Tuesday, May 30, 2017

लालू बोक्याच्या गोष्टी आणि आमची शाळा

माधुरी पुरंदरे यांची लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके अतिशय वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखी आहेत. लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनादेखील हसवणारी आणि खिळवून ठेवणारे, साधे सोपे विषय, आणि लेखनाला अनुरूप अशी, किंवा लेखनापेक्षाही काकणभर सरस अशी त्यांनी स्वतः काढलेली चित्र, यामुळे त्यांची पुस्तकं अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा प्रसिद्ध व्हावीत अशी आहेत.

त्यांच्या लेखनशैलीचे दोन महत्वाचे गुण आहेत. पहिला, त्यांच्या लेखनातून "उद्बोधक" असे काहीही प्रत्यक्षपणे सांगितले जात नाही. पण लहान मुलांना त्या पुस्तकांमधून, "दुसऱ्यांनासुद्धा असे प्रश्न पडतात. किंवा असं रडू येतं." असं वाटल्यामुळे मुलं त्या पुस्तकांमध्ये पटकन हरवून जातात. थोडक्यात, लहान मुलांचे भावविश्व समजून त्यांना पडणारे छोटे छोटे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या लेखनातून अप्रत्यक्षपणे होतो. दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे माधुरी ताईंचे अगदी छोट्या छोट्या डिटेलपर्यंत केलेले निरीक्षण, आणि त्याची रेखाटने. माधुरीताईंच्या चित्रातल्या "बाई" किंवा "आजी" अशी तरतरीत, साबणासारखी गुळगुळीत कधीही काढलेली नसते. तिचे सुटलेले पोट, थोडेसे ढगळ ब्लाउज, पिनेतून बाहेर आलेले केस हे सगळे अगदी हुबेहूब चितारलेले असते. त्यांच्या "शेजार" शृंखलेतील केतकीच्या शेजारी राहणारी सावित्री ताई तर माझी अतिशय आवडती आहे. दक्षिण भारतीय सावित्रीचे हेल असलेले मराठी तर माधुरी ताईंनी हुबेहूब पकडलेच आहे. पण तिचा बांधा, तिचे केस आणि तिचे वेगवेगळे (मॉडर्न) कपडे घालायची पद्धत बघितली की माधुरी ताईंच्या अभ्यासाचा अंदाज येतो. अशीच हलकीफुलकी पण खूप भावणारी दोन पुस्तके मी नुकतीच घेतली :

१. लालू बोक्याच्या गोष्टी.


निलू आणि पिलू या जुळ्या बहिणी घरी लालू नावाचा बोका आणतात त्याची ही गोष्ट आहे. यात लालू बोक्याचा एकूण आळशीपणा, त्याचा खादाडपणा यावर अतिशय विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच जे मार्जारप्रेमी आहेत, आणि ज्यांनी मांजरे अगदी जवळून पाहिली आहेत अशा मोठ्या माणसांनासुद्धा हे पुस्कात अतिशय आवडेल असे आहे. खरं तर, माझ्या मुलापेक्षा हे पुस्तक मलाच जास्त आवडते कारण यात काही काही गोष्टी इतक्या बारकाईने लिहिल्या आहेत की हसूही आवरत नाही आणि आपल्या आयुष्यातील तमाम मांजरांची आठवणही येते. एका ठिकाणी लालू बोक्याला आई ओरडताना म्हणते, "पूर्वी तुझी मानगूट धरून उचलायला चिमूट पुरायची, आता अख्खी मूठ वापरावी लागते". हे वाक्य ज्यांनी खायला प्यायला घालून बोके धष्ट पुष्ट केलेत त्यांना लगेच लक्षात येईल!
लालू बोक्याचा एक मित्रही आहे: चिचू उंदीर. लालू आणि चिचूची डायलॉगबाजी सुद्धा खूप विनोदी आहे.




२. आमची शाळा 



ज्यांना २-३ वर्षांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक अगदी उपयुक्त आहे. शाळेला जायचं म्हणजे काय, आणि तिथे काय काय असतं, याचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे, की मलासुद्धा पुन्हा शाळेला जावंसं वाटायला लागलं. या पुस्तकात पुन्हा माधुरी ताईचं निरीक्षण आणि त्यांचं डिटेलिंग अतिशय भावतं. शाळेत काय काय घडू शकतं यात अगदी शू होण्यापासून ते मारामारीपर्यंत सगळं सुंदर चित्रांमधून दाखवलं आहे. जोडीला अगदी मोजकीच पण मिश्किल वाक्य, जेणेकरून मुलांना आणि वाचून दाखवणाऱ्या मोठ्यांना दोघांना त्याचा आनंद घेता यावा. सुरुवातीला शाळा नको  नको म्हणणारे, शेवटी शाळेला सुट्टी आणि आता शाळा नाही म्हणून रडायला लागतात असा हा प्रवास आहे.

विविध देशांतील (साधारण) सहा वर्षांच्या मुलांचे जग कित्येक ताकदीच्या लेखकांनी आणि चित्रकारांनी रंगवलेले आहे. त्यात अमेरिकेतील बिल वॉटरसन (कॅल्विन अँड हॉब्स)  रशियातील व्हिक्तर द्रागुन्स्की (डेनिसच्या गोष्टी) फ्रान्समधील सॉम्पी-गॉसिनी (निकोलाच्या गोष्टी) असे (माझ्या वाचनात आलेले) लेखक आहेत. हे सगळे आणि माधुरी ताई एकाच ताकदीचे मला वाटतात. इतकी सुंदर पुस्तकं, तीदेखील इतक्या कमी किमतीत आणि कुठलाही अवाजवी गवगवा न करता उपलब्ध आहेत हेच माझ्यासारख्या  पालकांचं नशीब आहे.

माझ्या दोन वर्षांच्या मुलाला अजून वाचता येत नाही. पण त्याच्याकडे असलेल्या सगळ्या पुस्तकांमधून तो नेहमी माधुरी ताईंचीच पुस्तकं उचलतो. एकशे सदतिसावा पाय आणि (राधाच्या घरातले) साखर नाना या त्याच्या सगळ्यात आवडत्या गोष्टी आहेत. आणि नुसती चित्रं पाहून तो आता स्वतः सगळी गोष्ट सांगू शकतो. यातच त्या चित्रांमध्ये किती मेहनत आणि अभ्यास दडला आहे याची पावती आहे.





Friday, April 14, 2017

मी (तिच्याइतकी) आनंदी का नाही?

