लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी संपली की हमखास एखादी वर्गातली मुलगी नाकात नाजूक सोन्याची तार घालून यायची. त्या तारेच्या गाठीला चिकटलेला एखादा लाल नाहीतर काळा लुकलुकणारा मणी असायचा. आमच्या मैत्रिणींच्या गटात मात्र अशा नाक टोचून आलेल्या मुलींची यथेच्छ थट्टा व्हायची. नाक टोचणे, छोटी लाल टिकली लावून येणे, कॅनव्हासच्या बुटांच्या आणि आतल्या मोज्यांच्या वरून पायात पैंजण घालून येणे (हे असे का करतात ते एकदा पैंजण आत ठेऊन भयंकर टोचल्यावर कळले) या सगळ्याची "आमच्या" गटात फार निंदा व्हायची.
पण नुकतीच शाळा बदलून नवीन शाळेत आल्यामुळे मला या अशा सौम्य दादागिरीमध्ये सहभागी होताना थोडे अवघडल्यासारखे व्हायचे. एखाद्या मुलीनी काही वेगळे केले, की तिच्याबद्दलचा एखादा कटाक्ष वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताना मी कितीतरी वेळा पकडलेला आहे. त्या कटाक्षाचा अर्थ, आणि त्यामुळे जिच्याबद्दल तो सोडला जातो आहे तिला होणार त्रास, या सगळ्याची मूक साक्षीदार झाल्याचे मला अगदी स्पष्ट आठवते आहे. आणि अगदी आत्ता, आत्ता, शाळेत अतिशय सर्वसामान्य दिसणारी (असणारी) मुलगी आता किती असामान्य झाली आहे याबद्दल असूयावजा, उसासे टाकत घडलेली चर्चादेखील ऐकली आहे. माझी सुट्टी कोल्हापुरात असल्यामुळे, मला टिकली, बांगडी, पैंजण, चमकी या सगळ्याबद्दल फार अप्रूप होते. पण आपल्याला अशा गोष्टींचीदेखील हौस आहे हे उघड करून मला शाळेतल्या त्या आगाऊ मुलींच्या गटात मिळालेलं स्थान गमवायची इच्छा नव्हती. पण ते स्थान मला संपूर्णपणे आवडत देखील नव्हते.
नाक टोचणे हे गावठीपणाचे लक्षण आहे. हे माझे (आजूबाजूच्या मुलींकडून उधार घेतलेले) पहिले मत होते. हे मत ग्राह्य धरले असते तर गावठीपणामध्ये पहिला नंबर माझ्या आईचाच आला असता हे वेगळे सांगायला नको. अर्थात, आई होताक्षणी आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात गावठी होतच असतो हेही गृहीतच होते. पण शाळेतल्या माझ्या लाडक्या इंग्रजीच्या बाईंच्या नाकात असाच एक लुकलुकता हिरा असायचा. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या आधी आमचे उच्चार ऑक्सफर्ड - केम्ब्रिजच्या दर्जाचे करून देणाऱ्या बाईपण गावठी? पण दहावीपर्यंत मी माझ्या गटातून येणाऱ्या दबावामुळे याबद्दलचे माझे असे विचार गुप्त ठेवले.
बारावीला असताना जर्मन भाषा शिकवणाऱ्या अतिशय टापटीप, पुरोगामी मॅडमच्या नाकात देखील लुकलुकणाऱ्या पाच हिऱ्यांची कुडी दिसली. नाक टोचून बायका जर्मनसुद्धा शिकवू शकतात हा एक फारच महत्वाचा साक्षात्कार होता. माझ्याही मनात तेव्हा असा लुकलुकता हिरा घ्यायचे विचार येऊ लागले. पण माझ्यावर शाळेत आधुनिक स्त्रीबद्दल झालेले संस्कार अजून तसेच होते. मग इंजिनियरिंगला गेल्यावर वर्गातला एक (देखणा) मित्र मला म्हणाला, "तुला नाकात एक छोटीशी चमकी फार छान दिसेल. मला अशा चमकी घातलेल्या मुली फार आवडतात." या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी नको तसा संबंध जोडून मी पहिल्यांदा नाक टोचले.
