लिटरने फवारणी केली जाते. याचे दोन खूप मोठे तोटे आहेत . पहिला म्हणजे या रसायनांचा जमिनीतील पाण्यात निचरा होतो. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ही पुन्हा पाण्यावाटे आपल्याच शरीरात जातात. आणि आजूबाजूच्या इकोसिस्टिमला धक्का पोहोचवतात. तसेच अतिफवारणी केल्यामुळे किड्याला रसायनाची सवय होऊन, त्याचा परिणामही कमी होतो. याला समांतर उदाहरण म्हणजे ॲण्टिबायोटीक रेसिसटण्ट बँक्टेरिया. ॲण्टिबायोटीक्सच्या अतिरेकमुळे सध्या सुपरबग्स निर्माण होताहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचे औषध मारू शकत नाही.
निर्यातीसाठी तपासण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांची यादी सध्या साडे तीनशे मॉलीक्युल्स एवढी लांब लचक आहे. म्हणजे साडे तीनशे रसायने त्या फळांमध्ये प्रमाणाच्या आत आहेत हे आम्हाला तपासावे लागते. प्रत्येक वर्षी ही यादी वाढते कारण काही रसायने काम करेनाशी होतात. काही बँन होतात. काही मागल्या वर्षीच्या यादीत नसलेली म्हणून वापरली जातात. पण प्रत्येक देशात शेतकऱ्यांची लाडकी अशी काही ठराविक नेहमी आढळणारी असतात. त्यामुळे सगळी साडेतीनशे अजून तरी कुणी मारल्याचे ऐकिवात नाही हे नशीब!
या प्रत्येक रसायनाचा पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल (phi) उपलब्ध असतो. म्हणजेच तोडणीच्या आधी किती दिवस याची फवारणी केली तर याचे अंश फळावर राहणार नाहीत याचे तयार गणित उपलब्ध असते. तरीही तोडणीच्या दोन दिवस आधीदेखील फवारणी होताना दिसते. निर्यातीसाठी तयार होणाऱ्या फळांवर ही सगळी काळजी घेऊन फवारणी केली जाते. म्हणजे, एखादी गोष्ट लक्षात घेऊन तिचा योग्य वापर करण्याची ताकद आपल्याकडे आहे. मग हीच, आपण कुठलाही कायदा बसवला नसताना का वापरत नाही? याचं कारण अज्ञान, भीती, रसायन कंपन्यांचे मार्केटिंग आणि लोकल तपासणी संस्थांचा "चालता है" दृष्टीकोन. यातून जेव्हा आपण बाहेर येऊ तेव्हा निर्यातीसाठी वेगळी अशी तपासणी आणि संस्था लागणारच नाही.