मी लहान असताना माझ्या आजीनी मला पत्र कसे लिहायचे हे शिकवले होते. आलेल्या पत्राला उत्तर द्यायचे असल्यास, सुरुवातीच्या मजकुरात संपूर्णपणे "त्यांच्यावर" लिहायचे. यात, "पुण्यात खूप पाऊस होतोय हे वाचून आनंद झाला" पासून, "तुमच्या नवीन घराबद्दल वाचून आनंद वाटला, अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा", पर्यंत सगळं यायचं. शेवटच्या परिच्छेदात आपली माहिती द्यायची. आणि शेवटच्या ओळीत घरातील सगळ्यांची चौकशी करायची. असे साधे साधे नियम होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत, ती काही पत्रं मला लिहायला लावायची आणि तपासायची. पत्रं लिहिण्यासाठी पोस्टकार्ड आणण्यापासून ते टाकताना लावायच्या स्टॅम्पपर्यंत सगळं मला करायला लावायची. मग पाठवलेल्या पत्रांच्या उत्तराची वाट बघण्यात वेगळीच मजा असायची. पत्रव्यवहारातून अप्रत्यक्ष संवाद व्हायचा, ज्यात काही औपचारिकता असायची, जसे, सा. न. वि. वी लिहिणे, मोठ्यांचा उल्लेख करताना तीर्थरूप वापरणे आणि लहानांचा करताना चिरंजीव वापरणे. अनौपचारिकतादेखील असायची, जिथे आपल्याला एखाद्या विषयाबद्दल काय वाटते आहे, याची दिलखुलास एकतर्फी मांडणी करता यायची. कधी कधी तशी मांडणी वाचणाऱ्याला आवडेलच याची खात्री नसायची. पण तो संवाद अप्रत्यक्ष आहे म्हणून लिहिणाऱ्याला मन मोकळं केल्याची भावना यायची.
आता तसे पत्रव्यवहार बंद झाले, पण त्यांची जागा एका दुसऱ्या अप्रत्यक्ष संवादाच्या माध्यमाने घेतली आहे. सोशल मीडिया.
हल्ली, कुणाची बरेच दिवसांनी भेट झाली की पूर्वी विचारले जाणारे कित्येक प्रश्न गैरलागू होतात.
"अरे! तू अजिबात बदलला नाहीस!"
"कुठे असतोस सध्या?"
"छोट्याचं काय चाललंय?"
"तो, तुझा मित्र क्ष आता काय करतो रे?"
असले सगळे प्रश्न सुद्धा, पत्रव्यवहारासारखेच मृत झालेत, कारण हल्ली या सगळ्याची उत्तरं आपल्या खिशात नाहीतर पर्समध्येच सापडतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम असल्या सोशल मीडिया संकेतस्थळांमुळे, संवादातील औपचारिकता निघून जाऊ लागली आहे. एकीकडे हे चांगले आहे. सोशल मीडियामुळे लोकांचे फोन, पत्ते जपून ठेवणे, पत्ता किंवा फोन नंबर बदल्यास सगळ्यांना एक एक करून तो कळवणे, हे सगळे आता एका मेसेज मध्ये नाहीतर एका फेसबुक पोस्टीत करता येते. तसेच शाळेपासून ते अगदी शेवटच्या नोकरीपर्यंत झालेला संपर्कसंचय आपल्या पाठीमागून आपल्या पाऊलखुणा याव्यात तसा येत असतो. तो जपून ठेवण्यासाठी आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून लोकांची चौकशी करायला फोन करणे, आवर्जून भेटायला जाणे अशा गोष्टी कमी केल्या तरी संपर्क ठेवता येतो.
जिथे पात्रात लिहिलेल्या काही गोष्टी आपल्याला कल्पनेने समजून घ्याव्या लागायच्या, त्या आता फोटोच्या नाहीतर व्हिडियोच्या माध्यमातून थेट आपल्यासमोर दिसायला लागल्या आहेत. पण हे होण्यात, पत्रव्यवहारातला एक महत्वाचा भाग गळून पडला आहे. तो म्हणजे आपण आस्थेने केलेल्या दुसऱ्याच्या चौकशीचा. फेसबुकच्या आपल्या पानावर आपल्याला जगाला कशाची माहिती द्यायचीये ती आपण टाकतो, तशीच दुसऱ्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काय सांगायचे आहे हे पाहतो. जे आवडेल त्यावर निळ्या अंगठ्याची मोहोर लावून आवडले असे जाहीर करतो. पण या संवादात, आजीचा तो "आपले" विषय बाजूला ठेऊन आधी "त्यांची" चौकशी करायचा शिष्टाचार आणि अट्टाहास निघून गेल्यासारखा वाटतो. आणि कुठेतरी बारीक, असूयेची झालर या सगळ्या देवाणघेवाणीत आल्यासारखी जाणवते.
अलीकडच्या काळात विविध देशातील शात्रज्ञांच्या कामातून सोशल मीडिया आणि एकटेपणा यावर बरेच संशोधन होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा अतिरेक एकटेपणाच्या भावनेला वाढवणारा आहे असे सिद्ध होते आहे. तसेच असा अतिरेक उदासीनता वाढवण्याचे काम करू शकतो असेही संशोधनातून सिद्ध होते आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून असे दिसून येते की सोशल मीडियावर, दुसऱ्यांचे आनंदी आणि ऐषोआरामाचे आयुष्य बघून तरुणांना वैषम्य,उदासीनता आणि त्यांच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतघ्नता वाटते. यातील कृतघ्नतेच्या भावनेमुळे ते पुन्हा पुन्हा एकटेपणा आणि उदासीतेच्या चक्रामध्ये अडकतात. डिजिटल फोटोग्राफीमुळे आणि त्याच्या स्मार्टफोनशी झालेल्या संयोगामुळे आयुष्यातले साधे साधे प्रसंग आता कायमचे टिपून ठेवता येतात. आणि एखाद्याच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचे साथीदार होण्याची जबाबदारी आपल्यावर येते. माणूस स्वभावत: जसा सांघिक आयुष्य आवडणारा प्राणी आहे, तसंच वरचढ ठरण्यासाठी स्पर्धा करणे, हादेखील मानवी गुणधर्म आहे. सोशल मीडियामधून या दोन्ही गुणधर्मांचे चांगले वाईट परिणाम बघायला मिळतात.
तसेच, संवादाच्या अप्रत्यक्ष असल्यामुळे, काही बाबतीत, खासकरून राजकीय विषयांवर लिहिणाऱ्यांची भीड चेपून संवादाचे विघटन गुंडगिरीमध्ये होताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर टोपण नावाने वावरणारे लोक जसे सोशल मीडियावर लिहतात तसे ते प्रत्यक्ष बोलू शकतील का हा मुद्दा विचार कारण्यासाखा आहे. आपल्याला कुणी ओळखत नाही म्हणून आपण एखाद्या स्त्रीला बलात्काराची धमकी देऊ शकतो, हा आत्मविश्वास फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादीत असतो हे कितीही खरे असले, तरी शहरी तरुण/तरुणी त्यांचा अधिकांश दिवस सोशल मीडियावर घालवतात हे गृहीत धरल्यावर अशी पडद्याआडून केलेली वागणूकदेखील धोकादायक वाटू लागते.
एखादी तान्ह्या बाळाची आई जेव्हा तिचे आणि तिच्या गोंडस बाळाचे फोटो सोशल मीडियावर टाकते, तेव्हा तिला त्या बाळासाठी रात्री अपरात्री उठावे लागणे आणि तिची झालेली दमछाक आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. एखाद्या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोशूट टाकले, तर ते कुठे करायचे आणि कसे करायचे याबद्दलच त्यांच्यात झालेली असंख्य भांडणे त्या फोटोंमध्ये दिसत नाहीत. आणि ग्लॅमरस कपडे घालणाऱ्या, आणि मेकअप करून असंख्य फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या सिनेतारकासुद्धा सकाळी आरशात बघताना आपल्यासारख्याच, रंगवलेल्या केसातून डोकावणारा तो एक पांढरा केस बघून खट्टू होत असतात, हे मात्र आपल्या कधीच लक्षात येत नाही.
हेच जर फोन उचलून किंवा त्याहीपेक्षा चांगले, प्रत्यक्ष भेटून, आपल्याला ज्यांचा हेवा वाटतो त्यांची चौकशी केली असता असे लक्षात येते की तेही आपल्यासारखीच कशाशीतरी झुंज देत असतात. प्रत्यक्ष भेटून बोलताना, संवादातील शिष्टाचारही पाळला जातो. आणि हल्ली दुर्लक्षित झालेल्या संवादातील श्रोत्याच्या भूमिकेतही आपल्याला जाता येते. वेळ वाचवणारी कितीही तांत्रिक उपकरणे आणि ऍप्स आपल्या हाताशी आली तरीही कित्येकांना वेळ कमीच पडतो अशी त्यांची तक्रार असते. पण हातातल्या मोबाईलला आपण जितका वेळ देतो, त्याच्या दहा टक्के वेळ जरी आपण खऱ्या खुऱ्या माणसांना भेटण्यासाठी दिला, तरी या मायाजालातून बाहेर येऊन थोडावेळ, आपल्या आयुष्याकडे लांबून बघायची संधी आपल्याला मिळू शकते. आणि असे बघितले असता लक्षात येते की प्रत्यक्ष भेटून मिठी मारण्याची, हातावर टाळी देऊन फिदीफिदी हसण्याची, कटिंग चहा पीत राजकारणावर चर्चा करण्याची मजा कमी झालेली नाही.

