Monday, September 26, 2016

इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन

एप्रिल २०१६ पासून मी १० किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात. कित्येक लठ्ठ व्यक्ती आपण लठ्ठ आहोत म्हणून आधीपासूनच आहाराविषयी जागरूक असतात. जिम मध्ये जाणाऱ्या आणि शारीरिक हालचाल करण्याऱ्या कित्येक व्यक्ती लठ्ठच असतात. त्यामुळे लठ्ठ असूनसुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि आहार घेणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. एखाद्या लठ्ठ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असं कळलं की आपोआप वजन कमी करायचा सल्ला मिळतो. पण जी व्यक्ती बारीक आहे, आणि हृदयरोगी आहे किंवा जिला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत, त्यांना तोच सल्ला दिला जात नाही. त्यांना आहार बदलायचा सल्ला मिळतो. अर्थात, या सगळ्या व्याधी फक्त लठ्ठ व्यक्तींना होतात हे सतत केले जाणारे विधान फारसे बरोबर नाही. लठ्ठपणा या व्याधींना आमंत्रण देतो हे जरी खरं असलं तरी सगळ्या लठ्ठ व्यक्ती याला बळी पडत नाहीत आणि अचानक हृदयविकार होणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येत नाही.
प्रेग्नन्सीमध्ये मला गर्भधारणेत होणारा (आणि नंतर ताब्यात येणारा) डायबेटीस झाला. माझ्या डॉक्टरनी मला व्यायाम आणि आहार या दोन्हीच्या मदतीने तो ताब्यात ठेवायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे साडे आठ महिन्यापर्यंत मी रोज ३० मिनटं पोहायचे. आणि साखर, फळं आणि कर्बोदके कमी करून मी साखर ताब्यात ठेवली. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की जर ही व्याधी कायमची पदरात पडली तर आहार किती नियमित ठेवावा लागेल. आणि माझ्या वडिलांना टाईप १ डायबेटीस असल्यामुळे ती शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. म्हणून वजन कमी करण्याचा आत्ताचा प्रवास हा फारच अभ्यासपूर्ण होता.
नवव्या महिन्यापासूनच मी ऋजुता दिवेकर इत्यादी लोकांची पुस्तकं वाचू लागले आणि माझा मुलगा झाल्यावर सहा महिन्यांनी ते सगळे सल्ले अमलात आणू लागले. पण बाळ असल्यामुळे मला पूर्वीसारखा दोन दोन तास व्यायाम करता यायचा नाही आणि घरातून बाहेरदेखील पडता यायचं नाही. ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली. पण सतत डाएट करूनही आणि चालणे वगैरे व्यायाम करूनही काही केल्या माझं वजन कमी होत नव्हतं. म्हणून मी शरीरातील मेद साठवणाऱ्या आणि वितळवणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करायचं ठरवलं. तसं करायला लागल्यावर मला कित्येक साक्षात्कार झाले. आणि कुठल्याही जिम ची मेंबर न होता किंवा डाएटिशियनचा सल्ला न घेता मी हा प्रवास करू शकले. या मागे दोन कारणं आहेत:
१. डाएटबद्दल डाएटिशियन्स मध्येच असलेले काही समज जे आता शास्त्रीय दृष्ट्या चुकीचे ठरलेले आहेत
२. वजन कमी करण्यासाठी व्यायामाला दिलेलं अतिमहत्व
वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.
इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.
