Tuesday, October 22, 2013

संहिता




कथा कधीच एखाद्या सुंदर महालासारखी बांधून ठेवता येत नाही. कुणीतरी असा महाल बांधावा आणि मग वाचकांनी/प्रेक्षकांनी त्यातून फेरफटका मारून वाह वाह म्हणून निघून जावं, हा कदाचित चांगल्या कथेचा पराजय आहे. कथा जगणारे, अनुभवणारे, भोगणारे, कथेचे साक्षीदार-- लेखक, आणि कथेचे वाचक हे सगळे मिळून ती कथा सतत बांधत असतात. आणि कथेच्या या प्रवासातले सगळे हमसफर त्या कथेत आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या कथा मिसळत असतात. सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर दिग्दर्शित 'संहिता' हा चित्रपट एका गोष्टीच्या या प्रवासाचं अचूक रेखाटन करतो.

दोन वेगळ्या कालखंडात घडणार्‍या दोन कथा एका धाग्यात पकडून त्यातून एक अतिशय अंतर्मुख करणारा विचार प्रवाह हा चित्रपट घेऊन येतो. गोष्ट उघड न करता सांगायचं झालं तर ही कथा एक मूलभूत प्रश्न घेऊन येते. आपलं अस्तित्व आपण कशात शोधायचं? आपली ओळख कधी सूर्यप्रकाशासारखी पूर्ण आपली असते तर कधी चांदण्यासारखी परप्रकाशित असते. पण एखाद्यावर या अस्तित्वशोधाच्या गुंत्यातून निसटून प्रेम करण्यासाठी कधी धाडस लागतं तर कधी निरागसता,(आणि कधी दोन्ही!). आपण सगळेच आपल्या आयुष्याची गोष्ट लिहित असतो. आणि ती लिहिताना, नकळत आपल्याला जे भावतं ते वळण तिला देत असतो. पण ते सगळ्यांनाच दिसेल असं नाही. या चित्रपटात अशी एक पटकथा लिहिण्यासाठी सज्ज झालेली तरुण, तडफदार लेखिका (देविका दफ्तरदार), ती कथा तिला जिथे घेऊन जाते आणि त्या कथेशी निगडीत असलेल्या लोकांच्या आरशांमध्ये ती जशी प्रतिबिंबित होते हे पाहून अंतर्मुख होते. एखाद्याला प्रेमात समर्पण दिसतं तर एखाद्याला शोषण. काही अलिप्त पाहण्यार्‍यांना दोन्ही दिसेल. पण कुठल्या क्षणी नक्की काय असेल हे मात्र ती कथा जगणारेदेखील ठामपणे सांगू शकणार नाहीत.

मिलिंद  सोमण आणि राजेश्वरी सचदेव यांची केमिस्ट्री जमून आलेली आहे. या कथेला सजवण्यात वेशभूषाकार गीता गोडबोले यांचा फार मोलाचा वाटा आहे असं चित्रपट  बघून जाणवतं. १९४६  आणि आजच्या काळातला बदलाव वेशभूषेच्या जोरावरच उठून दिसला आहे. देविका दफ्तरदार तिची भूमिका जगली आहे. तिला इतर कलाकारांची साथही छान मिळाली आहे. आरती अंकलीकर यांच्या आवाजानी कथेचा शृंगार खर्‍या अर्थाने पूर्ण झालेला आहे. चित्रपटातील गाणी श्याम बेनेगल यांच्या सरदारी बेगमची आठवण करून देतात. पण चित्रपटाचा प्रभाव हा त्यातून उपस्थित होणार्‍या फिलॉसॉफिकल प्रश्नांमुळेच होतो.




एकच भौतिक पातळीचा प्रश्न पडतो. गाडगीळांनी सिनेमातल्या राणीला घातलेले दागिने सामान्य ग्राहकांसाठी कुठल्या दुकानात उपलब्ध आहेत? :)

आजच्या "हॅव्ह इट ऑल" पिढीनी आवर्जून  पाहावा असा हा चित्रपट आहे. प्रवाहात कशीही वळणं आली तरी आपल्या गोष्टीचा शेवट मात्र नक्कीच अधिक प्रमाणात आपल्याच हातात असतो. आणि आपल्या शेवटानंतर सुरु होणार्‍या आवर्तनाचा रंगही आपल्याच हातात असतो अशी काहीशी भावना हा चित्रपट देऊन जातो.  