Thursday, March 30, 2017

नकट्या नाकातली हिरकणी


लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी संपली की हमखास एखादी वर्गातली मुलगी नाकात नाजूक सोन्याची तार घालून यायची. त्या तारेच्या गाठीला चिकटलेला एखादा लाल नाहीतर काळा लुकलुकणारा मणी असायचा. आमच्या मैत्रिणींच्या गटात मात्र अशा नाक टोचून आलेल्या मुलींची यथेच्छ थट्टा व्हायची. नाक टोचणे, छोटी लाल टिकली लावून येणे, कॅनव्हासच्या बुटांच्या आणि आतल्या मोज्यांच्या वरून पायात पैंजण घालून येणे (हे असे का करतात ते एकदा पैंजण आत ठेऊन भयंकर टोचल्यावर कळले) या सगळ्याची "आमच्या" गटात फार निंदा व्हायची.
पण नुकतीच शाळा बदलून नवीन शाळेत आल्यामुळे मला या अशा सौम्य दादागिरीमध्ये सहभागी होताना थोडे अवघडल्यासारखे व्हायचे. एखाद्या मुलीनी काही वेगळे केले, की तिच्याबद्दलचा एखादा कटाक्ष वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताना मी कितीतरी वेळा पकडलेला आहे. त्या कटाक्षाचा अर्थ, आणि त्यामुळे जिच्याबद्दल तो सोडला जातो आहे तिला होणार त्रास, या सगळ्याची मूक साक्षीदार झाल्याचे मला अगदी स्पष्ट आठवते आहे. आणि अगदी आत्ता, आत्ता, शाळेत अतिशय सर्वसामान्य दिसणारी (असणारी) मुलगी आता किती असामान्य झाली आहे याबद्दल असूयावजा, उसासे टाकत घडलेली चर्चादेखील ऐकली आहे. माझी सुट्टी कोल्हापुरात असल्यामुळे, मला टिकली, बांगडी, पैंजण, चमकी या सगळ्याबद्दल फार अप्रूप होते. पण आपल्याला अशा गोष्टींचीदेखील हौस आहे हे उघड करून मला शाळेतल्या त्या आगाऊ मुलींच्या गटात मिळालेलं स्थान गमवायची इच्छा नव्हती. पण ते स्थान मला संपूर्णपणे आवडत देखील नव्हते.
नाक टोचणे हे गावठीपणाचे लक्षण आहे. हे माझे (आजूबाजूच्या मुलींकडून उधार घेतलेले) पहिले मत होते. हे मत ग्राह्य धरले असते तर गावठीपणामध्ये पहिला नंबर माझ्या आईचाच आला असता हे वेगळे सांगायला नको. अर्थात, आई होताक्षणी आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात गावठी होतच असतो हेही गृहीतच होते. पण शाळेतल्या माझ्या लाडक्या इंग्रजीच्या बाईंच्या नाकात असाच एक लुकलुकता हिरा असायचा. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या आधी आमचे उच्चार ऑक्सफर्ड - केम्ब्रिजच्या दर्जाचे करून देणाऱ्या बाईपण गावठी? पण दहावीपर्यंत मी माझ्या गटातून येणाऱ्या दबावामुळे याबद्दलचे माझे असे विचार गुप्त ठेवले.
बारावीला असताना जर्मन भाषा शिकवणाऱ्या अतिशय टापटीप, पुरोगामी मॅडमच्या नाकात देखील लुकलुकणाऱ्या पाच हिऱ्यांची कुडी दिसली. नाक टोचून बायका जर्मनसुद्धा शिकवू शकतात हा एक फारच महत्वाचा साक्षात्कार होता. माझ्याही मनात तेव्हा असा लुकलुकता हिरा घ्यायचे विचार येऊ लागले. पण माझ्यावर शाळेत आधुनिक स्त्रीबद्दल झालेले संस्कार अजून तसेच होते. मग इंजिनियरिंगला गेल्यावर वर्गातला एक (देखणा) मित्र मला म्हणाला, "तुला नाकात एक छोटीशी चमकी फार छान दिसेल. मला अशा चमकी घातलेल्या मुली फार आवडतात." या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी नको तसा संबंध जोडून मी पहिल्यांदा नाक टोचले.
तोपर्यंत मला मिळालेले सगळे सल्ले हे कमी वाईट कसे दिसता येईल या अंगाचे असायचे. जसे की, काळ्या मुलींनी फिक्कट गुलाबी किंवा तत्सम रंग घालू नयेत. बारीक दिसण्यासाठी कायम काळे किंवा उभ्या डिझाईनचे कपडे घालावेत. केस कापणारीच्या मते, माझा चेहरा फारच आडवा होता. तो उभा करण्यासाठी तिनी माझ्याकडून भरपूर पैसे घेतले. नाकाबद्दल तर बोलावे तितके कमी. आमच्या गटात सगळ्यात वाईट नाकाचा बहुमान मला मिळाला होता. मागे वळून बघता, आम्ही आपापल्या नाकांमध्ये अशी स्पर्धा का लावत होतो हे तितकेच विचार करण्यासारखे आहे. दहावीतून बाहेर पडेपर्यंत आपण दिसायला चांगले नाही हे खात्रीशीर पटले होते. त्यामुळे कुणीतरी तुला अमुक एक गोष्ट खूप छान दिसेल असे कुठल्याही तडजोडीच्या दिशेने न नेता म्हणणे, हा आश्चर्याचा धक्काच होता.
