Wednesday, October 9, 2013

देऊळ




नुकताच 'देऊळ' हा चित्रपट बघितला. खरंतर मी खूप दिवसात नाना पाटेकरचा कुठलाच चित्रपट बघितला नव्हता त्यामुळे डीव्हीडी घेताना नानाच्या डाय हार्डच्या भूमिकेतून घेतली. पण चित्रपट बघितल्यावर मला खूप मोठा साक्षात्कार झाला. तो सांगण्यासाठी मला तीन वाक्यात या चित्रपटाची गोष्ट सांगणं जरूरीचं वाटतं.

एक दुर्लक्षित गाव असतं. तिथे एकाला गाय चारायला गेलेला असताना दत्ताचा साक्षात्कार होतो. त्यामुळे गावात गाईचं आणि दत्ताचं देऊळ बांधतात आणि त्या गावाची 'जागृत देवस्थान' अशी प्रसिद्धी होते.

गोष्ट पुढे जात असताना बरेच प्रश्न मनात येतात. माझ्यासारख्या सायकॉलॉजी टुडेचा रातीभ असणार्‍या लोकांना साक्षात्काराला "सायकॉलॉजीकल टर्म्स" मध्ये काय बरं म्हणतील असे प्रश्न पडू लागतात. साक्षात्कार झाल्यावर केश्या (गिरीश कुलकर्णी) गावातल्या सुशिक्षित आणि तर्कशुद्ध विचार करणार्‍या अण्णा कुलकर्णींकडे (दिलीप प्रभावळकर) जातो. साक्षात्कार हा एक वैयक्तिक अनुभव आहे. आणि आपल्याला जसा देव दिसतो तो दुसर्‍याला दिसेलच असं काही नाही असं अण्णांचं मत ऐकून केश्या आनंदी होतो. आपल्याला दत्त दिसल्याची बातमी जरी त्यानी गावात केली असली तरी त्याचं पुढे काही व्हावं असं त्याला वाटत नाही. पण ही बातमी ऐकून गावातील बेकार तरुणांची टोळी पैसे उभे करून मंदिर बांधायला सज्ज होते. त्यात गावचे पुढारी भाऊ गलांडे (नाना पाटेकर) यांना पुढाकार घेण्याची विनंती होते. आधी अण्णांशी सहमत असलेले भाऊ राजकीय वारे बघून देवळाच्या गटात सामील होतात. हळू हळू सुरु झालेलं काम जोमाने संपतं आणि देवळांमुळे गावाचा भरपूर सांपत्तिक विकास होतो. गावात वीज येते, घरी बसून राहणार्‍या बायका मंदिराच्या बाहेर दुकानं उघडून गंडेदोरे, उदबत्त्या, पोथ्या, नारळ विकू लागतात. आणि थोडे दिवसांनी देत्त हा गावच्या रोजगारनिर्मितीचा मुख्य स्त्रोत होऊन जातो.

चित्रपटाच्या या भागानंतर अण्णा गाव सोडून जायला लागतात तेव्हा भाऊसाहेब त्यांना थांबवायला येतात. इथे नानाच्या अभिनयाचे पैसे वसूल झाले आहेत. देवामुळे जर गावाचा विकास होत असेल तर देवाला का नाही विकायचं? देवामुळे गावाचं राहणीमान सुधारत असेल तर देवाला का नाही विकायचं? आणि देव आहे किंवा नाही, तो प्रकट आहे किंवा अप्रकट, तो मंदिरात आहे की सगळीकडे या उत्तर नसलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना, देवळाबाहेर बसून दिवसभर फुलं विकणार्‍या गाववालीच्या उत्कर्षाचे मोजमाप मात्र नक्कीच होऊ शकते.

अर्थात याबरोबर भ्रष्टचारदेखील वाढतो. गावची अधिकारी मंडळी राजरोसपणे पैसे खाऊ लागतात. पण हे सगळं गावात एखादा साखर कारखाना उभा झाला असता तरी झालं असतं आणि कदाचित जास्त प्रमाणात झालं असतं. कारखाना उभा करण्यासाठी जास्त मनुष्यबळ, बुद्धिमत्ता, कष्ट आणि पैसे लागले असते, जे इथे लागले नाहीत.

इथे खटकणारा मुद्दा हा आहे की हा श्रद्धेचा व्यापार आहे. आणि तो व्यापार आहे हे कबूल केल्यावरच त्याकडे इतक्या तटस्थ नजरेने बघता येतं. आणि त्या व्यापाराकडे प्रगतीचा मार्ग म्हणून बघणार्‍या भाऊंचा मुद्धा पटवून घ्यायचा नसला तरी विचार करायला भाग पाडतो. त्याचं समर्थन करणार्‍यांची बाजू पूर्णपणे कमकुवत ठरवता येत नाही.
भारतात असे व्यापार सगळीकडे उघडपणे चालतात. भारतातली देवळे जशी श्रीमंत आहेत तशीच पाश्चात्य देशातील चर्चेसदेखील आहेत. धार्मिक संघटनांकडे पैसा येणे आणि त्याचा कधी चांगला तर कधी वाईट वापर होणे हे कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. कारण या संस्थांकडे लोक फक्त देव शोधत येत नाहीत. बर्‍याचवेळेस तिथे लोक स्वत:च्या शोधात जातात. स्वत:सारख्या दुसर्‍यांच्या शोधात जातात. कधी कधी आपल्यासारख्या नसलेल्यांच्या विरोधात जातात. कधी आपलं अस्तित्व भक्कम आहे याची खात्री करण्यासाठी जातात. या जनप्रवाहात वाहून देवाचा व्यापार करणारे लोक देवासाठी काम करतात का माणसासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे.


No comments:

Post a Comment