फक्त खाण्याचा विचार केला तर शरीराच्या दोन अवस्था होतात. एक म्हणजे पोट भरलेली अवस्था आणि उपाशी अवस्था. इन्सुलिन हे मेजवानीचे संप्रेरक आहे तर ग्लुकागॉन हे दुष्काळाचे संप्रेरक आहे. या दोघांचे एकमेकांशी असलेले नाते सीसॉ सारखे असते. याचा अर्थ जेव्हा शरीरात कर्बोदकांचा प्रवेश होऊन इन्सुलिन वर जाते, तेव्हा ग्लुकागॉन सिक्रीट होऊ शकत नाही आणि परिणामी साठवलेलं ग्लायकोजेन, फॅट वापरलं जाऊ शकत नाही. जेव्हा खाल्लेलं अन्न पचवून इन्सुलिन चे प्रमाण कमी होते आणि शरीरात काही काळ दुष्काळ तयार होतो, तेव्हाच ग्लुकागॉन त्याचे काम करून चरबी वापरू शकते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर इन्सुलिन वाढवणारे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत किंवा दिवसातील काही भाग उपाशी राहिलं पाहिजे.
कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही.
दर दोन तासांनी खाणं ही डाएट स्ट्रॅटेजी नापास होते यावर हल्ली बरंच संशोधन झालेलं आहे. आणि यातूनच इंटरमिटंट फास्टिंग हे हाय फाय नाव असलेलं पण भारतीयांना परिचित डाएट उदयास येत आहे. यात शरीराला रोज (किंवा आठवड्यातून काही दिवस) १६ ते २० तासांचे संपूर्ण लंघन देतात. म्हणजे दिवसभरासाठी ठरवलेली कर्बोदके आणि इतर घटक ४-८ तासात खाऊन उरलेले सगळे तास फक्त पाणी, कोरा चहा किंवा कोरी कॉफी पिणे. यामुळे शरीरात ग्लुकागॉन तयार होण्याची स्थिती तयार होते आणि फॅटचे विघटन होते. ही पद्धती आधी अवघड वाटली तरी एकदा सवय झाल्यावर कुठल्याही वातावरणात न मोडता वापरता येते. लंघन केल्यामुळे झोपेत सुधारणा होते (सुधारणा याचा अर्थ अतिझोपचे प्रमाण कमी होते). आणि मुख्य म्हणजे दोन वेळा पोटभर खाता येते. इंटरमिटंट फास्टिंग लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोक आठवड्यातील दोन दिवस ५०० कॅलरीज खातात आणि इतर दिवशी तीन वेळा जेवतात (फाईव्ह टू डाएट), माझ्या सारखे काही १६ तासाचा उपास करतात (ब्रेकफास्ट किंवा डिनर न घेता).
या जोडीला जर (फास्टिंग स्टेट मध्ये) ४० मिनिटापर्यंत व्यायाम केला तर थोडे जास्त वजन कमी होते. पण ४० मिनटं व्यायाम करून जर डाएट केले नाही तर मात्र वजन कमी होत नाही (आणि कधी कधी वाढते). आठवडाभर असे डाएट केले आणि रविवारी डाएट वरून सुट्टी घेतली की पुढच्या आठवड्यासाठी आपण पुन्हा सज्ज होतो. ही सुट्टीदेखील गरजेची आहे. कारण आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांसाठी भूक कधी कधी बरीचशी मनातच असते. त्यामुळे मनाला उगीच सारखं रागवून गप्प ठेवण्यात काही अर्थ नाही. स्मित
वजन कमी होणे हा लंघनाचा सगळ्यात कमी महत्वाचा फायदा आहे. माध्यम वयात होणाऱ्या डायबेटीसची (टाईप २) सुरुवात इन्सुलिन रेसिस्टन्सनी होते. जेव्हा अन्नातल्या ग्लुकोजयुक्त पदार्थांचे प्रमाण सतत जास्त असते, तेव्हा शरीरात सतत इन्सुलिन स्त्रवत राहते. आणि शरीरातील पेशींना अति इन्सुलिन असण्याची सवय होते. आणि त्यांची इन्सुलिन वापरण्याची, परिणामी ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्सुलिन असूनही रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण वाढायला लागते. लंघन केल्यानी किंवा कर्बोदके कमी केल्यानी पेशींची ही क्षमता पुनः पहिल्यासारखी होऊ शकते. थोडक्यात टाईप २ डायबेटीस योग्य आहारानी घालवता येतो (यासाठी दुसरी लिंक बघा).
