Friday, May 28, 2021

हे राम!!

 आई! मी डे-केअरच्या नाटकात राम झालोय!" 

आमचे चिरंजीव किंचाळत पाळणाघराच्या दाराबाहेर आले. राम झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. 
"मी राम, मीरा सीता, विहान लक्ष्मण आणि परी झाड." 
"परी काय?" 
"झाड! झाड!! असं पानं फुलं असतात ना त्याला, वरून ग्रीन ग्रीन असतं.."
"पुरे पुरे! मला माहिती आहे झाड काय असतं ते. पण हे चूक आहे."
"काय? तू सीतेबद्दल बोलतेस का? मी म्हणालो टीचरना. मीरा नाईन यर्सची मी फाईव्ह. आणि माझ्यापेक्षा उंच आहे. पण त्यांनी ऐकलं नाही" 

या तीनफुटी पुरुषाचा लग्नव्यवस्थेवर इतका अभ्यास कधी झाला या धक्क्यातून सावरता सावरता, त्याला असले तपशील कोण सांगतंय त्यांचा मी कसा बंदोबस्त करणार यावरही काही कल्पना डोळ्यासमोर तरळून गेल्या.

"सीतेचा काय संबंध! तुला कुणी सांगितलं की बायको नवऱ्यापेक्षा वयानं आणि उंचीनं कमी असली पाहिजे?"

"कुणी नाही! पण तू बाबांपेक्षा फोर यर्सनी लहान आहेस आणि बाबांबरोबर फोटो काढताना तू ते स्टिक वर ठेवलेले शूज घालतेस" 

काय निरीक्षण आहे! आता त्याला अनुरूप नवरा बायको कसे असावेत हे रोज कृतीतून दाखवल्याबद्दल स्वतःलाच शिक्षा करायची वेळ आली होती. आजपासून हाय हिल्स बंद. कारण आता पोरासाठी आईपेक्षा लहान असलेला बाबा शोधायची वेळ निघून गेली होती.

दुसऱ्या दिवशी मी डेकेअरमधल्या टीचरना बाहेर भेटायला बोलावलं. 
"तुम्हाला माझ्या मुलाला राम करायची परवानगी नाही"
"म्हणजे?"
"म्हणजे, मला न विचारता माझ्या मुलाला तुम्ही राम का केलंत?  हे खूप धार्मिक होतंय. आधीच सगळे धार्मिक सण तुम्ही साजरे करता. माझ्या मुलाला अथर्वशीर्ष तुम्ही शिकवलं. एक दिवस तो रामरक्षा म्हणत घरी आला. गणपतीची आरती, विठ्ठलाची गाणी सगळं सगळं सहन केलं मी. पण आता मात्र हद्द झाली. थेट राम करायला निघालात माझ्या मुलाला?" 
बाईंना मला नक्की कशाचा राग येतोय हे कळेना. म्हणून त्यांनी त्यातल्या त्यात जमेल ते केलं.  मला पाणी आणि खुर्ची आणून दिली. 

"अहो! यासाठीच तर पालक आम्हाला नावाजतात. तुमचं मूल इथे आलं की त्याच्यावर सगळे संस्कार होतील याची आम्ही जबाबदारी घेतो"

 "हाच! हाच! हाच! हाच माझा प्रॉब्लेम आहे" 

"अहो म्हणजे काय? संस्कार नको आहेत का मुलावर तुम्हाला?" 

"तो अतिसंस्कारी होतोय असं मला वाटायला लागलंय. मला माझा मुलगा मोठा झालेला पाहायचाय. अलोक नाथ नाही! आज तो राम म्हणून फुशारून जातोय! पण राम राम करण्यापेक्षा त्यानं दुसरं काहीही करावं. काहीही व्हावं" 

"अहो म्हणजे काय? साधा नाटकातला भाग आहे तो! तसें आमच्याकडे खूप राम होते. पण त्यातून आम्ही याला निवडलं कारण तुमच्या मुलाचा तोंडवळा एकदम सोज्वळ आणि शांत दिसतो"

ती बाई पुढे बाबांवर गेलाय असं म्हणतीये असा मलाच भास झाला बहुतेक.

"तुम्ही असं करा. माझ्या मुलाला झाड करा आणि परीला राम करा." 

"अहो पण परी मुलगी आहे!" 

"मग? मुली राम असू शकत नाहीत का?"