नाक टोचल्यावर परत कॉलेजला जायच्या आधी नेहमीप्रमाणे "त्याला काय वाटेल" यावर अतिविचार केला. पण त्याने जितक्या दिलखुलासपणे तुला चमकी चांगली दिसेल असे सुचवले होते, तितक्याच दिलखुलासपणे ती दिसते आहे, हेदेखील कबूल केले. पण दोन चार दिवसातच नाक लाल लाल होऊन दुखू लागले. मग तुळशीचा रस, उगाळलेली मिरी, खोबरेल तेल या अशा उपायांमध्ये त्या चमकीनी (माझ्या एकटीच्याच) मनात टाकलेली ठिणगी विझून गेली. काही दिवसांनी नाकापेक्षा मोती जड झाल्यामुळे चमकीला निवृत्त करण्यात आले. एव्हाना मी कुठल्यातरी मुलाच्या पाठीमागे हे असले धाडस केले होते, आणि त्यातल्या दोन्ही गोष्टी विफल झाल्या ही वार्ता शाळा मैत्रिणींना कळली होती. आणि मी बिनचमकीचीच कशी चांगली दिसते यावर मला नको असलेले असे बरेच सल्ले देण्यात आले.
ऑस्ट्रेलियात शिकायला गेले तेव्हा विमानातून उतरल्या उतरल्या आपली पाटी आता संपूर्णपणे कोरी आहे हे लक्षात आले. ब्रिस्बनमधले वेस्टएंड हा माझा सर्वात आवडता भाग बनला. तिथल्या घसरगुंड्यांसारख्या वरती खाली जाणाऱ्या रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी "योगा स्टुडियो" पेरले होते. भारताची आठवण काढत मी तिथल्या योगा क्लासला जाऊ लागले. आधी मित्र मैत्रिणी व्हावेत म्हणून जायचे. नंतर मित्र मैत्रिणींना घेऊन जाऊ लागले. तिथे येणाऱ्या सगळ्या गौरांगना मात्र नाकात रंगीत चमक्या घालून यायच्या. बांधणीच्या कापडाचे ओम नाहीतर गणपतीचे टीशर्ट, त्याखाली धोतरासारखी पॅन्ट, कुरळ्या कुरळ्या केसांना घट्ट मिठी मारणारा कापडी हेयरबँड, गळ्यात जपाची नाहीतर तुळशीची माळ आणि पाठीवर तिरपे, भात्यासारखे लटकलेले योगा मॅट! त्यांचा तो थाट बघून आपण किती कमी भारतीय आहोत असे वाटायला लागायचे. अशाच सायकलवरून योगासनं करायला येणाऱ्या काही मैत्रिणी झाल्या. आणि त्यांच्या नाकातले ते साधे चमचमते खडे पाहून पुन्हा नाक टोचायची इच्छा झाली!
सुट्टी संपवून ब्रिस्बनला येताना माझ्या नाकात पुन्हा ती निवृत्त केलेली हिऱ्याची चमकी आली. माझ्या (सुंदर) सावळ्या रंगावर तो हिरा किती शोभून दिसतोय असं कितीतरी लोकांनी आवर्जून सांगितलं. आणि माझी, माझ्या पुढील काही वर्षं राहिलेल्या हिप्पी ओळखीकडे वाटचाल सुरु झाली. नाकातल्या हिऱ्याला साजेशी अशी पाश्चात्य ओळख तयार करण्यात फारच आनंद मिळाला. आणि उन्हात न बसता लाभलेला माझा रंग कित्येक गौरांगनांच्या कौतुकाचा विषय ठरू लागला. नाक टोचलेल्या मुली आपल्याला चांगल्या समजू शकतात हे लक्षात आल्यावर, मी पुढाकार घेऊन ताशा कित्येक मुलींशी मैत्री केली. आणि त्यातून त्यांच्यादेखील आयुष्यात नाक टोचणे, टॅटू करणे हे अतिशय बंडखोरीचे आहे, असे मानणाऱ्या मैत्रिणी आहेत हे लक्षात आले. नाक न टोचणे बंडखोरीचे समजणाऱ्या, आणि आपला "गहू" वर्ण आपल्याला चांगले स्थळ मिळवून देऊ शकत नाही अशी खात्री असलेल्या मला हा खूपच मोठा (सुखद) धक्का होता.
एकदा नाकात हौशेने चांदीची रिंग घातली आणि पुन्हा तुळशीचा रस वगैरे करायची पाळी आली. मग थिसिसच्या कामात, चमकी पुन्हा एकदा निवृत्त झाली. परत तिची आठवण आली ती अमेरिकेत. मी आणि माझी पट्ट मैत्रीण एलोडी, मिशिगनमधून लास व्हेगसपर्यंत (टप्प्या टप्प्यात) जाणार होतो. आमचे पहिले उड्डाण शिकागोमधून होते. तिथपर्यंतच्या प्रवासात अनेक आठवणी निघाल्या. त्यात ही एक चमकीची कथा होती. ती आठवून काय झाले माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी विमान पकडायच्या आधी शिकागोमधल्या एका पिअर्सिंग स्टुडियोत जाऊन पुन्हा नाकात चमकी घातली. यावेळी मात्र टोचणार्यानी चिघळू नये म्हणून एक अभिनव उपाय सांगितला. एखाद्या कान साफ करायच्या बडनी सतत त्यावर भरपूर मीठ असलेले पाणी लावत राहणे. जखमेवर मीठ चोळल्याने जखम बरीदेखील होते हे अतर्क्य वाटले, पण असे कित्येक विरोधाभास पाहिले असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पुन्हा कधीही टोचून घ्यायचे नाही असे ठरवले असल्यामुळे, मी तो मार्ग पत्करला. आमच्या प्रत्येक थांब्यावर हॉटेलमधून भरपूर मीठ घेऊन मी एका बाटलीत माझे औषध तयार ठेवले होते. आणि हा उपाय अजूनपर्यंत कामी येतो आहे. ती साधी टायटेनियमची चमकी मी अजून जपून ठेवली आहे. कारण ती बाहेर काढली की त्या प्रवासातल्या सगळ्या आठवणी जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात.
सुदैवाने, नाक टोचून घ्यायची ती शेवटची वेळ ठरली. काल नाकातली चमकी काढून नथ घालताना माझी आरशासमोर अर्धा तास झटापट चाललेली पाहून नवरा म्हणाला, "कशाला घालतेस तू हे असले जीवघेणे प्रकार? तू चमकी न घालता सुद्धा मला तितकीच सुंदर वाटतेस!". तेव्हा माझ्या तोंडातून आपसूक निघालेलं, "पण मी चमकी माझ्यासाठी घालते", हे वाक्य माझ्या नकट्या नाकावरचा तो वफादार हिराच बोलला असं वाटून गेलं!

