Thursday, October 29, 2020

पोळी चपातीची गोष्ट

 पोळ्या कशा करायच्या आणि त्या कशा आल्याच पाहिजेत वगैरे सगळे उपदेश मी अनेकांच्या तोंडून लहानपणापासून ऐकत आले आहे. माझे आजोबा आम्हा नातवंडांना गोळा करून त्यांच्या कलेक्टरपणीच्या कथा सांगायचे. त्यात ते चपाती, भाकरी काय पाहिजे ते करून स्वतः कसे खात असत हे ऐकून ऐकून आमचे कान दुखू लागायचे. पण गंमत म्हणजे, आजोबांना मी म्हातारपणी कधीही ओट्यासमोर पोळ्या लाटताना पाहिले नाही. ते काम मामी नाहीतर आजीच करायची. सुदैवाने, आज परिस्थिती बदलते आहे.माझ्याच मित्रयादीत अनेक पुरूष या लॉकडाऊनच्या काळात मस्त मस्त स्वयंपाक करताना दिसताहेत. आणि घरातले कामसुध्दा घरातले लोक वाटून घेतायत.

आमची आजी कणकेची त्रिकोणी घडी घातली की नंतर तिचा गोल अजिबात करायची नाही. तिला बालसुलभ प्रश्न ते सून सुलभ टोमणे सगळे मारून, विचारून झाले होते. पण ती तिच्या त्रिकोणावर ठाम होती. आयुष्यात इतर अनेक अन्याय आजीने सहन केले पण कुणीतरी म्हणालं म्हणून पोळी कधीही गोल केली नाही. पण मामीचा गोल आणि आजीचा त्रिकोण तव्यावर जाऊन मात्र एक सारखे टम्म फुगायचे.
मला पोळी हा प्रकार अगदी परवा परवा, जमायला लागला. पोळीला कितीही काट मारायचा प्रयत्न केला, स्वयंपाकातून हद्दपार करायचा प्रयन्त केला, तरी मऊ मऊ, लुसलुशीत पोळी कधीतरी खावीशी वाटतेच. याचा प्रत्यय मला भारताबाहेर राहताना आला. पोळीच्या ऐवजी टॉरटिया, पिटा ब्रेड, फ्रोझन पराठे वगैरे अनेक प्रकार लोकांना करताना पाहिले. पण पोळीची त्यांना सर नाही. घडीच्या, तेल लावलेल्या पोळ्या आणि कोल्हापूर-कर्नाटक सीमेवरच्या पातळ भाकरी हे दोन प्रकार ज्यांना ज्यांना चांगले जमतात, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.
मराठी पदार्थ शिकण्याची हुकमी जागा म्हणजे मायबोली. मायबोलीवर, जगभरातल्या अनेक स्वयंपाकाची आवड असलेल्या लोकांनी, अतिशय अवघड अवघड पाककृती सोप्या करून लिहिल्या आहेत. राखीपौर्णिमेचा नारळीभात, किंवा पुरणपोळी, या संकेतस्थळावर काही ना काही सिक्रेट टिप्स नेहमीच मिळतात. अशीच एकदा पुरणपोळीची पाककृती शोधताना तिथल्या व्हीबी आयडीने (त्या फेसबुकवर कुणाच्या संपर्कात असतील आणि त्यांची हरकत नसेल तर त्यांना कुणीतरी टॅग करा) रवा मैद्याची पुरणपोळी कशी करायची ते लिहिले होते. ती पाककृती म्हणजे माझ्या पोळीशिक्षणाचा टर्निंग पॉईंट होता असे म्हणता येईल. त्यात किंवा खालील अभिप्रायात असे सांगितले होते की कणीक घट्ट मळून त्यावर तांब्याभर पाणी ओता.आणि तशी तिला पाण्यातच रात्रभर राहूद्या. हे वाचून, मला मी इतरत्र वाचलेल्या अनेक गोष्टींचा अचानक उलगडा झाला. पोळीची मक्खी कणकेत आहे हे माहिती होते. पण कुणी संकटकाळात देव पाण्यात बुडवतो तशी कणीक बुडवत असेल असे कधीच वाटले नव्हते. आणि त्याचवेळी तसे करणे किती भारी आहे हेदेखील लक्षात आले.
पण ती पद्धत वापरून केलेल्या पोळ्या स्वर्गीय लुसलुशीत होतात. यांचं शास्त्रीय कारण म्हणजे ग्लूटेन. मैदा कितीही घातक असला तरीही त्याचे बेकिंग क्षेत्रातले स्थान अढळ आहे. कुणी ज्वारी, बाजरी, नाचणी वापरून कितीही काहीही बेक केलं असलं तरी आधाराला मैदा असतोच. यांचं कारण मैद्यामध्ये, किंवा गव्हामध्ये दोन प्रथिनं सुप्तावस्थेत असतात. ग्लूटेनिन आणि ग्लियाडीन. आपण गव्हाच्या पिठात पाणी मिसळले की ही दोन प्रथिनं जागृतावस्थेत येतात आणि त्यांचं ग्लूटेन तयार होतं. आपण कणीक जितकी मळू तितकं या प्रथिनांमधील क्रॉसलिंकींग वाढतं म्हणजे एकावर एक अशा अनेक जाळ्या तयार होतात आणि त्यामुळे आपल्या कणकेला आकार धरता येऊ लागतो. जेव्हा आपण यीस्ट वापरून मैदा आंबवतो, तेव्हा दोन तीन वेळा कणीक फुगवून मळायची असते. तसें करताना आपण ग्लूटेनचे जाळे वाढवायला मदत करत असतो. आणि या जाळ्यांमधून वाट काढत जेव्हा यीस्टने तयार केलेला कार्बन डायॉक्साईड पळून जातो तेव्हा अपल्याला लुसलुशीत ब्रेड मिळतो.
अर्थात पाणी आणि पिठाच्या जवळीकीमुळे ग्लूटेन तयार होते.जेव्हा आपल्याला स्वतःचा आकार धरणारा पदार्थ बनवायचा असतो (जसे की पोळी किंवा ब्रेड) तेव्हा पाणी आणि पिठाला एकमेकांशी जवळीक करायला आपण जास्त मुभा देतो.म्हणजेच कणकेला पाण्यात बुडवल्याने कणिक इलॅस्टिकही बनते आणि भाजल्यावर चांगला आकार धरू शकते. हेच भाकरी करताना किती त्रेधा तिरपीट होते ते अनुभवी लोक सांगू शकतीलच. भाकरी करण्याचं सगळं कसब ती तव्यावर जाऊन तुटू नये यात असतं. पण पोळीचं तसं नाही.
जसं पिठात पाणी घालून ठेवलं की ते आकार धरू शकतं, या उलट जेव्हा आपल्याला मैद्यापासून सहज तुटणारं, खुसखुशीत असं बिस्कीट बनवायचं असतं तेव्हा ग्लूटेनच्या खूप साखळ्या तयार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, नानकटाई करताना आधी पिठात आपण मोहन घालतो. पाश्चात्य देशांत याला शॉर्टनिंग असं म्हणतात. आधी तूप किंवा बटर घातल्याने आपण पाण्याची आणि पिठाची इंटरॅक्शन कमी करतो. त्यामुळे सहज तुकडा पडेल आणि तरीही खुसखुशीत असं बिस्कीट आपल्या हातात येतं.
तर अशी लुसलुशीत पोळी करायची असेल तर तुम्हाला अपेक्षित पोळ्यांना जेवढी लागेल त्यापेक्षा अर्धी ते पाऊण वाटी कमी पीठ घेऊन त्याची तेल न घालता घट्ट कणीक मळा. आणि ती तास ते दोन तास पाण्यात बुडवून ठेवा. मग उरलेले अर्धी वाटी पीठ घालून ती मळून घ्या आणि शेवटी हवं तितकं तेल लावा. ही कणीक सकाळी मळून संध्याकाळी पोळ्या केल्या तर त्या अजून मऊसूत होतात.
आता पोळीबद्दल अगदी ठामपणे म्हणू शकते की चांगली पोळी म्हणजे चांगली कणीक. कणीक चांगली असेल तर पोळी थोडी जाड लाटली तरी छानच लागते. आणि थोडी जास्त भाजली तरी वातड होत नाही. उलट खुसखुशीत लागते. अशा पद्धतीने कणीक मळून पोळ्या केल्या की त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुध्दा मऊ राहतात.
मैदा आणि साखर हे मनुष्याच्या शारीरिक अधोगतीचे कारण आहेत हे मान्य आहे. पण एखादा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून या दोन गोष्टींकडे पाहिले तर माणसाच्या सृजनशीलतेची कमाल वाटते. साखर सुध्दा इतकी रूपं घेऊन येते की तिचा कधीच कंटाळा येत नाही. एक तारी, दोन तारी पाक असो, किंवा टॉर्च वापरून केलेला क्रेम ब्रुले. साखर स्वयंपाकघरातील जादूगारीण आहे. आणि या सगळ्या प्रक्रियांच्या मागे असलेलं रसायनशास्त्र बघितलं की स्वयंपाक करणे म्हणजे प्रयोगशाळेत काम करण्यासारखेच आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळेच सध्या काम बंद असल्यामुळे स्वयंपाक वाढला आहे.