लंघन केल्यानी मज्जासंस्था बळकट आणि दीर्घायुषी होते. अल्झायमर्स सारखा आजार लंघनाने दूर ठेवायला मदत होऊ शकते (यासाठी तिसरी लिंक बघा). गरजेपेक्षा सरासरी ३० टक्के कमी खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत राहते याचे पुरावे आता संशोधनातून दिसू लागले आहेत. पण आप्ल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिवसातून एकदाच जेवणारे, नव्वदी ओलांडलेले खुटखुटीत आजोबा नाहीतर आजी असतात. आणि तल्लख बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि उत्साही असण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. अशा लोकांच्या आहारात डोकावून पाहिलं तर आपल्याला अजून कितीतरी गुरुकिल्ल्या मिळतील!
या विषयावरचे संशोधकांचे काही टॉक्स आणि लिंक्स मी इथे देत आहे.
१. पीटर आटिया
२.सारा हॉलबर्ग
३. सान्ड्रीन थुरेट 

Wednesday, September 21, 2016

साखर संघर्ष




एखादी व्यक्ती लठ्ठ आहे असं दिसलं की न मागितलेले अनेक सल्ले तिच्याकडे फेकण्यास सुरुवात होते. लठ्ठ माणूस काहीतरी चूक करतो आहे, त्याचा त्याच्या जिभेवर ताबा नाही, आणि त्यांनी आपल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ओढवून घेतला आहे, हे बारीक असलेल्या किंवा राहणाऱ्या लोकांचंच नव्हे तर कधी कधी डॉक्टरचं सुद्धा म्हणणं असतं. लठ्ठपणामुळे डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रिदयविकार असे अनेक रोग होतात हे विधान सर्रास केले जाते. आणि त्याचा दोष हा आत्तापर्यंत मेद जास्त असलेल्या (तूप,तेल,मांसाहार, अंडी) खाद्य पदार्थांना दिला जायचा. गणित अगदी सोपं होतं. ज्या खाद्यपदार्थात मेद आहे त्यानेच मेद वाढते. ज्या खाद्य पदार्थात कोलेस्टेरॉल आहे त्यांनीच कोलेस्टेरॉल वाढणार. म्हणून १९८२ नंतर अमेरिकन आहारशाश्त्र संस्थेने या सर्व पदार्थांपुढे मोठा लाल ध्वज रोवला. तिथूनच सुरुवात झाली 'लो फॅट डाएट' ची. मागे वळून बघताना आज शास्त्रज्ञांना असं लक्षात येतंय की आहारातील मेद कमी केल्याचे विपरीत परिणामच जास्त झाले आहेत. जे आजार कमी करण्यासाठी हा बदल घडवून आणला होता, ते सगळे आजार गेल्या तीस वर्षात वाढीला लागले आहेत. आणि त्याबरोबरच स्थूलतेचे प्रमाणही वाढले आहे. हे असे कसे झाले? गेल्या तीस वर्षात आपण सरासरी २०० उष्मांक जास्त खाऊ लागलो आहोत, आणि ते सगळे उष्मांक कर्बोदकांमार्फत घेतले जातात, आणि त्यातील सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारे कर्बोदक म्हणजे: साखर.
या महिन्यातच काही शत्रद्यांनी साखर लॉबीने एकोणीशे साठच्या दशकात काही नामांकित विद्यालयांना लाच देऊन करून घेतलेलया 'रिसर्च'चे पुरावे प्रसिद्ध झाले. यामध्ये साखर खाण्याने हृदयावर होणाऱ्या दुष्परिणामांचे टेपर संपृक्त चरबीवर ठेवण्यात आले. त्यामुळे नुसत्या अमेरिकेनेच नव्हे तर अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या सगळ्या देशांनी लोणी, तूप, अंडी, लाल मांस हे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वर्ज्य ठरवले. अलीकडे असं निदर्शनास आलंय की आपल्या शरीरातील ७५ % कोलेस्टेलरोल शरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियांमधून बनतं. आणि आहारात आलेल्या कोलेस्टेरॉल पैकी खूप कमी हृदयविकारास कारणीभूत ठरतं. आणि तूप, तेल किंवा मांसाहाराचे सगळ्या आहारातील प्रमाण बघता, फक्त त्यांच्या सेवनाने एवढी हानी व्हावी हे शक्य नाही. गेल्या तीस वर्षांमध्ये जगभरात साखरेचे सेवन झपाट्याने वाढले आहे. आज भारतासारख्या खाद्यपदार्थांची विविधता असलेल्या देशातही शीतपेये, आणि अमेरिकन फास्ट फूडचे सेवन वाढले आहे. बाहेर खाण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. जिथे जिथे अन्नाचे व्यावसायिक उत्पादन होते, तिथे तिथे अन्नामध्ये दोन ठळक बदल घडवावे लागतात. पहिला, अन्नातील फायबर कमी होते आणि दुसरा, अन्नातील साखरेचे प्रमाण वाढते. या दोन गोष्टी केल्याशिवाय खाद्यपदार्थांचे शेल्फ लाईफ वाढत नाही आणि तसे झाल्याशिवाय फायदा होत नाही.
साखर ह्रिदयविकाराला कशी कारणीभूत आहे हे समजून घ्यायचे असेल तर साखरेचे दोन तुकडे केले पाहिजेत. साखर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन सध्या शर्करा अणूंनी बनलेली आहे. यातील ग्लुकोज हे मानवी शरीरात झपाट्याने वापरलं जातं. जर ग्लुकोजनी बनलेल्या १०० कॅलरीज आपण खाल्ल्या तर त्यातील ८० लगेच शरीरातील अवयवांच्या चालण्यासाठी वापरल्या जातात. उरलेल्या यकृतात ग्लायकोजेन या पदार्थाच्या रूपात साठवल्या जातात. अधेमध्ये जेव्हा शरीराला गरज लागेल तेव्हा हे ग्लायकोजेन पुन्हा ग्लुकोजमध्ये परतवून शरीराला पुरवण्यात येते. ही प्रक्रिया सगळ्या कर्बोदकांवर होते कारण सगळ्या कर्बोदकांचा पाया ग्लुकोजचा असतो, फक्त साखर सोडल्यास. साखर हे आपल्या आहारातील मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं एकच कर्बोदक आहे ज्यात अर्धा भाग फ्रुक्टोजचा असतो. आणि आपलया शरीरात यकृतसोडून कुठलाही अवयव फ्रूक्टोज जसेच्या तसे वापरू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण फ्रुक्टोजयुक्त १०० कॅलरीज खातो तेव्हा त्या सगळ्याचे फक्त मेद होऊ शकते. आणि ते होत असताना शरीरावर ताण येऊन युरिक ऍसिडचे उत्पादन होते. जे उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरते.
फ्रूक्टोजचा दुसरा धोका म्हणजे शरीराच्या जीवरासायनिक यंत्रणेत ग्लुकोज ज्या ज्या संप्रेरकांना उत्तेजित करते, जसे की इन्शुलिन, लेप्टीन, यापैकी कुठल्याही संप्रेरकाला फ्रूक्टोज उत्तेजित करत नाही. भूक लागल्याचा आणि पोट भरल्याचा संदेश देण्याचे काम ही संप्रेरके करीत असतात. त्यामुळे जेव्हा आपण ग्लुकोजयुक्त पदार्थ खातो तेव्हा स्वादुपिंडातून इन्शुलिन रक्तात सोडले जाते. आणि इन्सुलिन मेंदूला खाणे बंद करायचे आदेश लेप्टीन मार्फत देते. बऱ्याच वेळ खाल्ले नाही की घ्रेलिन नावाचे संप्रेरक भूक लागल्याचा संदेश मेंदूला देते. हे पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक लूप फक्त ग्लुकोज यशस्वीपणे चालवू शकते. त्यामुळे फ्रुक्टोज खाल्ल्याने भूक भागल्याचे समाधान मिळत नाही. आणि पोट भरल्याचा संदेशही वेळेवर मिळत नाही. परिणामी खाल्लेल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्हीचे मेदात रूपांतर होते. या प्रक्रियेतून पुढे VLDL (व्हेरी लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल) तयार होते आणि ते हृदयविकारास कारणीभूत ठरते.