तोपर्यंत मला मिळालेले सगळे सल्ले हे कमी वाईट कसे दिसता येईल या अंगाचे असायचे. जसे की, काळ्या मुलींनी फिक्कट गुलाबी किंवा तत्सम रंग घालू नयेत. बारीक दिसण्यासाठी कायम काळे किंवा उभ्या डिझाईनचे कपडे घालावेत. केस कापणारीच्या मते, माझा चेहरा फारच आडवा होता. तो उभा करण्यासाठी तिनी माझ्याकडून भरपूर पैसे घेतले. नाकाबद्दल तर बोलावे तितके कमी. आमच्या गटात सगळ्यात वाईट नाकाचा बहुमान मला मिळाला होता. मागे वळून बघता, आम्ही आपापल्या नाकांमध्ये अशी स्पर्धा का लावत होतो हे तितकेच विचार करण्यासारखे आहे. दहावीतून बाहेर पडेपर्यंत आपण दिसायला चांगले नाही हे खात्रीशीर पटले होते. त्यामुळे कुणीतरी तुला अमुक एक गोष्ट खूप छान दिसेल असे कुठल्याही तडजोडीच्या दिशेने न नेता म्हणणे, हा आश्चर्याचा धक्काच होता.
नाक टोचल्यावर परत कॉलेजला जायच्या आधी नेहमीप्रमाणे "त्याला काय वाटेल" यावर अतिविचार केला. पण त्याने जितक्या दिलखुलासपणे तुला चमकी चांगली दिसेल असे सुचवले होते, तितक्याच दिलखुलासपणे ती दिसते आहे, हेदेखील कबूल केले. पण दोन चार दिवसातच नाक लाल लाल होऊन दुखू लागले. मग तुळशीचा रस, उगाळलेली मिरी, खोबरेल तेल या अशा उपायांमध्ये त्या चमकीनी (माझ्या एकटीच्याच) मनात टाकलेली ठिणगी विझून गेली. काही दिवसांनी नाकापेक्षा मोती जड झाल्यामुळे चमकीला निवृत्त करण्यात आले. एव्हाना मी कुठल्यातरी मुलाच्या पाठीमागे हे असले धाडस केले होते, आणि त्यातल्या दोन्ही गोष्टी विफल झाल्या ही वार्ता शाळा मैत्रिणींना कळली होती. आणि मी बिनचमकीचीच कशी चांगली दिसते यावर मला नको असलेले असे बरेच सल्ले देण्यात आले.
ऑस्ट्रेलियात शिकायला गेले तेव्हा विमानातून उतरल्या उतरल्या आपली पाटी आता संपूर्णपणे कोरी आहे हे लक्षात आले. ब्रिस्बनमधले वेस्टएंड हा माझा सर्वात आवडता भाग बनला. तिथल्या घसरगुंड्यांसारख्या वरती खाली जाणाऱ्या रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी "योगा स्टुडियो" पेरले होते. भारताची आठवण काढत मी तिथल्या योगा क्लासला जाऊ लागले. आधी मित्र मैत्रिणी व्हावेत म्हणून जायचे. नंतर मित्र मैत्रिणींना घेऊन जाऊ लागले. तिथे येणाऱ्या सगळ्या गौरांगना मात्र नाकात रंगीत चमक्या घालून यायच्या. बांधणीच्या कापडाचे ओम नाहीतर गणपतीचे टीशर्ट, त्याखाली धोतरासारखी पॅन्ट, कुरळ्या कुरळ्या केसांना घट्ट मिठी मारणारा कापडी हेयरबँड, गळ्यात जपाची नाहीतर तुळशीची माळ आणि पाठीवर तिरपे, भात्यासारखे लटकलेले योगा मॅट! त्यांचा तो थाट बघून आपण किती कमी भारतीय आहोत असे वाटायला लागायचे. अशाच सायकलवरून योगासनं करायला येणाऱ्या काही मैत्रिणी झाल्या. आणि त्यांच्या नाकातले ते साधे चमचमते खडे पाहून पुन्हा नाक टोचायची इच्छा झाली!
सुट्टी संपवून ब्रिस्बनला येताना माझ्या नाकात पुन्हा ती निवृत्त केलेली हिऱ्याची चमकी आली. माझ्या (सुंदर) सावळ्या रंगावर तो हिरा किती शोभून दिसतोय असं कितीतरी लोकांनी आवर्जून सांगितलं. आणि माझी, माझ्या पुढील काही वर्षं राहिलेल्या हिप्पी ओळखीकडे वाटचाल सुरु झाली. नाकातल्या हिऱ्याला साजेशी अशी पाश्चात्य ओळख तयार करण्यात फारच आनंद मिळाला. आणि उन्हात न बसता लाभलेला माझा रंग कित्येक गौरांगनांच्या कौतुकाचा विषय ठरू लागला. नाक टोचलेल्या मुली आपल्याला चांगल्या समजू शकतात हे लक्षात आल्यावर, मी पुढाकार घेऊन ताशा कित्येक मुलींशी मैत्री केली. आणि त्यातून त्यांच्यादेखील आयुष्यात नाक टोचणे, टॅटू करणे हे अतिशय बंडखोरीचे आहे, असे मानणाऱ्या मैत्रिणी आहेत हे लक्षात आले. नाक न टोचणे बंडखोरीचे समजणाऱ्या, आणि आपला "गहू" वर्ण आपल्याला चांगले स्थळ मिळवून देऊ शकत नाही अशी खात्री असलेल्या मला हा खूपच मोठा (सुखद) धक्का होता.
एकदा नाकात हौशेने चांदीची रिंग घातली आणि पुन्हा तुळशीचा रस वगैरे करायची पाळी आली. मग थिसिसच्या कामात, चमकी पुन्हा एकदा निवृत्त झाली. परत तिची आठवण आली ती अमेरिकेत. मी आणि माझी पट्ट मैत्रीण एलोडी, मिशिगनमधून लास व्हेगसपर्यंत (टप्प्या टप्प्यात) जाणार होतो. आमचे पहिले उड्डाण शिकागोमधून होते. तिथपर्यंतच्या प्रवासात अनेक आठवणी निघाल्या. त्यात ही एक चमकीची कथा होती. ती आठवून काय झाले माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी विमान पकडायच्या आधी शिकागोमधल्या एका पिअर्सिंग स्टुडियोत जाऊन पुन्हा नाकात चमकी घातली. यावेळी मात्र टोचणार्यानी चिघळू नये म्हणून एक अभिनव उपाय सांगितला. एखाद्या कान साफ करायच्या बडनी सतत त्यावर भरपूर मीठ असलेले पाणी लावत राहणे. जखमेवर मीठ चोळल्याने जखम बरीदेखील होते हे अतर्क्य वाटले, पण असे कित्येक विरोधाभास पाहिले असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पुन्हा कधीही टोचून घ्यायचे नाही असे ठरवले असल्यामुळे, मी तो मार्ग पत्करला. आमच्या प्रत्येक थांब्यावर हॉटेलमधून भरपूर मीठ घेऊन मी एका बाटलीत माझे औषध तयार ठेवले होते. आणि हा उपाय अजूनपर्यंत कामी येतो आहे. ती साधी टायटेनियमची चमकी मी अजून जपून ठेवली आहे. कारण ती बाहेर काढली की त्या प्रवासातल्या सगळ्या आठवणी जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात.
सुदैवाने, नाक टोचून घ्यायची ती शेवटची वेळ ठरली. काल नाकातली चमकी काढून नथ घालताना माझी आरशासमोर अर्धा तास झटापट चाललेली पाहून नवरा म्हणाला, "कशाला घालतेस तू हे असले जीवघेणे प्रकार? तू चमकी न घालता सुद्धा मला तितकीच सुंदर वाटतेस!". तेव्हा माझ्या तोंडातून आपसूक निघालेलं, "पण मी चमकी माझ्यासाठी घालते", हे वाक्य माझ्या नकट्या नाकावरचा तो वफादार हिराच बोलला असं वाटून गेलं!