माझ्या या प्रश्नावर बाईंनी उत्तर न देऊन शहाणपणा केला. पण तोंडातून एकही शब्द आला नसला तरी त्यांच्या शरीराच्या रोमारोमातून मी किती चक्रम आहे अशी प्रतिक्रिया येत होती. येऊ देत बापडी. असं लोकांना आपण चक्रम वाटू म्हणून किती सहन करायचं? डे केअरमधून ऑफिसला जाता जाता मला माझ्या तीर्थरुपांनी केलेला चक्रमपणा आठवला. मी लहान असताना एकदा आम्ही कुठेतरी बसनं जात होतो. तर आमच्या सीटांची तिकिटं दोन वेळा विकली होती. त्यामुळे सारखी तिकिटं असलेले चार लोक उभे राहिले होते. आणि बाबांना त्या बसवल्यानं  दुसऱ्या नंबरची जागा दिली. मी आणि आई गाशा गुंडाळून नवीन सीटवर जाणार इतक्यात बाबाच गायब झाले. पाहतो तर काय! ते बस समोर जाऊन आडवे झाले होते. मला दिलेल्या नंबरच्याच तिकिटावर बसायचंय म्हणून. मग दुसऱ्या दोन जणांनी माघार घेतली आणि आम्ही निघालो. जर माझा बाप असल्या फालतू कारणासाठी बस समोर आडवा होऊ शकतो तर कुठल्यातरी संस्कारी बाईला मी चक्रम वाटले तर काहीच हरकत नाही. लहान असताना, असल्या लोकांनी आपल्याला जन्म दिल्यामुळे जगात आपली किती छीथू होते असं ज्या लोकांबद्दल वाटलं होतं, त्यांच्यासाठी आपल्या हृदयात आज करुणा आहे हेच मोठं झाल्याचं लक्षण! असले सोयीस्कर विचार करून मी दिवस काढला.
संध्याकाळी पोराला न्यायला गेले. 

"आई!" 
अशी कानाचे पडदे भेदून मेंदूत चीर पडणारी किंकाळी ऐकू आली. 
"आई! तू टीचरना माझं झाड करायला लावलंस?"
आता खरंतर मायलेकात भांडण न लावणे हे खरे संस्कार! पण बाईंनी रामाचा खरेपणाच तेवढा लक्षात घेऊन माझ्या लेकाला त्याच्या डिमोशनचं खरं कारण सांगितलं असावं. पण आम्ही अशा फालतू गोष्टींना घाबरत असतो तर.. जाऊदे उगाच फार बाता नकोत. आता त्या झाड झालेल्या भुताला शांत करायला काय त्यागावं लागणार हा विचार करून आपल्याला ही असली नाटकं सांगितलीयेत कुणी, असं वाटून गेलं. त्याच्या राम असण्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर आयुष्य नक्कीच सोपं झालं असतं. पण मग आपण म्हणजे या सगळ्या संस्कारांच्या पायाखालचं पायपुसणं आहोत असं वाटायला लागतं. कशाला पाहिजेत रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी? माझा मुलगा त्याच्यासारख्या छोट्या मुलांच्या गमती जमती ऐकू शकतोच की! 

आणि आजीने रामायणाच्या कथा सांगितल्यावर पोरानं प्रश्न विचारून इतकं बेजार केलं होतं की आजीबाईंनी दुसऱ्यादिवशी चुपचाप कपाटातून पंचतंत्र काढलं होतं. 
"आजी, कैकयी रॉंग असते. दशरथ तिला आधीच का सांगत नाही की हे रॉंग आहे."
"अरे त्यानं तिला वर दिलेला असतो. तिनी आधीच तशी विश मागितलेली असते"
"पण दुसऱ्याला जंगलात पाठवण्याची विश रॉंग आहे. मी जर तुला जंगलात पाठव अशी विश केली तर आई पाठवेल का?"

यावर फक्त माझ्या मातोश्रींनी हो म्हणू नये एवढंच मी रामाकडे मागत होते स्वयंपाकघरातून. 
गाडीमध्ये गाल फुगवून माझ्याकडे पाठ करून पोरगा खिडकीतून बाहेर बघत होता. मग मीच विषय काढला. 

"हे पहा, राम खरा आहे की नाही तुला माहिती आहे का? पण आपल्या आजूबाजूला रोज किती झाडं दिसतात!" 

"पण स्टोरीमध्ये तरी राम खरा असतो की. आणि त्याच्याकडे धनुष्यबाण पण असतो. राम काय माझा फेव्हरेट नाही. पण आई, त्याच्याकडे गेम म्हणून बघायचं. नाटक तरी कुठे खरं आहे? मला फक्त मुकुट घालून हातात धनुष्यबाण घ्यायचाय. माझ्याकडे धनुष्यबाण आहे हे पण मी टीचरला सांगितलं होतं. तू उगीच देवाचं टेन्शन घेते. तू देवाला एवढी घाबरत नको जाऊ. तो जर नाहीये, तर मग मी देव झाल्यानं काय फरक पडतो?" 

मी पुढचा यूटर्न घेऊन परत डे-केअरमध्ये गेले. टीचर कुलूप लावून निघायच्या तयारीत होत्या. 
"टीचर सॉरी. सकाळी मी जरा जास्तच बोलले. अजून जमत असेल तर करा याला राम."
टीचर हसल्या. आणि पोरगा नाचू लागला. 
घरी आल्या आल्या आम्ही धनुष्य बाण शोधू लागलो.