कथा कधीच एखाद्या सुंदर महालासारखी बांधून ठेवता येत नाही. कुणीतरी असा महाल बांधावा आणि मग वाचकांनी/प्रेक्षकांनी त्यातून फेरफटका मारून वाह वाह म्हणून निघून जावं, हा कदाचित चांगल्या कथेचा पराजय आहे. कथा जगणारे, अनुभवणारे, भोगणारे, कथेचे साक्षीदार-- लेखक, आणि कथेचे वाचक हे सगळे मिळून ती कथा सतत बांधत असतात. आणि कथेच्या या प्रवासातले सगळे हमसफर त्या कथेत आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या कथा मिसळत असतात. सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर दिग्दर्शित 'संहिता' हा चित्रपट एका गोष्टीच्या या प्रवासाचं अचूक रेखाटन करतो.
दोन वेगळ्या कालखंडात घडणार्या दोन कथा एका धाग्यात पकडून त्यातून एक अतिशय अंतर्मुख करणारा विचार प्रवाह हा चित्रपट घेऊन येतो. गोष्ट उघड न करता सांगायचं झालं तर ही कथा एक मूलभूत प्रश्न घेऊन येते. आपलं अस्तित्व आपण कशात शोधायचं? आपली ओळख कधी सूर्यप्रकाशासारखी पूर्ण आपली असते तर कधी चांदण्यासारखी परप्रकाशित असते. पण एखाद्यावर या अस्तित्वशोधाच्या गुंत्यातून निसटून प्रेम करण्यासाठी कधी धाडस लागतं तर कधी निरागसता,(आणि कधी दोन्ही!). आपण सगळेच आपल्या आयुष्याची गोष्ट लिहित असतो. आणि ती लिहिताना, नकळत आपल्याला जे भावतं ते वळण तिला देत असतो. पण ते सगळ्यांनाच दिसेल असं नाही. या चित्रपटात अशी एक पटकथा लिहिण्यासाठी सज्ज झालेली तरुण, तडफदार लेखिका (देविका दफ्तरदार), ती कथा तिला जिथे घेऊन जाते आणि त्या कथेशी निगडीत असलेल्या लोकांच्या आरशांमध्ये ती जशी प्रतिबिंबित होते हे पाहून अंतर्मुख होते. एखाद्याला प्रेमात समर्पण दिसतं तर एखाद्याला शोषण. काही अलिप्त पाहण्यार्यांना दोन्ही दिसेल. पण कुठल्या क्षणी नक्की काय असेल हे मात्र ती कथा जगणारेदेखील ठामपणे सांगू शकणार नाहीत.
मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सचदेव यांची केमिस्ट्री जमून आलेली आहे. या कथेला सजवण्यात वेशभूषाकार गीता गोडबोले यांचा फार मोलाचा वाटा आहे असं चित्रपट बघून जाणवतं. १९४६ आणि आजच्या काळातला बदलाव वेशभूषेच्या जोरावरच उठून दिसला आहे. देविका दफ्तरदार तिची भूमिका जगली आहे. तिला इतर कलाकारांची साथही छान मिळाली आहे. आरती अंकलीकर यांच्या आवाजानी कथेचा शृंगार खर्या अर्थाने पूर्ण झालेला आहे. चित्रपटातील गाणी श्याम बेनेगल यांच्या सरदारी बेगमची आठवण करून देतात. पण चित्रपटाचा प्रभाव हा त्यातून उपस्थित होणार्या फिलॉसॉफिकल प्रश्नांमुळेच होतो.
एकच भौतिक पातळीचा प्रश्न पडतो. गाडगीळांनी सिनेमातल्या राणीला घातलेले दागिने सामान्य ग्राहकांसाठी कुठल्या दुकानात उपलब्ध आहेत? :)
आजच्या "हॅव्ह इट ऑल" पिढीनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे. प्रवाहात कशीही वळणं आली तरी आपल्या गोष्टीचा शेवट मात्र नक्कीच अधिक प्रमाणात आपल्याच हातात असतो. आणि आपल्या शेवटानंतर सुरु होणार्या आवर्तनाचा रंगही आपल्याच हातात असतो अशी काहीशी भावना हा चित्रपट देऊन जातो.