साखर मेंदूमधील डोपामिन रिसेप्टरना उत्तेजित करते. याचा अर्थ अमली पदार्थांच्या सेवनातून शरीरात जे बदल घडून येतात तसेच साखरेच्या सेवनाने येतात. यामुळे एखाद्या साखरेच्या आहारी गेलेल्या माणसाला हळू हळू किक मिळण्यासाठी आधीपेक्षा जास्त साखर खावी लागते आणि परिणामी ती खाण्याचा "नाद" लागतो. हे वाचल्यावर एखाद्याच्या डोळ्यासमोर ४० वर्षाचा माणूस वाटी चमच्याने साखर खात बसलाय असं येईल, पण तो 'नाद' म्हणजे फास्ट फूड ऍडिक्शन.
शीतपेयांमध्ये साखर, मीठ आणि कॅफिन याचं खतरनाक मिश्रण असतं. यातील कॅफिन हे डाययुरेटिक आहे, म्हणजे शरीरातील फ्री फ्लुइडचा ते निचरा करतं. मिठामुळे परत लगेच तहान लागते आणि साखर जरी मिठाची चव झाकायला वापरली असली, तरी त्यातील फ्रुक्टोजमुळे भूक न भागवता शरीरातील चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरते. फास्ट फूडचे देखील हेच तत्व आहे. ब्रेड, सॉस पासून ते अगदी हेल्दी लेबल असलेल्या तयार योगर्टमध्ये सुद्धा साखर नाहीतर हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप वापरले जाते. फॅट फ्री लेबल मिरवणारे सगळे पदार्थ साखरेनी भरलेले असतात. आणि फॅट फ्री खाऊन फॅट तर कमी होतच नाही, वर आणि खिसाही रिकामा होतो.
हे सगळं वाचलं किंवा बघितलं की एकच उपाय योग्य वाटतो. पदर खोचून स्वयंपाकघरात जाणे. आपल्या शरीरात काय जातंय हे कुठल्यातरी डब्याच्या मागचं लेबल वाचून ठरवण्यापेक्षा आपण घरी स्वत: करावं. कारण जेव्हा अन्नपदार्थ नफा-तोटा या दृष्टिकोनातून बनवला जातो, तेव्हा तो जास्तीत जास्त कसा विकला जाईल याचाच विचार अग्रणी असतो. आणि आपल्या शरीराचे हे कमकुवत भाग ओळखूनच आपल्यावर असे प्रयोग केले जातात.
सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे लठ्ठपणा हे रोगांचे कारण नसून लठ्ठपणा ही देखील त्या रोगांपैकी एक अशी व्याधी आहे. आपल्या लठ्ठपणाला आपल्या शरीरात होणाऱ्या कित्येक रासायनिक प्रक्रिया जबाबदार असतात. आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी व्यायाम हा शेवटचा किंवा कदाचित चुकीचा उपाय आहे. व्यायामानी लठ्ठपणा कमी होत नाही हेदेखील आता सिद्ध झालेले आहे. आहारावर नियंत्रण, त्यातही साखरेवर नियंत्रण, ताज्या पालेभाज्या आणि फळभाज्या, दही/ताक , नियंत्रित मांसाहार आणि भरपूर पाणी या सगळ्यांच्या मदतीने आरोग्य चांगले ठेवता येते. पण यासाठी आपले जेवण आपल्या डोळ्यासमोर घरी बनवणे यासारखा दुसरा सोपा उपाय नाही.