Friday, October 11, 2013

आनंदाचे डोही




"तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे शोधून काढायचं असेल तर तुमचं मन वारंवार कुठे भरकटत जातं याकडे लक्ष दिलं पाहिजे", या अर्थाचा सुविचार/सल्ला मी आंतरजालावर वाचला होता. आजूबाजूला बघितलं तर हे बहुतांशी खरं वाटतं. कधी कधी आपल्या क्षेत्रातील कामातही आपल्याला खूप अवडणारं एखादं काम असतच. आणि ते आपल्याला करायला मिळेलच याची हमी देत येत नाही. पण या सगळ्या चिंता सोडून आपण पळून जातो तेव्हा कुठे जातो हे बघणे महत्वाचे आहे. आठ तास संगणकासमोर बसलेले लोक पूर्ण वेळ काम करत नाहीत हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते (स्टॅटकाऊंटर जिंदाबाद). त्यामुळे आंतरजालावर तुमचं मन कुठे कुठे भटकायला जातं याची यादी केलीत तर तुमच्या उपजीविकेप्रमाणेच तुमची जीविका कुठे आहे हे लक्षात येईल.

गेलं वर्षभर माझा हा प्रवाह "आनंद शोधाकडे" आहे. आपण आनंदी का आणि कशामुळे होतो, आपल्या आनंदाला आपण आणि आपली परिस्थिती कितपत कारणीभूत असतात? या प्रश्नांचा पाठलाग करताना मला काही उत्कृष्ठ टेड टॉक्स आणि पुस्तकं सापडली. त्याबद्दल हा पोस्ट.

टेड या संकेतस्थळावर जगभरातील नामवंत साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलाकार, समाजसुधारक, तंत्रज्ञ आपापल्या विषयावर भाषणे देतात. हे टॉक्स आपल्याला मोफत ऐकायला मिळतात. त्यातील पॉझिटीव्ह सायकॉलॉजीचे काही टॉक्स रंजक आणि पुन्हा पुन्हा बघावेत असे आहेत. त्यांची व्हॉट मेक्स अस हॅपी ही मालिका नक्कीच वेळ काढून बघण्यासारखी आहे. पण त्यातही बॅरी श्वार्ट्झ यांचा द पॅरडॉक्स ऑफ चॉईस हा टॉक पाहण्यासारखा आहे.

माणसाला खूप सारे विकल्प दिले तर त्याचा आनंदाचा शोध सोपा होईल या तत्वावर आजचा समाज धावतो आहे. भारतात ९०-९१ च्या आधी जी परिस्थिती होती ती आता नाही. तेव्हा "नूडल्स" म्हणजे "मॅगी" आणि वनस्पती घी  म्हणजे "डालडा" (पिवळा डबा, विथ नारळाचं झाड) अशी समीकरणं होती. आता आपली सुपरमार्केट्स आणि मॉल्स जगाच्या पावलावर पाऊल ठेवून आहेत. त्यामुळे खूप सारे ऑपशन्स असल्यावर कधी कधी संभ्रमात पडायला होतं आणि परिणामी आनंदशोधाच्या हायवेवर गाडी बंद पडण्याचे अनुभव सगळ्यांना येतात (वरसंशोधनातील आमचे अनुभव इथे योग्य ठरतील पण त्याबद्दल नंतर लिहू).

पॉझिटीव्ह सायकॉलॉजी या शाखेचा उगम हाच मुळी 'माणसाला आनंद कशाने होतो?' या प्रश्नातून झाला. त्या आधी मानसशास्त्राचा ओढा 'माणसाला दु:ख आणि परिणामी मनोविकार (किंवा मनोविकार आणि परिणामी दु:ख) कशामुळे होतं?' या प्रश्नाकडे होता. या क्षेत्रात जॉनथन हेड्ट यांचं काम मोलाचं आहे. आजकालच्या जगात धार्मिक विचारांचं महत्व कमी झाले आहे. त्यांचं हॅपिनेस हायपोथेसिस हे पुस्तक वाचनीय आहे. त्यात हेड्ट यांनी जगातील सर्वात जुन्या धर्मांच्या शिकवणी आणि त्यातील आपल्या चिरंतन आनंदासाठी कारणीभूत असलेल्या काही रिती/विचार आजच्या पिढीला समजेल अशा भाषेत व्यक्त केले आहेत.