तेलही गेलं तूपही गेलं


गेली चार पाच वर्षं आहारतज्ज्ञांनी अनेक नवीन -- खरंतर जुनेच-- शोध नव्याने समोर आणले आहेत. गेली तीस एक वर्षं आपण जगभरात वाढलेला स्थूलपणा कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. याची सुरुवात साधारण तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत झाली. आहारात चरबी असेल -- तीसुध्दा संपृक्त, म्हणजे सॅच्युरेटेड चरबी--तर शरीरातील चरबी वाढते या वरवर अगदी सरळ वाटणाऱ्या समीकरणाचा आधार घेऊन आपण "लो फॅट" पदार्थांच्या मागे लागलो. पण लो फॅट म्हणजे हाय शुगर. याचे कारण असे, की उद्योगिक खाद्य निर्मितीतून जेव्हा फॅट कमी होऊ लागले तेव्हा अन्नाचा रुचकरपणा टिकवण्यासाठी त्यात अधिक साखर घातली जाऊ लागली. आणि साखरेचे अतिसेवन हे तेलाच्या किंवा तुपाच्या अतिसेवनाच्या तुलनेत किती भयानक आहे हे बघतच माझी पिढी मोठी झाली आहे. खरंतर एका अन्नघटकाला पकडून बदनाम करण्यात काहीच अर्थ नाही. माणूस अन्नाचेच अतिसेवन गेली अनेक वर्षं करतो आहे.
आपण ज्याला फॅट म्हणतो, ते मुख्यत्वे हायड्रोजन आणि कार्बनने तयार झालेले पदार्थ असतात. बाकीच्या पोषणमूल्यांच्या तुलनेत फॅट प्रति ग्रॅम जास्त उष्मांक देते त्यामुळे उष्मांक मोजणाऱ्या लोकांना त्याचे भय वाटणे साहजिक आहे.
संपृक्त, अर्थात सॅच्युरेटेड फॅटमध्ये कार्बनवर एकही डबल बॉण्ड नसतो. अशी चरबी हृदयविकार होण्यास कारणीभूत आहे असं तीस वर्षांपूर्वी दिसून आलं होतं. असं फॅट शक्यतो ऍनिमल ओरिजिन असते. जसे की दूध, तूप, बटर, बीफ फॅट, बेकन ग्रीस, लार्ड. अनेक ठिकाणी पशूंना मारल्यावर ही चरबी पदार्थ तळायला वापरली जायची. वनस्पती अपवाद म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेलही बहुतांशी सॅच्युरेटेड असते. या फॅट्स चे वैशिष्ट्य असे की सामान्य तापमानाला हे घन रूपात राहतात.जसे की बटर, तूप आणि थोडी थंडी असेल तर, खोबरेल तेलही.
आता अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय? ज्या तेलात एक किंवा अधिक डबल बॉण्ड असतात त्यांना अनसॅच्युरेटेड म्हणतात.यातही मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड असे दोन प्रकार आहेत. ज्याची जाहिरात मुफा आणि पुफा अशी करतात. आपले शरीर ज्या गोष्टी बनवू शकत नाही त्यापैकी ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स आहेत. हे आपल्याला आहारातून घ्यावे लागतात. आणि मुफा आणि पुफा व्यवस्थित घेतले की हे दोन्ही आपल्याला मिळतात. यात ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल, शेंगदाणा तेल, सनफ्लॉवर, मोहरी, कॅनोला अशी सगळी तेलं येतात. ही तेलं खाऊन हृदयविकार होत नाहीत असे अनेक अभ्यास झाले आहेत. मेडिटरेनियन प्रदेशात ऑलिव्ह ऑइल खूप खाल्ले जाते.त्या देशांत हृदयविकाराचे प्रमाण कमी असते. जसे सॅच्युरेटेड फॅट सामान्य तापमानाला घन रूपात असते, तशी ही तेलं सामान्य तापमानाला द्रव रूपात असतात.
अशा तेलाचं हायड्रोजनेशन करून म्हणजेच त्यांच्या डबल बॉण्डचे सिंगल बॉण्ड मधे रूपांतर करून, त्यांना घन रूपात आणतात. पूर्वी बटरला पर्याय म्हणून असं मारजरीन विकायचे. तसंच भारतात नारळाचं झाड असलेला प्रसिद्ध डालडा असायचा. तुपाला स्वस्त पर्याय म्हणून अनेक वर्षं लोकांनी डालडा वापरला. पण हायड्रोजनेशन करताना ट्रान्स फॅट तयार होतात. ट्रान्स फॅट अनसॅच्युरेटेड असतात. पण निसर्गात तेलात जे डबल बॉण्ड "सिस" असतात ते हायड्रोजनेशनमध्ये अधिक प्रमाणात "ट्रान्स" होतात. तुपामध्ये काही प्रमाणात ट्रान्स फॅट निसर्गतः असते. पण हायड्रोजनेशनमध्ये ते अधिक प्रमाणात बनते. ट्रान्स फॅट हे शरीरातील लो डेन्सिटी लिपिड्स म्हणजेच LDL वाढवायला कारणीभूत असते. त्यामुळे आता जगभरात ट्रान्सफॅट वर निर्बंध घातले गेले आहेत.
या सगळ्या चर्चेतला तिसरा महत्वाचा भाग म्हणजे कोलेस्टेरॉल. अनेक तेलांच्या डब्यावर "नो कोलेस्टेरॉल" असं लिहिलेलं असायचं. पण वनस्पती पासून तयार केलेल्या कुठल्याच तेलात कोलेस्टेरॉल असू शकत नाही. कारण कोलेस्टेरॉल प्राणी तयार करतात. आपल्या शरीरात आत काही जखम झाली, ज्याला इन्फ्लमेशन म्हणतात, तर त्यावर शरीराने लावलेली पट्टी म्हणजे कोलेस्टेरॉल. त्यामुळे हे फक्त ऍनिमल फॅटमध्येच सापडते. शरीरातले कोलेस्टेरॉल हे अंडी, तूप अशी कोलेस्टेरॉल युक्त चरबी खाल्ल्यामुळे वाढते हा समजदेखील आता खोडून काढण्यात आला आहे. कर्बोदकांच्या आणि साखरेच्या अतिसेवनानेसुध्दा कोलेस्टेरॉल वाढते.
तळायला कुठले तेल वापरायचे?
तळण्यासाठी खरं म्हणजे सॅच्युरेटेड फॅट उत्तम. कारण हे फॅट्स चढ्या तापमानाला स्टेबल असतात. आणि त्यांचा स्मोक पॉईंट जास्त असतो. स्मोक पॉईंट म्हणजे ते तापमान ज्याला तेलातून धूर येऊ लागतो. एक्सट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल, अक्रोड तेल, बदाम तेल, जवस तेल अशा तेलांचा स्मोक पॉईंट कमी असतो म्हणून तळण्यासाठी ती तितकी बरी नाहीत. आणि या वरील तेलात तळायचे म्हणजे चांदीची कढई आणि सोन्याचे झारे आणावे लागतील. तळायला शेंगदाणा तेल उत्तम. सनफ्लॉवर तेलही चांगले. सनफ्लॉवर तेलाला चव किंवा वास नसल्यामुळे तळण्यासाठी ते जास्त सोयीचे. खोबरेल तेल आणि तूप भारतात अनेक प्रांतात तळण्यासाठी वापरतात. खोबरेल तेलातले केळ्याचे वेफर्स आणि तुपात तळलेली कुरकुरीत जिलबी हे माझे अतिप्रिय पदार्थ आहेत.
ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9
वरती लिहिल्याप्रमाणे ओमेगा 3 आणि 6 हे आवश्यक फॅटी ऍसिड आहेत. ते आपलं शरीर तयार करू शकत नाही. ओमेगा 9 काही प्रमाणात शरीर बनवू शकते. यांची नावे त्यांचे डबल बॉण्ड कुठल्या कार्बनवर असतात त्याप्रमाणे दिलेली असतात. साधारणपणे ओमेगा 6/ओमेगा 3 हा रेशो आहारात 4:1 असावा. पण हल्ली वेगवेगळ्या पदार्थातून अनेक प्रकारचे फॅट आल्यामुळे तो 10 च्याही पुढे गेलेला असतो. अर्थात हे पाश्चात्य देशांचे आकडे आहेत. ओमेगा 6 च्या अतिसेवनामुळे इन्फ्लमेशन होतं असे काही अभ्यास झाले आहेत. पण त्यातून अजून ठाम असे काही निघाले नाही. ओमेगा 3 मात्र पूर्णपणे पोषक आहे. हे आपल्याला सामन (salmon) सारख्या तेलकट माशांमधून मिळतात किंवा अक्रोड, जवस अशा वनस्पतीतून मिळतात. ओमेगा 6 हे रिफाईंड तेलांमध्ये भरपूर असतात. ओमेगा 9 हे बदाम, अक्रोड, काजू अशा सगळ्या सुक्या मेव्यात असतात. पण सर्वाधिक ऑलिव्ह ऑइलमध्ये असतात.
वजन कमी करायचे म्हणून तेलाचे तुपाचे प्रमाण अनेक जण कमी करतात. पण जे लोक मासे खात नाहीत, अंडी खात नाहीत त्यांनी आहारात शेंगदाणे, बदाम यासारखे नट्स जरूर ठेवावेत. असे हेल्दी फॅट्स खाण्याची अजून एक पद्धत आहे. ती म्हणजे त्याचे बटर बनवणे. पीनट बटर सगळ्यांना माहिती आहेच. तसेच बदामाचे बटर सुध्दा बनवता येते. कृती अगदी सोपी आहे. शेंगदाणे किंवा बदाम ओव्हन मध्ये किंवा कढईत थोडे भाजून घ्यायचे. आणि कंटाळा येईपर्यंत मिक्सरमधे फिरवायचे. आधी कूट, मग चिकट कूट आणि मग बटर असा त्याचा प्रवास होतो. पण या दाण्यांमध्ये मूलतः तेल असल्यामुळे काही वेळाने तेल बाहेर येते आणि त्याचे "बटर" होते. अशा स्थितीला आलं की त्यात थोडे सनफ्लॉवर तेल टाकायचे. शेंगदाण्याच्या बटरमध्ये शेंगदाणा तेल असंही करू शकता. पण सनफ्लॉवर माझे लाडके आहे. खाली बदाम आणि शेंगदाण्याच्या बटरचा फोटो दिला आहे. बदाम बटर करताना मी घरचे डार्क चॉकलेट त्यात टाकले. आणि पीनट बटरमध्ये थोडा मध टाकला. विकत मिळणाऱ्या अशा बटर्समध्ये साखर असते. घरी केले की साखर घालायची का किंवा किती घालायची हे आपल्याला ठरवता येते.
हा लेख फारच लांब झाला आहे तरी इमल्शनबद्दल लिहिले नाही तर तो अपूर्ण आहे. दोन घटक जे एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत जसे की तेल आणि पाणी, जेव्हा मिसळून एक होतात तेव्हा त्याला इमल्शन म्हणतात. दूध हे असं इमल्शन आहे. दुधातले फॅट आणि पाणी जोपर्यंत दूध नासत नाही तोपर्यंत एकरूप असतात. तसेच मेयोनेज हेही एक इमल्शन आहे. सॅलड मधे घालायला आपण तेल आणि व्हिनेगर वापरून व्हिनेगरेट करतो तेही इमल्शन आहे.
मेयोनेज घरी करायची कृतीसुध्दा सोपी आहे.
एक अंडे घ्यायचे आणि त्याला सव्वा कप तेल घ्यायचे. मी अर्थात सनफ्लॉवर तेल घेतले. अंडे आणि पाव कप तेल मीठ आणि थोडी मोहरीची पावडर घालून मिनिटभर फेटायचे. यासाठी मिक्सर किंवा इलेकट्रीक एग बीटर वापरावा. त्यानंतर अगदी अलगद थोडे थोडे तेल फेटता फेटता त्यात ओतत राहायचे. हे काम साधारण दहा मिनिटं चालेल अशा गतीने तेल घालायचे. हळू हळू मेयो पिवळ्याचे पांढरे आणि घट्ट होते. शेवटी त्यात चमचाभर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून पुन्हा 30 सेकंड फेटायचे. साखर हवी असल्यास सुरुवातीलाच मिठाबरोबर घालायची.
जसे वर लिहिल्याप्रमाणे इसेन्शियल फॅट्स असतात तसेच इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजेच प्रथिनेही असतात. फक्त प्रथिने आणि फॅट खाऊन आपले शरीर व्यवस्थित चालू शकते (जय किटो!!). प्रथिनांपासून ग्लुकोज शरीराला तयार करतात येते. आणि ग्लुकोज संपले की शरीर फॅट वर आरामात जगू शकते. हे दोन मोड आपल्याला निसर्गाने दिले आहेत. पण शरीरासाठी इसेन्शियल कार्बोहायड्रेट असे काहीही नाही. त्यामुळे जर काही कमी करायचेच असेल तर पोळी, भात, ब्रेड वगैरे आधी कमी करून बघावेत. तुम्ही एखाद्या दिवशी जोडीला भात वगैरे न घेता नुसते वाटीत तूप घेऊन खाऊन पहा. काही चमचे खाल्ल्यावर अजून एक वाटी तूप खाऊ असे वाटणार नाही (इथे पैलवान वगैरे लोक अपवाद आहेत). फॅट निसर्गतः पोट भरल्याची भावना देणारा घटक आहे. त्यामुळे नुसत्या फॅटचे अतिसेवन करणे अवघड आहे. तूप तेव्हाच जास्त खाल्ले जाते जेव्हा त्याखाली पुरणपोळी असते. बटर बरोबर कुरकुरीत टोस्ट असला की थांबणे अवघड वाटू लागते. आणि चीज सुध्दा पिझ्झा मुळेच जास्त खाल्ले जाते. त्यामुळे अतिसेवन नेमके कशाचे यावरही विचार करायला हवा!