Monday, February 20, 2017

फॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हेमिंग्वे

या वर्षीच्या (अनेक) संकल्पांमध्ये संपूर्ण हेमिंग्वे नीट वाचायचे असाही एक आहे. आणि नीट वाचायचं म्हणजे त्याबद्दल लोकांना ते वाचावंसं वाटेल, इतकं नीट लिहायचं असाही उपसंकल्प आहे. जानेवारीत फॉर हूम द बेल टोल्स या हेमिंग्वेच्या बहुचर्चित पुस्तकापासून सुरुवात करायची ठरवली.
बऱ्याच लोकांना हेमिंग्वे वाचताना कंटाळा येतो. मलाही आधी यायचा. कधी कधी. आणि त्याचं कारण लेखन चांगलं नाही हे नसून आपलं वाचन बदलायची गरज आहे हे आहे. हेमिंग्वे वाचायच्या आधी वाचकांनी मन स्थिर ठेवायची प्रॅक्टिस करावी. कारण हेमिंग्वेची शैली वेगळी आहे. याचं वेगळेपण असं, की काही लेखक/लेखिका त्यांच्या पात्राला काय वाटलं हे उलगडून लिहितात. त्यामुळे वाचकाला फारसा विचार न करता कथानकाबरोबर वाहवत जाता येतं. त्यामुळेच कदाचित काही पुस्तके भुरर्कन वाचून संपतात. पण हेमिंग्वेची शैली अशी नाही. हेमिंग्वे पात्रांना काय वाटलं हे खूप कमी लिहितो. त्यांनी काय विचार केला हे लिहितो. पण त्यांना काय वाटलं हे फारसे लिहीत नाही. यामुळे पात्राला काय वाटले असेल, याचा विचार वाचकाला करायला लागतो. आणि तो वाचकाच्या मनःस्थिती, परिस्थिती आणि व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी हेमिंग्वेसारखा लेखक नाही. दुसरी खासियत म्हणजे हेमिंग्वेची भाषा अलंकारिक बिलकुल नाही. पण आशय मात्र विचार करायला भाग पडणारा असतो. कदाचित हे असे व्हावे म्हणूनच भाषेचा मुलामा काढून टाकला असावा.
हेमिंग्वे बद्दल केलेल्या वाचनात नेहमीच असे जाणवते की तो आपल्या लेखनावर प्रचंड कष्ट घेणारा लेखक होता. आणि सुरुवात वृत्तपत्रातून केली असल्यामुळे संक्षिप्त लेखनाचे संस्कार आधीपासूनच झाले असावेत. त्यामुळे त्याच्या काळात त्याची लेखनशैली क्रांतिकारी मानली जायची. अर्थात संक्षिप्त हे विशेषण फक्त त्याच्या वाक्यरचनेला लागू आहे. कारण हेमिंग्वेचे लिखाण आपल्या डोळ्यासमोर संबंध चित्र उभे करणारे असते. वाक्यरचना साधी असली तरी वर्णन अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपर्यंत पूर्ण असते. फक्त ते वस्तूंचे, विचारांचे किंवा संवादाचे असते. त्या चित्रातून बोध वाचकाला घ्यायचा असतो.
फॉर हुम द बेल टोल्स ही रॉबर्ट जॉर्डन या अमेरिकन युवकाची गोष्ट आहे. स्पॅनिश सिव्हिल युद्धात तो फेसिस्ट राजवटीविरुद्ध गेरीला सैन्याची मदत करण्यासाठी आलेला असतो. त्याला सोव्हिएत राजवटीकडून एक पूल उध्वस्त करायचे आदेश असतात. आणि त्यात त्याची मदत करणाऱ्या लोकांसोबत त्याला काही दिवस घालवावे लागतात. त्या समूहात मारिया नावाची एक तरुणी असते जिच्या तो प्रेमात पडतो. याच गटात पूर्वी फेसिस्टांविरुद्ध मोठी बंडाळी घडवून आणलेला, पण आता निराश झालेला पाब्लो असतो. आणि अतिशय कणखर, स्वतःचे सर्वांवर वर्चस्व गाजवणारी त्याची जोडीदार पिलार. रॉबर्ट जॉर्डनला पूल उडवण्यात सर्वात जास्ती मदत करणारा साठीचा अनसेल्मो आणि इतर काही छोटी पात्र अशी या पुस्तकाची बांधणी आहे.
या पुस्तकात खटकणारी, जी हेमिंग्वेच्या इतर पुस्तकांमध्ये दिसत नाही, गोष्ट म्हणजे त्यातली भाषा. भाषा जरी इंग्रजी असली तरी हेमिंग्वेनी यात एक अभिनव प्रयोग केला आहे. स्पॅनिश किंवा फ्रेंच लोक एका विशिष्ट प्रकारे इंग्रजी बोलतात. जसे की इंग्रजी मध्ये "सईची आई" हे सईज आई असे म्हणता येते. पण एखादी स्पॅनिश व्यक्ती बऱ्याचदा हे "आई ऑफ सई", असे म्हणते. या पुस्तकाची स्पॅनिश लोकांचे संवाद हे अशा प्रकारच्या इंग्रजीत लिहिले आहेत. आणि काही स्पॅनिश, खासकरून अपभाषा, जशीच्या तशी इंग्रजीमध्ये अनुवादित केली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायची सवय व्हावी लागते. पण सवय करून घेऊन वाचण्याइतके हे चांगले आहे का?, असा पुणेरी सवाल येईल म्हणून त्याचे उत्तर आधीच हो असे देते आणि का ते सांगते. ज्यांना कुणाला स्पॅनिश किंवा फ्रेंच मित्र मैत्रिणी आहेत, त्यांना हे पुस्तक वाचणे सोपे जाईल. मला हे वाचताना सतत माझ्या फ्रेंच मैत्रिणीची म्हणजे एलोडीची आठवण येत होती. त्यामुळे जो प्रयोग केला आहे तो सफल झाला आहे असे म्हणता येईल. कारण त्या शिवाय ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा माझ्यासारख्या लोकांना मित्र मैत्रिणींची आठवण येईपर्यंत हे पुस्तक आवडलं नसतं.