या पुस्तकातील "अ‍ॅब्सोल्यूट फ्रीडम" वरचे त्यांचे भाष्य वाचनीय आहे. सगळी सामाजिक आणि नितीमत्तेची प्रस्थापित मुल्य झुगारून जगण्यार्‍या माणसांमध्ये एकटेपणा येण्याचे प्रमाण जास्त आहे असे दिसून आले आहे. कारण पूर्ण स्वतंत्र्याबरोबर ज्या जबाबदार्‍या येतात त्या पेलणं कठीण असतं. आनंदी राहण्यामागे दुसर्‍याच्या आनंदात सहभागी होणं/दुसर्‍याच्या आनंदाची जबाबदारी घेणं याही गोष्टींचा समावेश होतो.

तसंच एखाद्या गोष्टीत "हरवून जाणे" याचाही आपल्या आनंदाशी जवळचा संबंध आहे. अर्थात हे भारतीय तत्वज्ञानात पावलोपावली वाचायला मिळतं. ईश्वराशी एकरूप होण्याबद्दल किंवा आपल्या कामाशी एकरूप होण्याबद्दल आपल्या पुराणात खूप लिहिले गेले आहे. पण जेव्हा मिहाली चिकसेंटमीहाय सारखा मानसशास्त्रज्ञ त्याचा दाखला देतो तेव्हा अर्थातच त्याला अजून महत्व प्राप्त होतं. ;)
पण याचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो. एखाद्या कामात पूर्णपणे हरवून गेल्यामुळे जेवण करायला विसरलो तर तो दिवस जास्ती चांगला जातो.

अ‍ॅलन द बॉटन यांचा यशस्वी होण्याच्या व्याख्यांबद्दल बोलणारा हा टॉकदेखील अंतर्मुख करणारा आहे. त्यांची खुमासदार शैली आणि मुद्देसूदपणा  यामुळे तो अधिक प्रभावी ठरतो. जगातील आपली प्रतिष्ठा किंवा आपल्याला मिळणारं प्रेम हे आपल्या ऐहिक आणि सामाजिक प्रगतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कित्येक वेळा आपण आपल्याला जे मनापासून आवडत नाही ते केवळ त्यामागे असलेल्या प्रतिष्ठेसाठी करतो. आणि त्यातून नेहमीच आपल्याला आनंद मिळेल अशी खात्री देता येत नाही.

शेवट मात्र माझ्या आजोबांच्या दोन आवडत्या कवितांनी करावासा वाटतो. आजोबा नेहमी दोन परस्परविरोधी कविता म्हणायचे.

पहिली म्हणजे शूर शिपाई

मळ्यास माझ्या कुंपण पडणे कधी न मला साहे 
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे

आणि दुसरी

असे मी करावे तसे मी करीन
वृथा वल्गना  मानवाच्या अजाण 
स्थितीचा असे किंकर प्राणीमात्र 
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र

पण थोडा विचार केला की लक्षात येतं की योग्य वेळी योग्य कविता आठवून मनाची समजूत घालण्यातच खरी आनंद यात्रा आहे. आपल्याला हवं तेच होईल किंवा आपल्याला हवं तसं कधीच होणार नाही हे दोन्ही पर्याय पूर्णपणे बरोबर नाहीत. आणि या पर्ययांकडे बघण्याआधी आपल्याला काय हवंय हे समजणं आनंदी होण्यासाठी (राहण्यासाठी) अधिक महत्वाचं आहे. 

Wednesday, October 9, 2013

देऊळ




नुकताच 'देऊळ' हा चित्रपट बघितला. खरंतर मी खूप दिवसात नाना पाटेकरचा कुठलाच चित्रपट बघितला नव्हता त्यामुळे डीव्हीडी घेताना नानाच्या डाय हार्डच्या भूमिकेतून घेतली. पण चित्रपट बघितल्यावर मला खूप मोठा साक्षात्कार झाला. तो सांगण्यासाठी मला तीन वाक्यात या चित्रपटाची गोष्ट सांगणं जरूरीचं वाटतं.

एक दुर्लक्षित गाव असतं. तिथे एकाला गाय चारायला गेलेला असताना दत्ताचा साक्षात्कार होतो. त्यामुळे गावात गाईचं आणि दत्ताचं देऊळ बांधतात आणि त्या गावाची 'जागृत देवस्थान' अशी प्रसिद्धी होते.