Saturday, August 18, 2018

प्युअर व्हाईट अँड डेडली -- जॉन युडकिन


हल्ली बऱ्याच आहारविषयक बातम्यांमध्ये दोन नावे एकमेकांविरोधी मांडली जातात.
अॅन्सेल कीज आणि जॉन युडकिन.
"बिग शुगर कॉन्स्पिरसी" अशा काहीशा हेडिंग खाली अॅन्सेल कीज या संशोधकाने साखर उत्पादकांचा फायदा करून देण्यासाठी हृदयविकाराचे सगळे खापर फॅटवर मारले, अशा अनेक बातम्या लो कार्बोहायड्रेट आहाराचे समर्थन करणारे लोक वापरतात. पण मागे वळून बघता, आणि जॉन युडकिन यांचेच प्युअर व्हाईट अँड डेडली वाचून, असे लक्षात येते की आता त्यावेळच्या संशोधनाचे घाईघाईने राम विरुद्ध रावण असे चित्रण करण्यात येत आहे.
प्युअर व्हाईट अँड डेडली हे कुठल्याही संशोधकाने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. मुख्य उद्देश जरी साखर (आणि साखरेचा आहारात होणाऱ्या अतिरेकाचे परिणाम) असला, तरी चांगले संशोधन म्हणजे काय. आणि ते कसे करायचे यावर जणू या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी एक प्रबंधच लिहिला आहे. १९३८ साली वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून युडकिन यांनी केम्ब्रिजमध्ये, मुख्यत्वे आहारातील जीवनसत्वांवर काम करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी रायबोफ्लेवीन कमतरतेचे काही परिणाम युडकिन यांनी शोधून काढले. १९५० पर्यंतच्या त्यांच्या कामांमधून त्यांनी योग्य आणि समतोल आहार कसा गरजेचा आहे याबद्दल अनेक पेपर प्रकाशित केले. टाइम्स सारख्या नियतकालिकातही त्यांचे लेख समाविष्ट केले गेले. १९५० नंतर त्यांचे बरेच काम हे स्थूलता आणि हृदयविकार या विषयांवर झाले.
असे म्हंटले जाते, की अमेरिकेतील "शुगर लॉबी" ने अॅन्सेल कीज या शास्त्रज्ञाच्या मदतीने, आधी प्रचलित असलेल्या पारंपरिक आहारपद्धतीत बदल केले आणि त्यासाठी बरीच जनजागृती केली. पाश्चात्य देशांमधील आहार हा पशू चरबीयुक्त आहार असे. म्हणजेच, मासांहारी आहारातील चरबी, जसे की बीफमधील चरबी, बटर, अंड्यातील पिवळे बलक, बेकन, हॅम अशा मांसाहारी आहारातून उपजत मिळणारी चरबी असा अमेरिकन लोकांचा मुख्य आहार होता. तळण्यासाठीदेखील वेगळे तेल न वापरता "बीफ टॅलो" वापरण्यात येई. कीज यांनी "सेव्हन कंट्री स्टडी" म्हणून एक प्रसिद्ध अभ्यास केला, ज्यातून त्यांनी संपृक्त चरबी (म्हणजेच पशु चरबी) ही हृदयरोगास कारणीभूत आहे असा निष्कर्ष काढला. पण काही समीक्षकांच्या नजरेतून महत्वाचे अभाव सुटले नाहीत. या अभ्यासात आधी असेही देश होते (डेन्मार्क नॉर्वे) जिथे संपृक्त चरबी सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असूनसुद्धा, हृदयविकाराचे प्रमाण मात्र कमी होते. आणि काही देश असेही होते जिथे संपृक्त चरबीचे सेवन अत्यल्प असूनही (चिले) हृदयविकाराचे प्रमाण अधिक होते. हे देश अभ्यासातून सोयीस्कररीत्या वगळण्यात आले होते.
पुस्तकात आधी युडकिन मनुष्याचा आहार मांसाहाराकडून धान्याकडे का आणि कसा वळला याचा मागोवा घेतात. आदिमानवाचे कर्बोदकांचे सेवन अत्यल्प होते. त्यातही फ्रुकटोज कधीतरीच मिळणारी मेजवानी असे. फळं आणि मध यातून अधून मधून भटक्या आदिमानवाला साखरेचा आस्वाद घेता येई. पण कालांतराने मानवाने शेतीस सुरुवात केली आणि धान्य उगवायचा आणि सोयीस्करपणे साठवून ठेवण्यातला सोपेपणा त्याच्या लक्षात आला. प्राणी पाळून, ते मारून खाणे हा शेतीच्या दृष्टीने अन्ननिर्मितीचा अप्रत्यक्ष मार्ग आहे. कारण प्राण्यांसाठी चारा, त्यांना ठेवायला जागा, त्यांच्या सुधृढ असण्याची काळजी घेणे, या सगळ्यासाठी वेगळा खर्च येतो तसेच जागाही लागते. बऱ्याचदा, धान्य उत्पादनासाठी लागणाऱ्या जागेतीलच बराच मोठा भाग पशुखाद्य उत्पादनाला द्यावा लागतो. त्यामुळे शेतीप्रधान संस्कृती हळू हळू त्यांना लागणारी ऊर्जा धान्यामधून मिळवू लागल्या. त्याच्या पुढची पायरी म्हणजे, कधीतरीच मिळणारे सुक्रोज तयार करण्यासाठी एक संबंध उद्योग तयार झाला.
सुक्रोजचे अतिसेवन धोक्याचे आहे ही २०१८ मध्ये सहज मान्य करण्यासारखी गोष्ट आहे. सुक्रोजच्या अतिसेवनाचे परिणाम आता उघडही आहेत आणि त्यावर अभ्यासही बराच झाला आहे. पण तीस वर्षांपूर्वी, जेव्हा अन्नाचे औद्योगिकरण हा सगळ्याच देशांतील महत्वाकांक्षी उपक्रम होता, तेव्हा साखरेवर असा नकारात्मक शिक्का मारणे सगळ्यांनाच जड गेले असणार. झटपट मिळणाऱ्या चमचमीत अन्नाचा सुक्रोज प्राणवायू आहे. साखर आणि चरबी दोन्ही अन्नाचा स्वादिष्टपणा वाढवतात. पण साखरेचे जसे व्यसन लागते, तसे चरबीचे लागत नाही. चरबी खाऊन लगेच पोट भरल्याची, म्हणजेच तृप्तीची भावना येते. तशी साखर खाऊन येत नाही. तसेच साखर घातल्याने पदार्थ जास्त टिकतात. त्यामुळे औद्योगिक अन्न निर्मितीसाठी साखर वरदान ठरली. या औद्योगिकरणाच्या लाटेवर स्वार होऊन अनेक मोठे मोठे उद्योग आणि रासायनिक प्रक्रिया जन्माला आल्या. अमेरिकेत उसापासून निघणाऱ्या सुक्रोजला, मक्यापासून तयार केल्या गेलेल्या हाय फ्रुकटोज कॉर्न सिरपचा पर्याय ही अशीच एक औदयोगिक झेप होती. ज्यामुळे अन्न घाऊक प्रमाणात बनू लागले आणि स्वस्तही झाले.
साखरेच्या (सुक्रोजच्या) अतिसेवनामुळे अनेक विकार होतात असे स्पष्ट आणि (त्या काळी) वादग्रस्त मत युडकिन व्यक्त करतात. अर्थात त्यांच्या प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या प्रयोगांच्या आधारेच हे पुस्तक लिहिले आहे. या कामाशी निगडित अनेक पेपर लॅन्सेट या प्रसिद्ध नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहेत. सुक्रोजमध्ये असणारे ५० % फ्रुकटोज आपल्या शरीरात फक्त यकृत (लिव्हर) वापरू शकते. त्यामुळे सुक्रोजच्या अतिसेवनामुळे लिव्हरवर तसाच ताण येतो जसा मद्याच्या अतिसेवनामुळे होतो. कारण अल्कोहोल आणि फ्रुकटोज दोन्ही शरीरातील पेशी वापरू शकत नाहीत. कुठल्याही पदार्थाचे ग्लुकोजमध्ये विघटन झाले, की शरीरातील प्रत्येक पेशी ते वापरू शकते. आणि तसे ते शरीरातील इन्सुलिनच्या कार्यामुळे, कानाकोपऱ्यात पोचवले जाते. पण फ्रुकटोजचे एका क्लिष्ट मार्गाने थेट एलडीएल (लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल) आणि व्ही.एल. डी. एल (व्हेरी लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल) मध्ये रूपांतर होते. याचाच अर्थ खाल्लेल्या सुक्रोजपैकी अर्धा भाग थेट चरबीमध्ये रूपांतरित होतो.
पण साखरेवर आरोप करताना, नेहमी, अगदी प्रत्येक पानावर युडकिन आपल्याला आजार होण्याची किती कारणे असू शकतात याची सतत आठवण करून देतात. जसे की, अनुवंशिकता हे अगदी पहिले आणि महत्वाचे कारण आहे. त्यामुळे अशा विकारांचा अभ्यास करताना प्रयोगाचा गट आणि ज्यांच्यावर कुठलाही प्रयोग होत नाही असा (कंट्रोल) गट निवडताना किती काळजी घ्यावी लागते ते त्यांनी आधी अधोरेखित केले आहे. त्यांच्या अभ्यासात साखरेच्या सेवनाला तीव्र नकारात्मक प्रतिसाद देणारे लोक हे सरासरी २५ % असायचे. त्यामुळे आपण ज्याला अनुवंशिकता (जेनेटिक प्रिडिस्पोझिशन) म्हणतो, तसा एक उपगट या अभ्यासात दिसून आला. असे असले, तरी सतत साखरेचे अतिसेवन केले असता सगळ्याच प्रायोगिक गटांमध्ये काही ठराविक बदल दिसलेले त्यांनी नमूद केले आहे.
१. साखरेच्या सेवनामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईडचे प्रमाण वाढणे
२. रक्तातील लाल पेशींचा चिकटपणा वाढणे आणि त्यांचे एकत्र येणे सोपे होणे.
३. वजन वाढणे
हे तीनही लक्षणे साखरेचे सेवन कमी केल्यास पुन्हा पूर्ववत व्हायची.
डायबेटीसच्या दोन प्रकारांना पूर्वी ज्युव्हेनाईल आणि मॅच्युअर ऑनसेट अशी नावे दिली गेली होती. कारण ज्युव्हेनाईल डायबेटीस, म्हणजे सध्या आपण ज्याला टाईप १ म्हणतो तो, लहान मुलांमध्ये आढळून यायचा. आणि याचे लक्षण म्हणजे अशी लहान मुले अत्यंत बारीक असायची. कारण अन्नपदार्थांमधील ग्लुकोज त्यांच्या पेशींपर्यंत पोचायचेच नाही. आणि अतिरिक्त ग्लुकोजचे फॅटसुद्धा व्हायचे नाही. याचे कारण ही दोन्ही कार्ये करणारे इन्सुलिनच त्यांच्या शरीरात तयार व्हायचे नाही. बाहेरून इन्सुलिन दिले असता या मुलांमध्ये व्यवस्थित वजनवाढ दिसायची.
पण मॅच्युअर ऑनसेट, म्हणजे सध्या आपण ज्याला टाईप २ म्हणतो, डायबेटीसमध्ये मात्र उलट दिसून येते. रक्तात भरपूर इन्सुलिन असूनही पेशी ते वापरण्यास असमर्थ होतात किंवा त्या इन्सुलिनचाच प्रतिकार करू लागतात. अशा रुग्णांना आणखीन इन्सुलिन देऊन उपयोग नसतो. म्हणून या दोन्ही प्रकारांना इन्सुलिन डिपेंडेंट आणि नॉन-इन्सुलिन डिपेंडेंट असेही म्हणतात.
युडकिन यांनी ज्यांना आधीपासून हृदयविकार, टाईप २ डायबेटीस आणि स्थूलता आहे अशा काही गटांचा अभ्यासही केला. आणि या तीनही गटांमध्ये बहुसंख्य रुग्णांमध्ये एक लक्षण प्रामुख्याने दिसून आले. ते म्हणजे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण जास्त असणे. आणि जेव्हा अशा रुग्णांना वैद्यकीय हस्तक्षेप करून आहार बदलण्याची सूचना दिली गेली, तेव्हा वजन कमी होणे आणि रक्तशर्करा नियंत्रित होणे हे दृश्य परिणाम असले, तरी पडद्यामागचा अदृश्य परिणाम हा रक्तातील इन्सुलिन कमी होणे हा होता. त्यामुळे वजनवाढ, डायबेटीस आणि हृदयविकार हे थेट आहाराशी आणि अप्रत्यक्षपणे हॉर्मोन्सशी निगडित आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. आणि आहारातील संपृक्त चरबीपेक्षा, साखरेशी हे बदल जास्त निगडित आहेत असे मत त्यांनी वारंवार मांडले. कारण जेव्हा टाईप २ डायबेटीससाठी मेटफोर्मीनसारखी औषधे उपलब्ध नव्हती, त्या काळी हा आजार ताब्यात आणण्यासाठी एकच उपाय असे. तो म्हणजे आहारातील साखर आणि कर्बोदके बंद करणे आणि त्याजागी प्रथिने, चरबी आणि भरपूर फायबर असलेला आहार घेणे. मग चरबी, जी एकेकाळी मधुमेहासाठी औषध म्हणून वापरली जायची, अचानक मधुमेहाचे कारण कसे होऊ शकली असती? आणि डायबेटीस हा हृदयविकार होण्याची पहिली पायरी आहे याबद्दल शास्त्रद्यांमध्ये कधीच वाद नव्हता.
रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण सतत वाढवण्याचे काम आहारातील साखर (ग्लुकोज/सुक्रोज) करते. त्यामुळे आधी पेशींना इन्सुलिन रेझिस्टन्स आणि नंतर टाईप २ डायबेटीसचे निदान होण्याकरिता अनेक वर्षं जातात. आणि वाढलेले वजन हे डायबेटीस किंवा हृदयविकाराचे कारण नसून, रक्तामधील सतत वाढीव प्रमाणात राहिलेले इन्सुलिन हे आधी वजन वाढीचे, मग डायबेटिसचे आणि शेवटी हृदयविकाराचे कारण आहे असा एक मतप्रवाह आता वैद्यकीय समुदायात झाला आहे. आणि या क्षेत्रातील बरेच जाणकार आता आहार हे पहिले औषध असावे हे मान्य करतात.
हे सगळे संशोधन करताना युडकिन यांना साखर उद्योगाकडून, तसेच अन्नोद्योगाकडून प्रचंड विरोध झाला. कित्येक वेळा त्यांच्यावर ही सगळी माझी "वैयक्तिक मते" आहेत असे डिस्क्लेमर लिहून देण्यासाठी दबाव आणण्यात आला. एका साखर संस्थेने त्यांचे काम "सायन्स फिक्शन" आहे असे एका सार्वजनिक पत्रिकेत छापले. त्याविरुद्ध कोर्टात जाऊन शेवटी युडकिन यांच्या वकिलांनी त्यांना माफीनामा जाहीर करण्यासही भाग पाडले. त्यांच्या कामावर सतत टीका झाली आणि मोठ्या मोठ्या जर्नल्समध्ये काम प्रसिद्ध होऊनही ते खरे नाही असे वारंवार जनतेला पटवून देण्यात आले. हे सगळे वाचल्यावर अर्थातच असे वाटते की युडकिन यांच्यावर अन्याय झाला आहे. पण जे तेव्हा होते, ते आजही खरे आहे. ते म्हणजे संशोधनात गुंतवला जाणारा मोठ्या मोठ्या उद्योगांचा पैसा. आणि आपल्याला काय सिद्ध करायचे आहे ते आधी ठरवून केले गेलेले संशोधन.
इतर विषयातील संशोधन (जसे की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित) हे प्रदेशाप्रमाणे बदलत नाही. अमेरिकेत केला गेलेला केमिस्ट्रीमधला प्रयोग भारतात तासाच्या तसा केला जाऊ शकतो. पण एखादा जीवनशैलीशी किंवा आहाराशी निगडित आजार का होतो यामागचे विज्ञान मात्र प्रांताप्रांतात बदलते. कारण नुसता आहार विहारच नाही तर अनुवंशिकतादेखील आणि जनुकीय जडणघडणदेखील वेगळी असते. अशा पार्शवभूमीवर काय सिद्ध करायचे आहे हे आधी ठरवून संशोधन केले, तर त्यात मोठ्या त्रुटी राहण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या देशातील लोकांवर एखादा प्रयोग यशस्वी झाला म्हणून त्याचे संबंध जगासाठी सरसकटीकरण करता येत नाही आणि तसे करण्याचा आटापिटा केला तर तसे पुरावे मिळत नाहीत. अशा वेळी आपल्या सरळ रेषेत जे पुरावे बसत नाहीत, ते शांतपणे बाजूला ठेवून जेवढे बसतात तेवढेच सादर करणे हा गुन्हा तेव्हाच नाही तर आत्तासुद्धा घडतो आहे. पण पलीकडच्या बाजूकडे भक्कम पुरावे आल्यावर मात्र त्याला ब्लॅक अँड व्हाईट असे रंग देता येतात.
असे होऊ नये ही प्रत्येक संशोधकाची जबाबदारी असली, तरी मुळात संशोधकांनाच तणावमुक्त आणि सखोल अभ्यास करता यावा यासाठी लागणारा वेळ, पैसा, विचारांचे स्वातंत्र्य देऊ करणे हे त्या त्या देशातील सरकारची जबाबदारी आहे. जेणेकरून संशोधकांना त्यांच्या निकषांवर ज्या उद्योगांचा नफा अवलंबून आहे अशा उद्योगांपासून पैसा घ्यावा लागणार नाही. आणि पुढे जाऊन, सरकार पुन्हा निवडून येण्यात त्याच उद्योगांचा पैसा लागणार नाही यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.
वरील परिच्छेदातील सगळेच अशक्य असले, तरी आपल्याला आहारातील साखर कमी करणे नक्कीच शक्य असावे!
कुणी काय खावे हे "फ्रीडम ऑफ चॉईस" आहे असे अन्नोद्योग अनेक वर्षं म्हणत आले आहेत. पण पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात युडकिन म्हणतात, "फ्रीडम ऑफ चॉईस डिपेन्ड्स ऑन फ्रीडम ऑफ इन्फर्मेशन". एकीकडे लोकांनी काय खावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना देऊ करायचे पण त्यामुळे काय होऊ शकेल ही माहिती मात्र लपवायचा प्रयत्न करायचा असे धोरणच असेल, तर ती फसवणूक नाही का? पण सुदैवाने आजच्या माहिती युगात (प्रस्थापित स्रोतांकडून, व्हाट्सऍप्प नव्हे) अशी माहिती मिळवणेदेखील फारसे अवघड नाही याची हे पुस्तक वाचून जाणीव झाली. (युडकिन यांचे बरेच पेपर गूगल स्कॉलरवर पीडीएफमध्ये उपलब्ध आहेत).

Tuesday, May 30, 2017

लालू बोक्याच्या गोष्टी आणि आमची शाळा

माधुरी पुरंदरे यांची लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके अतिशय वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखी आहेत. लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनादेखील हसवणारी आणि खिळवून ठेवणारे, साधे सोपे विषय, आणि लेखनाला अनुरूप अशी, किंवा लेखनापेक्षाही काकणभर सरस अशी त्यांनी स्वतः काढलेली चित्र, यामुळे त्यांची पुस्तकं अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा प्रसिद्ध व्हावीत अशी आहेत.

त्यांच्या लेखनशैलीचे दोन महत्वाचे गुण आहेत. पहिला, त्यांच्या लेखनातून "उद्बोधक" असे काहीही प्रत्यक्षपणे सांगितले जात नाही. पण लहान मुलांना त्या पुस्तकांमधून, "दुसऱ्यांनासुद्धा असे प्रश्न पडतात. किंवा असं रडू येतं." असं वाटल्यामुळे मुलं त्या पुस्तकांमध्ये पटकन हरवून जातात. थोडक्यात, लहान मुलांचे भावविश्व समजून त्यांना पडणारे छोटे छोटे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या लेखनातून अप्रत्यक्षपणे होतो. दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे माधुरी ताईंचे अगदी छोट्या छोट्या डिटेलपर्यंत केलेले निरीक्षण, आणि त्याची रेखाटने. माधुरीताईंच्या चित्रातल्या "बाई" किंवा "आजी" अशी तरतरीत, साबणासारखी गुळगुळीत कधीही काढलेली नसते. तिचे सुटलेले पोट, थोडेसे ढगळ ब्लाउज, पिनेतून बाहेर आलेले केस हे सगळे अगदी हुबेहूब चितारलेले असते. त्यांच्या "शेजार" शृंखलेतील केतकीच्या शेजारी राहणारी सावित्री ताई तर माझी अतिशय आवडती आहे. दक्षिण भारतीय सावित्रीचे हेल असलेले मराठी तर माधुरी ताईंनी हुबेहूब पकडलेच आहे. पण तिचा बांधा, तिचे केस आणि तिचे वेगवेगळे (मॉडर्न) कपडे घालायची पद्धत बघितली की माधुरी ताईंच्या अभ्यासाचा अंदाज येतो. अशीच हलकीफुलकी पण खूप भावणारी दोन पुस्तके मी नुकतीच घेतली :

१. लालू बोक्याच्या गोष्टी.


निलू आणि पिलू या जुळ्या बहिणी घरी लालू नावाचा बोका आणतात त्याची ही गोष्ट आहे. यात लालू बोक्याचा एकूण आळशीपणा, त्याचा खादाडपणा यावर अतिशय विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच जे मार्जारप्रेमी आहेत, आणि ज्यांनी मांजरे अगदी जवळून पाहिली आहेत अशा मोठ्या माणसांनासुद्धा हे पुस्कात अतिशय आवडेल असे आहे. खरं तर, माझ्या मुलापेक्षा हे पुस्तक मलाच जास्त आवडते कारण यात काही काही गोष्टी इतक्या बारकाईने लिहिल्या आहेत की हसूही आवरत नाही आणि आपल्या आयुष्यातील तमाम मांजरांची आठवणही येते. एका ठिकाणी लालू बोक्याला आई ओरडताना म्हणते, "पूर्वी तुझी मानगूट धरून उचलायला चिमूट पुरायची, आता अख्खी मूठ वापरावी लागते". हे वाक्य ज्यांनी खायला प्यायला घालून बोके धष्ट पुष्ट केलेत त्यांना लगेच लक्षात येईल!
लालू बोक्याचा एक मित्रही आहे: चिचू उंदीर. लालू आणि चिचूची डायलॉगबाजी सुद्धा खूप विनोदी आहे.




२. आमची शाळा 



ज्यांना २-३ वर्षांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक अगदी उपयुक्त आहे. शाळेला जायचं म्हणजे काय, आणि तिथे काय काय असतं, याचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे, की मलासुद्धा पुन्हा शाळेला जावंसं वाटायला लागलं. या पुस्तकात पुन्हा माधुरी ताईचं निरीक्षण आणि त्यांचं डिटेलिंग अतिशय भावतं. शाळेत काय काय घडू शकतं यात अगदी शू होण्यापासून ते मारामारीपर्यंत सगळं सुंदर चित्रांमधून दाखवलं आहे. जोडीला अगदी मोजकीच पण मिश्किल वाक्य, जेणेकरून मुलांना आणि वाचून दाखवणाऱ्या मोठ्यांना दोघांना त्याचा आनंद घेता यावा. सुरुवातीला शाळा नको  नको म्हणणारे, शेवटी शाळेला सुट्टी आणि आता शाळा नाही म्हणून रडायला लागतात असा हा प्रवास आहे.

विविध देशांतील (साधारण) सहा वर्षांच्या मुलांचे जग कित्येक ताकदीच्या लेखकांनी आणि चित्रकारांनी रंगवलेले आहे. त्यात अमेरिकेतील बिल वॉटरसन (कॅल्विन अँड हॉब्स)  रशियातील व्हिक्तर द्रागुन्स्की (डेनिसच्या गोष्टी) फ्रान्समधील सॉम्पी-गॉसिनी (निकोलाच्या गोष्टी) असे (माझ्या वाचनात आलेले) लेखक आहेत. हे सगळे आणि माधुरी ताई एकाच ताकदीचे मला वाटतात. इतकी सुंदर पुस्तकं, तीदेखील इतक्या कमी किमतीत आणि कुठलाही अवाजवी गवगवा न करता उपलब्ध आहेत हेच माझ्यासारख्या  पालकांचं नशीब आहे.

माझ्या दोन वर्षांच्या मुलाला अजून वाचता येत नाही. पण त्याच्याकडे असलेल्या सगळ्या पुस्तकांमधून तो नेहमी माधुरी ताईंचीच पुस्तकं उचलतो. एकशे सदतिसावा पाय आणि (राधाच्या घरातले) साखर नाना या त्याच्या सगळ्यात आवडत्या गोष्टी आहेत. आणि नुसती चित्रं पाहून तो आता स्वतः सगळी गोष्ट सांगू शकतो. यातच त्या चित्रांमध्ये किती मेहनत आणि अभ्यास दडला आहे याची पावती आहे.





Friday, April 14, 2017

मी (तिच्याइतकी) आनंदी का नाही?

मी लहान असताना माझ्या आजीनी मला पत्र कसे लिहायचे हे शिकवले होते. आलेल्या पत्राला उत्तर द्यायचे असल्यास, सुरुवातीच्या मजकुरात संपूर्णपणे "त्यांच्यावर" लिहायचे. यात, "पुण्यात खूप पाऊस होतोय हे वाचून आनंद झाला" पासून, "तुमच्या नवीन घराबद्दल वाचून आनंद वाटला, अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा", पर्यंत सगळं यायचं. शेवटच्या परिच्छेदात आपली माहिती द्यायची. आणि शेवटच्या ओळीत घरातील सगळ्यांची चौकशी करायची. असे साधे साधे नियम होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत, ती काही पत्रं मला लिहायला लावायची आणि तपासायची. पत्रं लिहिण्यासाठी पोस्टकार्ड आणण्यापासून ते टाकताना लावायच्या स्टॅम्पपर्यंत सगळं मला करायला लावायची. मग पाठवलेल्या पत्रांच्या उत्तराची वाट बघण्यात वेगळीच मजा असायची. पत्रव्यवहारातून अप्रत्यक्ष संवाद व्हायचा, ज्यात काही औपचारिकता असायची, जसे, सा. न. वि. वी लिहिणे, मोठ्यांचा उल्लेख करताना तीर्थरूप वापरणे आणि लहानांचा करताना चिरंजीव वापरणे. अनौपचारिकतादेखील असायची, जिथे आपल्याला एखाद्या विषयाबद्दल काय वाटते आहे, याची दिलखुलास एकतर्फी मांडणी करता यायची. कधी कधी तशी मांडणी वाचणाऱ्याला आवडेलच याची खात्री नसायची. पण तो संवाद अप्रत्यक्ष आहे म्हणून लिहिणाऱ्याला मन मोकळं केल्याची भावना यायची.
आता तसे पत्रव्यवहार बंद झाले, पण त्यांची जागा एका दुसऱ्या अप्रत्यक्ष संवादाच्या माध्यमाने घेतली आहे. सोशल मीडिया.
हल्ली, कुणाची बरेच दिवसांनी भेट झाली की पूर्वी विचारले जाणारे कित्येक प्रश्न गैरलागू होतात.
"अरे! तू अजिबात बदलला नाहीस!"
"कुठे असतोस सध्या?"
"छोट्याचं काय चाललंय?"
"तो, तुझा मित्र क्ष आता काय करतो रे?"
असले सगळे प्रश्न सुद्धा, पत्रव्यवहारासारखेच मृत झालेत, कारण हल्ली या सगळ्याची उत्तरं आपल्या खिशात नाहीतर पर्समध्येच सापडतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम असल्या सोशल मीडिया संकेतस्थळांमुळे, संवादातील औपचारिकता निघून जाऊ लागली आहे. एकीकडे हे चांगले आहे. सोशल मीडियामुळे लोकांचे फोन, पत्ते जपून ठेवणे, पत्ता किंवा फोन नंबर बदल्यास सगळ्यांना एक एक करून तो कळवणे, हे सगळे आता एका मेसेज मध्ये नाहीतर एका फेसबुक पोस्टीत करता येते. तसेच शाळेपासून ते अगदी शेवटच्या नोकरीपर्यंत झालेला संपर्कसंचय आपल्या पाठीमागून आपल्या पाऊलखुणा याव्यात तसा येत असतो. तो जपून ठेवण्यासाठी आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून लोकांची चौकशी करायला फोन करणे, आवर्जून भेटायला जाणे अशा गोष्टी कमी केल्या तरी संपर्क ठेवता येतो.
जिथे पात्रात लिहिलेल्या काही गोष्टी आपल्याला कल्पनेने समजून घ्याव्या लागायच्या, त्या आता फोटोच्या नाहीतर व्हिडियोच्या माध्यमातून थेट आपल्यासमोर दिसायला लागल्या आहेत. पण हे होण्यात, पत्रव्यवहारातला एक महत्वाचा भाग गळून पडला आहे. तो म्हणजे आपण आस्थेने केलेल्या दुसऱ्याच्या चौकशीचा. फेसबुकच्या आपल्या पानावर आपल्याला जगाला कशाची माहिती द्यायचीये ती आपण टाकतो, तशीच दुसऱ्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काय सांगायचे आहे हे पाहतो. जे आवडेल त्यावर निळ्या अंगठ्याची मोहोर लावून आवडले असे जाहीर करतो. पण या संवादात, आजीचा तो "आपले" विषय बाजूला ठेऊन आधी "त्यांची" चौकशी करायचा शिष्टाचार आणि अट्टाहास निघून गेल्यासारखा वाटतो. आणि कुठेतरी बारीक, असूयेची झालर या सगळ्या देवाणघेवाणीत आल्यासारखी जाणवते.
अलीकडच्या काळात विविध देशातील शात्रज्ञांच्या कामातून सोशल मीडिया आणि एकटेपणा यावर बरेच संशोधन होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा अतिरेक एकटेपणाच्या भावनेला वाढवणारा आहे असे सिद्ध होते आहे. तसेच असा अतिरेक उदासीनता वाढवण्याचे काम करू शकतो असेही संशोधनातून सिद्ध होते आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून असे दिसून येते की सोशल मीडियावर, दुसऱ्यांचे आनंदी आणि ऐषोआरामाचे आयुष्य बघून तरुणांना वैषम्य,उदासीनता आणि त्यांच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतघ्नता वाटते. यातील कृतघ्नतेच्या भावनेमुळे ते पुन्हा पुन्हा एकटेपणा आणि उदासीतेच्या चक्रामध्ये अडकतात. डिजिटल फोटोग्राफीमुळे आणि त्याच्या स्मार्टफोनशी झालेल्या संयोगामुळे आयुष्यातले साधे साधे प्रसंग आता कायमचे टिपून ठेवता येतात. आणि एखाद्याच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचे साथीदार होण्याची जबाबदारी आपल्यावर येते. माणूस स्वभावत: जसा सांघिक आयुष्य आवडणारा प्राणी आहे, तसंच वरचढ ठरण्यासाठी स्पर्धा करणे, हादेखील मानवी गुणधर्म आहे. सोशल मीडियामधून या दोन्ही गुणधर्मांचे चांगले वाईट परिणाम बघायला मिळतात.
तसेच, संवादाच्या अप्रत्यक्ष असल्यामुळे, काही बाबतीत, खासकरून राजकीय विषयांवर लिहिणाऱ्यांची भीड चेपून संवादाचे विघटन गुंडगिरीमध्ये होताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर टोपण नावाने वावरणारे लोक जसे सोशल मीडियावर लिहतात तसे ते प्रत्यक्ष बोलू शकतील का हा मुद्दा विचार कारण्यासाखा आहे. आपल्याला कुणी ओळखत नाही म्हणून आपण एखाद्या स्त्रीला बलात्काराची धमकी देऊ शकतो, हा आत्मविश्वास फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादीत असतो हे कितीही खरे असले, तरी शहरी तरुण/तरुणी त्यांचा अधिकांश दिवस सोशल मीडियावर घालवतात हे गृहीत धरल्यावर अशी पडद्याआडून केलेली वागणूकदेखील धोकादायक वाटू लागते.
एखादी तान्ह्या बाळाची आई जेव्हा तिचे आणि तिच्या गोंडस बाळाचे फोटो सोशल मीडियावर टाकते, तेव्हा तिला त्या बाळासाठी रात्री अपरात्री उठावे लागणे आणि तिची झालेली दमछाक आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. एखाद्या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोशूट टाकले, तर ते कुठे करायचे आणि कसे करायचे याबद्दलच त्यांच्यात झालेली असंख्य भांडणे त्या फोटोंमध्ये दिसत नाहीत. आणि ग्लॅमरस कपडे घालणाऱ्या, आणि मेकअप करून असंख्य फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या सिनेतारकासुद्धा सकाळी आरशात बघताना आपल्यासारख्याच, रंगवलेल्या केसातून डोकावणारा तो एक पांढरा केस बघून खट्टू होत असतात, हे मात्र आपल्या कधीच लक्षात येत नाही.
हेच जर फोन उचलून किंवा त्याहीपेक्षा चांगले, प्रत्यक्ष भेटून, आपल्याला ज्यांचा हेवा वाटतो त्यांची चौकशी केली असता असे लक्षात येते की तेही आपल्यासारखीच कशाशीतरी झुंज देत असतात. प्रत्यक्ष भेटून बोलताना, संवादातील शिष्टाचारही पाळला जातो. आणि हल्ली दुर्लक्षित झालेल्या संवादातील श्रोत्याच्या भूमिकेतही आपल्याला जाता येते. वेळ वाचवणारी कितीही तांत्रिक उपकरणे आणि ऍप्स आपल्या हाताशी आली तरीही कित्येकांना वेळ कमीच पडतो अशी त्यांची तक्रार असते. पण हातातल्या मोबाईलला आपण जितका वेळ देतो, त्याच्या दहा टक्के वेळ जरी आपण खऱ्या खुऱ्या माणसांना भेटण्यासाठी दिला, तरी या मायाजालातून बाहेर येऊन थोडावेळ, आपल्या आयुष्याकडे लांबून बघायची संधी आपल्याला मिळू शकते. आणि असे बघितले असता लक्षात येते की प्रत्यक्ष भेटून मिठी मारण्याची, हातावर टाळी देऊन फिदीफिदी हसण्याची, कटिंग चहा पीत राजकारणावर चर्चा करण्याची मजा कमी झालेली नाही.

Thursday, March 30, 2017

नकट्या नाकातली हिरकणी


लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी संपली की हमखास एखादी वर्गातली मुलगी नाकात नाजूक सोन्याची तार घालून यायची. त्या तारेच्या गाठीला चिकटलेला एखादा लाल नाहीतर काळा लुकलुकणारा मणी असायचा. आमच्या मैत्रिणींच्या गटात मात्र अशा नाक टोचून आलेल्या मुलींची यथेच्छ थट्टा व्हायची. नाक टोचणे, छोटी लाल टिकली लावून येणे, कॅनव्हासच्या बुटांच्या आणि आतल्या मोज्यांच्या वरून पायात पैंजण घालून येणे (हे असे का करतात ते एकदा पैंजण आत ठेऊन भयंकर टोचल्यावर कळले) या सगळ्याची "आमच्या" गटात फार निंदा व्हायची.
पण नुकतीच शाळा बदलून नवीन शाळेत आल्यामुळे मला या अशा सौम्य दादागिरीमध्ये सहभागी होताना थोडे अवघडल्यासारखे व्हायचे. एखाद्या मुलीनी काही वेगळे केले, की तिच्याबद्दलचा एखादा कटाक्ष वर्गाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताना मी कितीतरी वेळा पकडलेला आहे. त्या कटाक्षाचा अर्थ, आणि त्यामुळे जिच्याबद्दल तो सोडला जातो आहे तिला होणार त्रास, या सगळ्याची मूक साक्षीदार झाल्याचे मला अगदी स्पष्ट आठवते आहे. आणि अगदी आत्ता, आत्ता, शाळेत अतिशय सर्वसामान्य दिसणारी (असणारी) मुलगी आता किती असामान्य झाली आहे याबद्दल असूयावजा, उसासे टाकत घडलेली चर्चादेखील ऐकली आहे. माझी सुट्टी कोल्हापुरात असल्यामुळे, मला टिकली, बांगडी, पैंजण, चमकी या सगळ्याबद्दल फार अप्रूप होते. पण आपल्याला अशा गोष्टींचीदेखील हौस आहे हे उघड करून मला शाळेतल्या त्या आगाऊ मुलींच्या गटात मिळालेलं स्थान गमवायची इच्छा नव्हती. पण ते स्थान मला संपूर्णपणे आवडत देखील नव्हते.
नाक टोचणे हे गावठीपणाचे लक्षण आहे. हे माझे (आजूबाजूच्या मुलींकडून उधार घेतलेले) पहिले मत होते. हे मत ग्राह्य धरले असते तर गावठीपणामध्ये पहिला नंबर माझ्या आईचाच आला असता हे वेगळे सांगायला नको. अर्थात, आई होताक्षणी आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात गावठी होतच असतो हेही गृहीतच होते. पण शाळेतल्या माझ्या लाडक्या इंग्रजीच्या बाईंच्या नाकात असाच एक लुकलुकता हिरा असायचा. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या आधी आमचे उच्चार ऑक्सफर्ड - केम्ब्रिजच्या दर्जाचे करून देणाऱ्या बाईपण गावठी? पण दहावीपर्यंत मी माझ्या गटातून येणाऱ्या दबावामुळे याबद्दलचे माझे असे विचार गुप्त ठेवले.
बारावीला असताना जर्मन भाषा शिकवणाऱ्या अतिशय टापटीप, पुरोगामी मॅडमच्या नाकात देखील लुकलुकणाऱ्या पाच हिऱ्यांची कुडी दिसली. नाक टोचून बायका जर्मनसुद्धा शिकवू शकतात हा एक फारच महत्वाचा साक्षात्कार होता. माझ्याही मनात तेव्हा असा लुकलुकता हिरा घ्यायचे विचार येऊ लागले. पण माझ्यावर शाळेत आधुनिक स्त्रीबद्दल झालेले संस्कार अजून तसेच होते. मग इंजिनियरिंगला गेल्यावर वर्गातला एक (देखणा) मित्र मला म्हणाला, "तुला नाकात एक छोटीशी चमकी फार छान दिसेल. मला अशा चमकी घातलेल्या मुली फार आवडतात." या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी नको तसा संबंध जोडून मी पहिल्यांदा नाक टोचले.
तोपर्यंत मला मिळालेले सगळे सल्ले हे कमी वाईट कसे दिसता येईल या अंगाचे असायचे. जसे की, काळ्या मुलींनी फिक्कट गुलाबी किंवा तत्सम रंग घालू नयेत. बारीक दिसण्यासाठी कायम काळे किंवा उभ्या डिझाईनचे कपडे घालावेत. केस कापणारीच्या मते, माझा चेहरा फारच आडवा होता. तो उभा करण्यासाठी तिनी माझ्याकडून भरपूर पैसे घेतले. नाकाबद्दल तर बोलावे तितके कमी. आमच्या गटात सगळ्यात वाईट नाकाचा बहुमान मला मिळाला होता. मागे वळून बघता, आम्ही आपापल्या नाकांमध्ये अशी स्पर्धा का लावत होतो हे तितकेच विचार करण्यासारखे आहे. दहावीतून बाहेर पडेपर्यंत आपण दिसायला चांगले नाही हे खात्रीशीर पटले होते. त्यामुळे कुणीतरी तुला अमुक एक गोष्ट खूप छान दिसेल असे कुठल्याही तडजोडीच्या दिशेने न नेता म्हणणे, हा आश्चर्याचा धक्काच होता.
नाक टोचल्यावर परत कॉलेजला जायच्या आधी नेहमीप्रमाणे "त्याला काय वाटेल" यावर अतिविचार केला. पण त्याने जितक्या दिलखुलासपणे तुला चमकी चांगली दिसेल असे सुचवले होते, तितक्याच दिलखुलासपणे ती दिसते आहे, हेदेखील कबूल केले. पण दोन चार दिवसातच नाक लाल लाल होऊन दुखू लागले. मग तुळशीचा रस, उगाळलेली मिरी, खोबरेल तेल या अशा उपायांमध्ये त्या चमकीनी (माझ्या एकटीच्याच) मनात टाकलेली ठिणगी विझून गेली. काही दिवसांनी नाकापेक्षा मोती जड झाल्यामुळे चमकीला निवृत्त करण्यात आले. एव्हाना मी कुठल्यातरी मुलाच्या पाठीमागे हे असले धाडस केले होते, आणि त्यातल्या दोन्ही गोष्टी विफल झाल्या ही वार्ता शाळा मैत्रिणींना कळली होती. आणि मी बिनचमकीचीच कशी चांगली दिसते यावर मला नको असलेले असे बरेच सल्ले देण्यात आले.
ऑस्ट्रेलियात शिकायला गेले तेव्हा विमानातून उतरल्या उतरल्या आपली पाटी आता संपूर्णपणे कोरी आहे हे लक्षात आले. ब्रिस्बनमधले वेस्टएंड हा माझा सर्वात आवडता भाग बनला. तिथल्या घसरगुंड्यांसारख्या वरती खाली जाणाऱ्या रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी "योगा स्टुडियो" पेरले होते. भारताची आठवण काढत मी तिथल्या योगा क्लासला जाऊ लागले. आधी मित्र मैत्रिणी व्हावेत म्हणून जायचे. नंतर मित्र मैत्रिणींना घेऊन जाऊ लागले. तिथे येणाऱ्या सगळ्या गौरांगना मात्र नाकात रंगीत चमक्या घालून यायच्या. बांधणीच्या कापडाचे ओम नाहीतर गणपतीचे टीशर्ट, त्याखाली धोतरासारखी पॅन्ट, कुरळ्या कुरळ्या केसांना घट्ट मिठी मारणारा कापडी हेयरबँड, गळ्यात जपाची नाहीतर तुळशीची माळ आणि पाठीवर तिरपे, भात्यासारखे लटकलेले योगा मॅट! त्यांचा तो थाट बघून आपण किती कमी भारतीय आहोत असे वाटायला लागायचे. अशाच सायकलवरून योगासनं करायला येणाऱ्या काही मैत्रिणी झाल्या. आणि त्यांच्या नाकातले ते साधे चमचमते खडे पाहून पुन्हा नाक टोचायची इच्छा झाली!
सुट्टी संपवून ब्रिस्बनला येताना माझ्या नाकात पुन्हा ती निवृत्त केलेली हिऱ्याची चमकी आली. माझ्या (सुंदर) सावळ्या रंगावर तो हिरा किती शोभून दिसतोय असं कितीतरी लोकांनी आवर्जून सांगितलं. आणि माझी, माझ्या पुढील काही वर्षं राहिलेल्या हिप्पी ओळखीकडे वाटचाल सुरु झाली. नाकातल्या हिऱ्याला साजेशी अशी पाश्चात्य ओळख तयार करण्यात फारच आनंद मिळाला. आणि उन्हात न बसता लाभलेला माझा रंग कित्येक गौरांगनांच्या कौतुकाचा विषय ठरू लागला. नाक टोचलेल्या मुली आपल्याला चांगल्या समजू शकतात हे लक्षात आल्यावर, मी पुढाकार घेऊन ताशा कित्येक मुलींशी मैत्री केली. आणि त्यातून त्यांच्यादेखील आयुष्यात नाक टोचणे, टॅटू करणे हे अतिशय बंडखोरीचे आहे, असे मानणाऱ्या मैत्रिणी आहेत हे लक्षात आले. नाक न टोचणे बंडखोरीचे समजणाऱ्या, आणि आपला "गहू" वर्ण आपल्याला चांगले स्थळ मिळवून देऊ शकत नाही अशी खात्री असलेल्या मला हा खूपच मोठा (सुखद) धक्का होता.
एकदा नाकात हौशेने चांदीची रिंग घातली आणि पुन्हा तुळशीचा रस वगैरे करायची पाळी आली. मग थिसिसच्या कामात, चमकी पुन्हा एकदा निवृत्त झाली. परत तिची आठवण आली ती अमेरिकेत. मी आणि माझी पट्ट मैत्रीण एलोडी, मिशिगनमधून लास व्हेगसपर्यंत (टप्प्या टप्प्यात) जाणार होतो. आमचे पहिले उड्डाण शिकागोमधून होते. तिथपर्यंतच्या प्रवासात अनेक आठवणी निघाल्या. त्यात ही एक चमकीची कथा होती. ती आठवून काय झाले माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी विमान पकडायच्या आधी शिकागोमधल्या एका पिअर्सिंग स्टुडियोत जाऊन पुन्हा नाकात चमकी घातली. यावेळी मात्र टोचणार्यानी चिघळू नये म्हणून एक अभिनव उपाय सांगितला. एखाद्या कान साफ करायच्या बडनी सतत त्यावर भरपूर मीठ असलेले पाणी लावत राहणे. जखमेवर मीठ चोळल्याने जखम बरीदेखील होते हे अतर्क्य वाटले, पण असे कित्येक विरोधाभास पाहिले असल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे पुन्हा कधीही टोचून घ्यायचे नाही असे ठरवले असल्यामुळे, मी तो मार्ग पत्करला. आमच्या प्रत्येक थांब्यावर हॉटेलमधून भरपूर मीठ घेऊन मी एका बाटलीत माझे औषध तयार ठेवले होते. आणि हा उपाय अजूनपर्यंत कामी येतो आहे. ती साधी टायटेनियमची चमकी मी अजून जपून ठेवली आहे. कारण ती बाहेर काढली की त्या प्रवासातल्या सगळ्या आठवणी जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात.
सुदैवाने, नाक टोचून घ्यायची ती शेवटची वेळ ठरली. काल नाकातली चमकी काढून नथ घालताना माझी आरशासमोर अर्धा तास झटापट चाललेली पाहून नवरा म्हणाला, "कशाला घालतेस तू हे असले जीवघेणे प्रकार? तू चमकी न घालता सुद्धा मला तितकीच सुंदर वाटतेस!". तेव्हा माझ्या तोंडातून आपसूक निघालेलं, "पण मी चमकी माझ्यासाठी घालते", हे वाक्य माझ्या नकट्या नाकावरचा तो वफादार हिराच बोलला असं वाटून गेलं!

Monday, February 20, 2017

फॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हेमिंग्वे

या वर्षीच्या (अनेक) संकल्पांमध्ये संपूर्ण हेमिंग्वे नीट वाचायचे असाही एक आहे. आणि नीट वाचायचं म्हणजे त्याबद्दल लोकांना ते वाचावंसं वाटेल, इतकं नीट लिहायचं असाही उपसंकल्प आहे. जानेवारीत फॉर हूम द बेल टोल्स या हेमिंग्वेच्या बहुचर्चित पुस्तकापासून सुरुवात करायची ठरवली.
बऱ्याच लोकांना हेमिंग्वे वाचताना कंटाळा येतो. मलाही आधी यायचा. कधी कधी. आणि त्याचं कारण लेखन चांगलं नाही हे नसून आपलं वाचन बदलायची गरज आहे हे आहे. हेमिंग्वे वाचायच्या आधी वाचकांनी मन स्थिर ठेवायची प्रॅक्टिस करावी. कारण हेमिंग्वेची शैली वेगळी आहे. याचं वेगळेपण असं, की काही लेखक/लेखिका त्यांच्या पात्राला काय वाटलं हे उलगडून लिहितात. त्यामुळे वाचकाला फारसा विचार न करता कथानकाबरोबर वाहवत जाता येतं. त्यामुळेच कदाचित काही पुस्तके भुरर्कन वाचून संपतात. पण हेमिंग्वेची शैली अशी नाही. हेमिंग्वे पात्रांना काय वाटलं हे खूप कमी लिहितो. त्यांनी काय विचार केला हे लिहितो. पण त्यांना काय वाटलं हे फारसे लिहीत नाही. यामुळे पात्राला काय वाटले असेल, याचा विचार वाचकाला करायला लागतो. आणि तो वाचकाच्या मनःस्थिती, परिस्थिती आणि व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी हेमिंग्वेसारखा लेखक नाही. दुसरी खासियत म्हणजे हेमिंग्वेची भाषा अलंकारिक बिलकुल नाही. पण आशय मात्र विचार करायला भाग पडणारा असतो. कदाचित हे असे व्हावे म्हणूनच भाषेचा मुलामा काढून टाकला असावा.
हेमिंग्वे बद्दल केलेल्या वाचनात नेहमीच असे जाणवते की तो आपल्या लेखनावर प्रचंड कष्ट घेणारा लेखक होता. आणि सुरुवात वृत्तपत्रातून केली असल्यामुळे संक्षिप्त लेखनाचे संस्कार आधीपासूनच झाले असावेत. त्यामुळे त्याच्या काळात त्याची लेखनशैली क्रांतिकारी मानली जायची. अर्थात संक्षिप्त हे विशेषण फक्त त्याच्या वाक्यरचनेला लागू आहे. कारण हेमिंग्वेचे लिखाण आपल्या डोळ्यासमोर संबंध चित्र उभे करणारे असते. वाक्यरचना साधी असली तरी वर्णन अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपर्यंत पूर्ण असते. फक्त ते वस्तूंचे, विचारांचे किंवा संवादाचे असते. त्या चित्रातून बोध वाचकाला घ्यायचा असतो.
फॉर हुम द बेल टोल्स ही रॉबर्ट जॉर्डन या अमेरिकन युवकाची गोष्ट आहे. स्पॅनिश सिव्हिल युद्धात तो फेसिस्ट राजवटीविरुद्ध गेरीला सैन्याची मदत करण्यासाठी आलेला असतो. त्याला सोव्हिएत राजवटीकडून एक पूल उध्वस्त करायचे आदेश असतात. आणि त्यात त्याची मदत करणाऱ्या लोकांसोबत त्याला काही दिवस घालवावे लागतात. त्या समूहात मारिया नावाची एक तरुणी असते जिच्या तो प्रेमात पडतो. याच गटात पूर्वी फेसिस्टांविरुद्ध मोठी बंडाळी घडवून आणलेला, पण आता निराश झालेला पाब्लो असतो. आणि अतिशय कणखर, स्वतःचे सर्वांवर वर्चस्व गाजवणारी त्याची जोडीदार पिलार. रॉबर्ट जॉर्डनला पूल उडवण्यात सर्वात जास्ती मदत करणारा साठीचा अनसेल्मो आणि इतर काही छोटी पात्र अशी या पुस्तकाची बांधणी आहे.
या पुस्तकात खटकणारी, जी हेमिंग्वेच्या इतर पुस्तकांमध्ये दिसत नाही, गोष्ट म्हणजे त्यातली भाषा. भाषा जरी इंग्रजी असली तरी हेमिंग्वेनी यात एक अभिनव प्रयोग केला आहे. स्पॅनिश किंवा फ्रेंच लोक एका विशिष्ट प्रकारे इंग्रजी बोलतात. जसे की इंग्रजी मध्ये "सईची आई" हे सईज आई असे म्हणता येते. पण एखादी स्पॅनिश व्यक्ती बऱ्याचदा हे "आई ऑफ सई", असे म्हणते. या पुस्तकाची स्पॅनिश लोकांचे संवाद हे अशा प्रकारच्या इंग्रजीत लिहिले आहेत. आणि काही स्पॅनिश, खासकरून अपभाषा, जशीच्या तशी इंग्रजीमध्ये अनुवादित केली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायची सवय व्हावी लागते. पण सवय करून घेऊन वाचण्याइतके हे चांगले आहे का?, असा पुणेरी सवाल येईल म्हणून त्याचे उत्तर आधीच हो असे देते आणि का ते सांगते. ज्यांना कुणाला स्पॅनिश किंवा फ्रेंच मित्र मैत्रिणी आहेत, त्यांना हे पुस्तक वाचणे सोपे जाईल. मला हे वाचताना सतत माझ्या फ्रेंच मैत्रिणीची म्हणजे एलोडीची आठवण येत होती. त्यामुळे जो प्रयोग केला आहे तो सफल झाला आहे असे म्हणता येईल. कारण त्या शिवाय ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा माझ्यासारख्या लोकांना मित्र मैत्रिणींची आठवण येईपर्यंत हे पुस्तक आवडलं नसतं.
यातील प्रेमकथा मला फारशी रुचली नाही. कारण मारिया आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा नुसतीच शारीरिक आणि भावनिक पातळीवर दाखवण्यात आली आहे. या पुस्तकात मनाला स्पर्शून जातील, आणि कायम लक्षात राहतील असे दोन प्रसंग आहेत. पहिला म्हणजे पिलारनी तिच्या आठवणीतून कथन केलेला, पाब्लोनी त्याच्या उमेदीच्या काळात घडवून आणलेला फेसिस्टांच्या वधाचा प्रसंग. हा प्रसंग लिहिताना हेमिंग्वेच्या लेखणीचा कस लागला आहे हे लगेच लक्षात येते. आणि या पुस्तकाचे नाव काढले की हा एकच प्रसंग डोळ्यासमोर आधी येणार याची खात्री पटते. "फेसिस्ट" या लेबल खाली ज्या ज्या व्यक्तींचे वर्णन होते त्या सगळ्यांना "सधन" हे विशेषण अगदी सहज लागू होते. पाब्लोच्या नेतृत्वाखाली अशा फेसिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील व्यक्तींना जाहीरपणे मारायचा बेत असतो. पण मारणारे आणि मरणारे एकमेकांना जवळून ओळखणारे असतात. त्यामुळे त्या कत्तलीची तीव्रता आणि क्रूरता, तसेच सधन व्यक्तींबद्दलचा द्वेष आणि त्यांची दैना बघून निर्धनांना होणारा विकृत आनंद हे सगळे मन सुन्न करणारे आहे. आणि हेमिंग्वेच्या लेखणीतून ते आणखीनच धारदार बनून निघाले आहे. हा प्रसंग आपल्याला खिळवून ठेवतो कारण जरी या पुस्तकात तो फेसिस्ट विरुद्ध रिपब्लिकन असा दाखवला असला, तरी तो आजही ज्यांच्याकडे आहे विरुद्ध ज्यांच्याकडे नाही या नजरेतून आपल्यातला वाटतो.
दुसरा प्रसंग म्हणजे पिलार, मारिया आणि रॉबर्ट जेव्हा एका क्रांतिकार्याला भेटायला जातात, तेव्हा वाटेत ते एका सैनिकाला भेटतात. तो सैनिक मारियाशी खूप खेळीमेळीने आणि प्रेमानी वागतो. त्याच्या गावात फेसिस्टांनी केलेल्या अत्याचारात त्याचे घरचे कसे मरण पावले याची कहाणी सांगून भावुक होतो. तेव्हा पिलार त्याला जवळ घेऊ पाहत असताना, तो अगदी हलकेच तिला जवळ येण्यापासून परावृत्त करतो. तरुण मारियाच्या तुलनेत मिळालेला हा नकार पिलारला सहन होत नाही. आणि त्यामुळे तिच्यातील दिसण्याबद्दल आणि उतरत्या वयाबद्दल असलेला न्यूनगंड जागृत होतो. आपल्याला वाटत असलेल्या मत्सराची पिलारने दिलेली कबुली मनाला स्पर्शून जाणारी आहे. मत्सर हे बऱ्याचवेळा नाती आणि मैत्री तुटायचे प्रमुख कारण असते. ज्याला मत्सर वाटतो, इतकच काय पण ज्याचा मत्सर होतो, ती व्यक्तीदेखील उघडपणे त्याला मत्सर म्हणायला कचरते. असे असताना, जर कुणी आपल्याला मत्सर वाटतो आहे अशी प्रांजळ कबुली दिली तर समोरच्याला देखील नकळत त्याचा आदर वाटू लागतो. तसे काहीसे हा प्रसंग वाचताना होते. पिलारचा अहंकार आणि तिचा प्रामाणिकपणा या दोन्हीचे फार सुंदर रेखाटन हेमिंग्वेने केले आहे.
हेमिंग्वेच्या युद्धकथा रम्य आणि तपशीलवार असतात. त्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे प्रचंड खोलात जाऊन वर्णन केलेले वाचायला मिळते. युद्धाचा नुसताच माहोल तयार न करता, त्यामध्ये रणनीतीचे देखील खोलवर वर्णन असते. युद्ध जवळून पाहिल्यामुळे, ते वाचकाच्या डोळ्यासमोर खुबीने उभे करायची युक्ती हेमिंग्वेला अवगत होती. पण असे असले तरी हेमिंग्वेच्या वाचकाला कधीही युद्धाबद्दल आपुलकी वाटणार नाही याची काळजी त्याने घेतलेली असते. युद्धाबद्दल सलग पाचशे पाने वाचूनसुद्धा एकदाही युद्ध गरजेचे आहे असे हे पुस्तक वाचताना वाटत नाही. तसेच युद्ध काळातील माणसांच्या मनःस्थितीचे अचूक वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. युद्ध अचानक आपल्यलाला भविष्यातून वर्तमानकाळात आणून ठेवते. त्यामुळे आपल्या हातात असलेल्या प्रत्येक क्षणाला भोगून टाकण्याची धिटाई माणसाला युद्धकाळात अचानक जमायला लागते. या पुस्तकातील मारिया आणि रॉबर्टचे प्रेम हे या भावनेतून निर्माण झाले आहे असे सारखे वाटत राहते. तसेच पाब्लोचे सतत चाललेले मद्यपानदेखील अशा निराशेतून जन्माला आल्यासारखे वाटते. अर्थात हे माझे मत आहे. कारण हेमिंग्वे कधीही युद्धाचा मनावर कसा परिणाम होतो याबद्दल उलगडून लिहीत नाही. ते वाचकाला असेच टिपावे लागते.
इतर कोणी हे पुस्तक वाचले असेल तर त्यांची मतेदेखील वाचायला आवडतील. आणि हेमिंग्वेची आवर्जून वाचण्यासारखी अजून कोणती पुस्तके आहेत तेही वाचायला आवडेल.