यातील प्रेमकथा मला फारशी रुचली नाही. कारण मारिया आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा नुसतीच शारीरिक आणि भावनिक पातळीवर दाखवण्यात आली आहे. या पुस्तकात मनाला स्पर्शून जातील, आणि कायम लक्षात राहतील असे दोन प्रसंग आहेत. पहिला म्हणजे पिलारनी तिच्या आठवणीतून कथन केलेला, पाब्लोनी त्याच्या उमेदीच्या काळात घडवून आणलेला फेसिस्टांच्या वधाचा प्रसंग. हा प्रसंग लिहिताना हेमिंग्वेच्या लेखणीचा कस लागला आहे हे लगेच लक्षात येते. आणि या पुस्तकाचे नाव काढले की हा एकच प्रसंग डोळ्यासमोर आधी येणार याची खात्री पटते. "फेसिस्ट" या लेबल खाली ज्या ज्या व्यक्तींचे वर्णन होते त्या सगळ्यांना "सधन" हे विशेषण अगदी सहज लागू होते. पाब्लोच्या नेतृत्वाखाली अशा फेसिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील व्यक्तींना जाहीरपणे मारायचा बेत असतो. पण मारणारे आणि मरणारे एकमेकांना जवळून ओळखणारे असतात. त्यामुळे त्या कत्तलीची तीव्रता आणि क्रूरता, तसेच सधन व्यक्तींबद्दलचा द्वेष आणि त्यांची दैना बघून निर्धनांना होणारा विकृत आनंद हे सगळे मन सुन्न करणारे आहे. आणि हेमिंग्वेच्या लेखणीतून ते आणखीनच धारदार बनून निघाले आहे. हा प्रसंग आपल्याला खिळवून ठेवतो कारण जरी या पुस्तकात तो फेसिस्ट विरुद्ध रिपब्लिकन असा दाखवला असला, तरी तो आजही ज्यांच्याकडे आहे विरुद्ध ज्यांच्याकडे नाही या नजरेतून आपल्यातला वाटतो.
दुसरा प्रसंग म्हणजे पिलार, मारिया आणि रॉबर्ट जेव्हा एका क्रांतिकार्याला भेटायला जातात, तेव्हा वाटेत ते एका सैनिकाला भेटतात. तो सैनिक मारियाशी खूप खेळीमेळीने आणि प्रेमानी वागतो. त्याच्या गावात फेसिस्टांनी केलेल्या अत्याचारात त्याचे घरचे कसे मरण पावले याची कहाणी सांगून भावुक होतो. तेव्हा पिलार त्याला जवळ घेऊ पाहत असताना, तो अगदी हलकेच तिला जवळ येण्यापासून परावृत्त करतो. तरुण मारियाच्या तुलनेत मिळालेला हा नकार पिलारला सहन होत नाही. आणि त्यामुळे तिच्यातील दिसण्याबद्दल आणि उतरत्या वयाबद्दल असलेला न्यूनगंड जागृत होतो. आपल्याला वाटत असलेल्या मत्सराची पिलारने दिलेली कबुली मनाला स्पर्शून जाणारी आहे. मत्सर हे बऱ्याचवेळा नाती आणि मैत्री तुटायचे प्रमुख कारण असते. ज्याला मत्सर वाटतो, इतकच काय पण ज्याचा मत्सर होतो, ती व्यक्तीदेखील उघडपणे त्याला मत्सर म्हणायला कचरते. असे असताना, जर कुणी आपल्याला मत्सर वाटतो आहे अशी प्रांजळ कबुली दिली तर समोरच्याला देखील नकळत त्याचा आदर वाटू लागतो. तसे काहीसे हा प्रसंग वाचताना होते. पिलारचा अहंकार आणि तिचा प्रामाणिकपणा या दोन्हीचे फार सुंदर रेखाटन हेमिंग्वेने केले आहे.
हेमिंग्वेच्या युद्धकथा रम्य आणि तपशीलवार असतात. त्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे प्रचंड खोलात जाऊन वर्णन केलेले वाचायला मिळते. युद्धाचा नुसताच माहोल तयार न करता, त्यामध्ये रणनीतीचे देखील खोलवर वर्णन असते. युद्ध जवळून पाहिल्यामुळे, ते वाचकाच्या डोळ्यासमोर खुबीने उभे करायची युक्ती हेमिंग्वेला अवगत होती. पण असे असले तरी हेमिंग्वेच्या वाचकाला कधीही युद्धाबद्दल आपुलकी वाटणार नाही याची काळजी त्याने घेतलेली असते. युद्धाबद्दल सलग पाचशे पाने वाचूनसुद्धा एकदाही युद्ध गरजेचे आहे असे हे पुस्तक वाचताना वाटत नाही. तसेच युद्ध काळातील माणसांच्या मनःस्थितीचे अचूक वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. युद्ध अचानक आपल्यलाला भविष्यातून वर्तमानकाळात आणून ठेवते. त्यामुळे आपल्या हातात असलेल्या प्रत्येक क्षणाला भोगून टाकण्याची धिटाई माणसाला युद्धकाळात अचानक जमायला लागते. या पुस्तकातील मारिया आणि रॉबर्टचे प्रेम हे या भावनेतून निर्माण झाले आहे असे सारखे वाटत राहते. तसेच पाब्लोचे सतत चाललेले मद्यपानदेखील अशा निराशेतून जन्माला आल्यासारखे वाटते. अर्थात हे माझे मत आहे. कारण हेमिंग्वे कधीही युद्धाचा मनावर कसा परिणाम होतो याबद्दल उलगडून लिहीत नाही. ते वाचकाला असेच टिपावे लागते.
इतर कोणी हे पुस्तक वाचले असेल तर त्यांची मतेदेखील वाचायला आवडतील. आणि हेमिंग्वेची आवर्जून वाचण्यासारखी अजून कोणती पुस्तके आहेत तेही वाचायला आवडेल.

Wednesday, January 11, 2017

आंटी मत कहो नाऽऽ

परवाचीच गोष्ट. मुलाला आजी आजोबा घेऊन गेल्याचा फायदा घेऊन मी दिवा उजेडी खाली पाळायला गेले. व्यायाम हा हक्काचा मी टाइम मला अगदी काल परवापर्यंत मिळायचा. पण अमीर खाननी घोळ घातला. दंगल बघून आल्यापासून नवऱ्याला महावीरसिंग फोगट बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला पहाटे आणि रात्री असे व्यायामाचे स्लॉट वाटून घ्यावे लागतात. नवऱ्यानी व्यायाम केलाच पाहिजे या भूमिकेतून, मला काय फरक पडतो? त्याचं हृदय; आणि आता, 'नाही केला तर उत्तम, मला जास्त करता येईल' इथवर मला माझ्या परिस्थितीने आणून ठेवलंय. त्यामुळे मधेच हा रणवीर पेशवा किंवा दंगल खान येऊन माझी स्थिरावलेली मानसिक बैठक बिघडवून जातात. असो. तर मी माझ्या सातव्या राऊंडवर असताना मागून मला तो अत्यंत परिचित, तरीही तितकाच तिरस्करणीय आवाज ऐकू आला, "आंटी, बॉल देता का प्लिज?". मी आवाजाच्या दिशेनी पाहिलं, तर एका गुबगुबीत शेवरीच्या कापसाच्या उशीला टीशर्टचा अभ्रा घातल्यासारखा दिसणारा एक चौदा वर्षाचा मुलगा दिसला. त्याच्या त्या गोंडस चेहऱ्यावर मला आंटी म्हणल्याबद्दल कुठलाही पश्चाताप दिसत नव्हता. त्यामुळे माझा अहंकार गिळून मी चुपचाप बॉल उचलून त्याच्या दिशेने फेकला. इतका जोरात फेकला की त्याला तो आणायला शंबर एक मीटर पाळावे लागले. त्यातच समाधान मानून मी आठव्या राउंडला सुरुवात केली. मग उरलेले दोन तीन राउंड मी या आंटी न म्हणून घेण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार केला.
लोकांनी आंटी म्हणू नये म्हणून मी कित्येक दिवस मिंत्रावर "हल्लीची" पिढी काय घालते याचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून डिस्ट्रेस्ड जीन्स घ्यावी असं माझं मत बनलं. मग आधी टेप शोधून काढली आणि स्वत:ची मापं काढली! खूप दिवस शॉपिंग कार्ट मध्ये लोळवून एकदाची ती सगळीकडे एकसारखी फाटलेली जीन्स घेतली. मी अशा प्रकारचे वस्त्र मागवले आहे, तेही ऑनलाईन, हे ऐकून मातोश्रींनी विचारसुमने उधळली (नवऱ्यानी हात टेकले आहेत हे वेगळे सांगायला नकोच).
"एका मुलाची आई आहेस तू आता. शोभलं पाहिजे हे सगळं. आणि कपडे संपूर्ण अंग झाकण्यासाठी असतात"
यावर मी "हूं" असा आवाज करून बायका करतात तसं पारंपरिक वाकडं तोंड केलं.
ठरल्या दिवशी माझं पार्सल आलं आणि उघडून बघितल्यावर लक्षात आलं की चित्रात दिसत होती तशी आणि तिथेच फाटलेली नसून, त्या नकाशाच्या बाहेरही जाऊन ती जीन्स फाटली होती. आता परत न्यायला येणाऱ्या माणसाला, "ती मला हवी तशी फाटली नाहीये म्हणून तुम्ही परत न्या", असं कसं सांगायचं या विवंचनेत मी पडले. पण त्यांनी काहीही न विचारता चुपचाप ती परत नेली. मग त्यापेक्षा हजार एक रुपये कमी देऊन मी बिन फाटकी जीन्स मागवली. त्यावर देखील, "फाटलेली जास्त महाग होती?" असे उग्दार मातोश्रींनी (नाटकी) डोळे विस्फारून काढले .
जीन्सचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मी माझ्या अस्मितेच्या शोधात एका काव्यवाचनाच्या मेहफिलीत गेले. डाव्या मतवादी लोकांनी बुजबुजलेल्या एका कॉफी शॉपच्या अंगणात हे असले कार्यक्रम होतात. आणि त्याला हजेरी लावणारे लोक अतिशय "इन" असतात. म्हणजे बसतात ते बाहेरच, ते पण अशा इतरवेळी फडतूस दिसणाऱ्या, पण अशा प्रसंगांची शोभा वाढवणाऱ्या बांबूच्या चटयांवर. काही महत्वाचे कवी पुढे गोमुखासनात बसून आपल्या टॅब्लेट्सवर आपले ब्लॉग्स उघडून कविता वाचून दाखवत होते. आणि बाकीचे आपापल्या फोनवर काहीतरी भलतंच करत बसले होते. कविता ऐकण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला पण लक्ष्य सारखं तिथे बसलेल्या कवींच्या चेहऱ्यांकडे जात होतं. सगळ्यांनी एकसारख्या झुडपासारख्या दाढ्या,आणि एखाद्या राजपुत योध्दयाला लाजवतील अशा पिळदार मिश्या ठेवल्या होत्या. पण माझ्या आंटीपणाचा पुरावा म्हणूनच की काय, त्यांच्या त्या रुपाकडे बघताना माझ्या मनात, ते सगळे किती "इन" किंवा "हॉट" आहेत या ऐवजी, सारखा एकच विचार येत होता. या सगळ्यांच्या आया आत्ता यांना घ्यायला आल्या तर आपला मुलगा कुठला हे कसं ओळखणार?
हे सगळे प्रकार झाल्यावर मी, आपण खरंच आंटी झालोय का, याची अशी वेळ आणि पैसे खर्च करून फेरतपासणी करणे बंद करायचे ठरवले. आणि माझ्या दैनंदिन जीवनातूनच डेटा गोळा करायला सुरुवात केली. आधी आंटी होणं याची व्याख्या करायचा प्रयत्न केला. त्यात अर्थातच आधी, पंचवीस वर्षांपूर्वी आई जे काय काय डायलॉग मारायची ते मारले. मी कशी लवकर उठते, घरातलं सगळं बघते (नवऱ्याच्या मदतीचा करेक्शन फॅक्टर लावून), किती अवघड आहे आजकालच्या काळात. "जबाबदाऱ्या" आल्या की कसं आपटूडेट राहता येणार? पेपर वाचायला सुद्धा वेळ नसतो (हा अनालॉग पेपर. डिजिटल पेपरचं सलाईन दिवसभर चालू असतं, तसं). मग स्वस्तुती आणि स्वदया (सेल्फ पिटी?) मधून बाहेर आल्यावर लक्षात आलं, की "तरुण मनात" असतात तितक्या तीव्र भावनाच आता बहुतेक मनात उरल्या नाहीयेत.
पूर्वी आपण कसे दिसतो, आरशात कसे दिसतो आणि चार चौघात कसे दिसतो वगैरे फार महत्वाचं वाटायचं. आता जर कुणी येऊन माझ्या दिसण्यावर टिप्पणी केली, तर "गेलास/गेलीस उडत", याखेरीज दुसरे वाक्य डोक्यात येत नाही. फक्त कानाला अजून आंटी शब्द खटकतो (पण त्याचीही सवय होईल). किंवा कुणी बिचारा प्रेमात मजनू झाला असेल तर त्याच्या मोहब्बतीचे कौतुक न वाटता, त्याचे रडे संपल्या संपल्या, "तू अनुरूपवर जा. तिथे खूप ऑप्शन्स आहेत" असं सुचवायची खुमखुमी मारून टाकावी लागते. विशीतला बराच काळ स्वतःच्या भावनाच मॅनेज करण्यात गेला. आणि आता बराचसा वेळ स्वतःचा आणि कुटुंबाचा वेळच मॅनेज करण्यात जातो. त्यामुळे बऱ्याचदा, ज्यांच्याकडे स्वतःबद्दल खूप विचार करायला वेळ आहे त्यांची असूया वाटू लागते. आणि यातच आपले आंटीकरण सामावलेले आहे असा निष्कर्ष मी काढला. पण या छोट्याशा साक्षात्काराचे रूपांतर, "आमच्यावेळी" या शब्दाने सुरु होणाऱ्या असंख्य कंटाळवाण्या प्रवचनांमध्ये होऊ नये म्हणून, अधून मधून विशीत एक फेरफटका मारून आलेच पाहिजे.

Thursday, January 5, 2017

मन कशात लागत नाही

बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं. आपल्या इथपर्यंतच्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठलीच दिशा नाही ही मनाशी ठामपणे ठरवलेली गोष्ट नक्की त्या माणसाला कशी सांगायची या विचारानेच रडू येत होतं. त्यात तो बर्फ, सभोवताली पसरलेला, कुठे कुठे काळामिट्ट झालेला तर कुठे कुठे थरावर थर बसून अक्राळविक्राळ झालेला. बसने गेल्यामुळे मी अर्धा तास आधीच पोहोचले, म्हणून मग तिथेच असलेल्या स्टारबक्समध्ये माझी आवडती कॉफी घेऊन पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागले.
"खरंतर असं कौन्सेलरकडे वगैरे जाण्यासारखं काहीच नाहीये. आपल्याला अशा काय जबाबदाऱ्या आहेत. मिळालेला पैसा आपण भारी भारी स्नो बूट्स नाहीतर जीन्स घेण्यात उडवतो. इथे अशी हवी तशी कॉफी घेऊन कुठल्यातरी दुःखाचं पोस्ट मॉर्टम करायची वाट बघतोय. रिडिक्यूल्स!"
पुन्हा तेच विचारचक्र सुरु झाले. मोठ्या माणसांकडून कित्येक वेळा ऐकलं होतं. "काही जबाबदाऱ्या नाहीत ना म्हणून येतं हे असं डिप्रेशन."
"तुमच्या पेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगणारे लोक आहेत. त्यांच्याकडे बघा"
हे सगळे आवाज हळू हळू माझाच आतला आवाज बनून गेले होते. एक क्षण वाटलं नकोच ते. असंच परत जावं. पण आपण कुणालातरी सकाळी सात वाजता या अशा थंडीत आपल्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे असं पळून नाही जायचं, असा विचार करून मी त्या बिल्डिंगमध्ये गेले.
जॉनथन च्या ऑफिस बाहेर लांबच लांब कॉरिडॉर होता. ठोकळ्यासारख्या बिल्डिंगमध्ये तो करडा चौकोनी कॉरिडॉर अजूनच खच्ची करत होता. मधेच आपल्याला जे वाटतंय तो या गावाचा तर परिणाम नाही ना, असाही विचार डोकावून गेला मनात. तेवढ्यात त्या लांबलचक कॉरिडॉर च्या दुसऱ्या टोकाला एक उंच माणूस खांद्यावर सायकल लटकवून येताना दिसला. जशी जशी त्याची आकृती जवळ आली तशी मी त्याला कधीही पाहिलेलं नसताना देखील हा तोच आहे अशी मला खात्री पटली. त्यानीदेखील मला ओळखलं असावं, कारण माझ्याशी हस्तांदोलन करायच्या खूप आधीच, लांबूनच माझ्याकडे बघून तो हसला. त्या निर्मळ आणि खुल्या हास्याच्या आठवणीचा देखील मला खूप आधार वाटतो.
पुढचे सात आठवडे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारची मी अतिशय आतुरतेने वाट बघू लागले. जॉनाथन चूक बरोबर अशा पठडीतून माझ्याशी कधीच बोलला नाही. त्याच्या बरोबर बोलून नेहमीच हलकं वाटायचं आणि त्यानी दिलेले होमवर्क करण्यात प्रचंड मजा यायची. थोडेच दिवसांत नुसतं त्याला भेटण्याबद्दल नाही, तर त्या सकाळच्या बर्फात पाऊलखुणा उमटवण्यापासून ते अर्धा तास आधी पोचून, कॉफी पिण्याबद्दलदेखील मला प्रेम वाटू लागलं. आणि ज्या गोष्टीमुळे मला जॉनाथनकडे जावं लागत होतं, त्या आयुष्यात घडल्याबद्दल कुठेतरी थोडीशी कृतज्ञतादेखील वाटू लागली. हा योग्य शब्द आहे नाही माहिती नाही, पण आपण इंग्रजीमध्ये ज्याला 'बीइंग ग्रेटफूल' असं म्हणतो तसं काहीसं.
हे सगळे प्रसंग मी "डिअर जिंदगी" हा सिनेमा बघताना (रडत रडतच) पुन्हा जगले. सिनेमा बघताना रडण्यात माझा आधीपासूनच हातखंडा आहे. आणि यावर्षी पिंक, डिअर जिंदगी, दंगल असल्या सिनेमांनी माझ्या या स्वभावाला खच्चून प्रोत्साहन दिले आहे. हा काही डिअर जिंदगीचा रिव्यू नाही. पण ज्या सिनेमानी एका दर्शकाला आपला अनुभव लिहायला असं प्रोत्साहित केलं त्याचा रिव्यू वगैरे लिहायची काहीच गरज नाही.
आयुष्यात कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या अडचणीच्या पलीकडे बघणे फारसे जमत नाही. त्यामुळे जवळच्या माणसांना आपल्याला सावरण्याची आणि त्यांचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याची कसरत करावी लागते. अशा वेळी कधी कधी मैत्रीदेखील धोक्यात येते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.
अशी मदत न घेण्याची कित्येक कारणं आपल्याकडे असतात. पण अशी मदत घेऊन आपण कमकुवत आहोत किंवा छोट्या छोट्या गोष्टींना अतिमहत्त्व देत आहोत असा समज करून घेणे धोक्याचे आहे. दुसऱ्यांची आपल्यापेक्षा मोठी दुःख बघून आपल्या त्रासाला कमी लेखणे देखील योग्य नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला झाला काय किंवा गरीब माणसाला झाला काय, मनःस्ताप दोघांनाही सारखाच असतो, कारण तो पैसे ओतून कधीही झटकन दूर करता येत नाही. आणि कित्येक मानसिक द्वंद्व अशी असतात जी अशी गणितासारखी सोडवता येत नाहीत.
अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे. नुकत्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालेल्या एका प्रयोगाबद्दल वाचनात आलं. १९३९ पासून हार्वर्ड मध्ये दोन गटांचा अभ्यास होतो आहे. ७५० तरुण मुलांचा हा अभ्यास होता. त्यातील कित्येक आज हयात नाहीत. आणि जे आहेत ते सगळे नव्वदच्या उंबरठ्यावर आहेत. अभ्यास होता, "आनंदी, समाधानी जीवनाचे रहस्य काय?". आणि तरुणपणी सगळ्यांनी, "मला भरपूर पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली तर मी आनंदी होईन" अशी उत्तरे दिली होती. आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.
त्यामुळे जर कुणी मी पहिल्या अपॉइंटमेंटच्या आधी तळ्यात मळ्यात होते तसं असेल, तर त्यांनी आपल्या आतल्या त्या नको म्हणाऱ्या आवाजाला बंद करून जरूर झेप घ्यावी.