गोष्ट पुढे जात असताना बरेच प्रश्न मनात येतात. माझ्यासारख्या सायकॉलॉजी टुडेचा रातीभ असणार्‍या लोकांना साक्षात्काराला "सायकॉलॉजीकल टर्म्स" मध्ये काय बरं म्हणतील असे प्रश्न पडू लागतात. साक्षात्कार झाल्यावर केश्या (गिरीश कुलकर्णी) गावातल्या सुशिक्षित आणि तर्कशुद्ध विचार करणार्‍या अण्णा कुलकर्णींकडे (दिलीप प्रभावळकर) जातो. साक्षात्कार हा एक वैयक्तिक अनुभव आहे. आणि आपल्याला जसा देव दिसतो तो दुसर्‍याला दिसेलच असं काही नाही असं अण्णांचं मत ऐकून केश्या आनंदी होतो. आपल्याला दत्त दिसल्याची बातमी जरी त्यानी गावात केली असली तरी त्याचं पुढे काही व्हावं असं त्याला वाटत नाही. पण ही बातमी ऐकून गावातील बेकार तरुणांची टोळी पैसे उभे करून मंदिर बांधायला सज्ज होते. त्यात गावचे पुढारी भाऊ गलांडे (नाना पाटेकर) यांना पुढाकार घेण्याची विनंती होते. आधी अण्णांशी सहमत असलेले भाऊ राजकीय वारे बघून देवळाच्या गटात सामील होतात. हळू हळू सुरु झालेलं काम जोमाने संपतं आणि देवळांमुळे गावाचा भरपूर सांपत्तिक विकास होतो. गावात वीज येते, घरी बसून राहणार्‍या बायका मंदिराच्या बाहेर दुकानं उघडून गंडेदोरे, उदबत्त्या, पोथ्या, नारळ विकू लागतात. आणि थोडे दिवसांनी देत्त हा गावच्या रोजगारनिर्मितीचा मुख्य स्त्रोत होऊन जातो.

चित्रपटाच्या या भागानंतर अण्णा गाव सोडून जायला लागतात तेव्हा भाऊसाहेब त्यांना थांबवायला येतात. इथे नानाच्या अभिनयाचे पैसे वसूल झाले आहेत. देवामुळे जर गावाचा विकास होत असेल तर देवाला का नाही विकायचं? देवामुळे गावाचं राहणीमान सुधारत असेल तर देवाला का नाही विकायचं? आणि देव आहे किंवा नाही, तो प्रकट आहे किंवा अप्रकट, तो मंदिरात आहे की सगळीकडे या उत्तर नसलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना, देवळाबाहेर बसून दिवसभर फुलं विकणार्‍या गाववालीच्या उत्कर्षाचे मोजमाप मात्र नक्कीच होऊ शकते.

अर्थात याबरोबर भ्रष्टचारदेखील वाढतो. गावची अधिकारी मंडळी राजरोसपणे पैसे खाऊ लागतात. पण हे सगळं गावात एखादा साखर कारखाना उभा झाला असता तरी झालं असतं आणि कदाचित जास्त प्रमाणात झालं असतं. कारखाना उभा करण्यासाठी जास्त मनुष्यबळ, बुद्धिमत्ता, कष्ट आणि पैसे लागले असते, जे इथे लागले नाहीत.

इथे खटकणारा मुद्दा हा आहे की हा श्रद्धेचा व्यापार आहे. आणि तो व्यापार आहे हे कबूल केल्यावरच त्याकडे इतक्या तटस्थ नजरेने बघता येतं. आणि त्या व्यापाराकडे प्रगतीचा मार्ग म्हणून बघणार्‍या भाऊंचा मुद्धा पटवून घ्यायचा नसला तरी विचार करायला भाग पाडतो. त्याचं समर्थन करणार्‍यांची बाजू पूर्णपणे कमकुवत ठरवता येत नाही.
भारतात असे व्यापार सगळीकडे उघडपणे चालतात. भारतातली देवळे जशी श्रीमंत आहेत तशीच पाश्चात्य देशातील चर्चेसदेखील आहेत. धार्मिक संघटनांकडे पैसा येणे आणि त्याचा कधी चांगला तर कधी वाईट वापर होणे हे कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. कारण या संस्थांकडे लोक फक्त देव शोधत येत नाहीत. बर्‍याचवेळेस तिथे लोक स्वत:च्या शोधात जातात. स्वत:सारख्या दुसर्‍यांच्या शोधात जातात. कधी कधी आपल्यासारख्या नसलेल्यांच्या विरोधात जातात. कधी आपलं अस्तित्व भक्कम आहे याची खात्री करण्यासाठी जातात. या जनप्रवाहात वाहून देवाचा व्यापार करणारे लोक देवासाठी काम करतात का माणसासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे.