Monday, March 26, 2012

कसल्या दु:खाने सुचते हे गाणे



दु:खाचे महाकवी ग्रेस यांचं नुकतंच निधन झालं. ही बातमी ऐकल्यावर माझं मन थेट 'ग्रेस' वाटेवर गेलं.
पहिल्यांदा ग्रेसचे शब्द कानावर पडले तेव्हा मी सहा वर्षांची होते. बाबाला निवडुंग या चित्रपटानी वेड लावलं होतं. त्यामुळे आमच्या घरात कायम 'तू तेव्हा तशी' नाहीतर 'घर थकलेले संन्यासी' ऐकू यायचं.
ग्रेस माझ्या मोठं होण्याचा एक छोटासा भाग बनले.
अर्थात याचं पाहिलं श्रेय बाबाला आणि नंतर हृदयनाथ मंगेशकरांना. त्यांच्या चालींविना ग्रेस इतक्या लवकर माझ्या वाचण्यात आले नसते. आणि कदाचित या दोन व्यक्तींच्या अप्रत्यक्ष सहभागाविना कधीच आले नसते.

ग्रेसच्या कवितेचं मला लक्षात आलेलं पाहिलं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्या कवितांमध्ये एखाद्या तरल भावनेचा सूर लावून वातावरण निर्माण करायची प्रचंड ताकद आहे. अर्थात जेव्हा अशा कवितांना हृदयनाथ शोभेशी चाल लावतात तेव्हा ऐकणार्‍यांचं काम कमी होतं.
जशी त्यांची 'वार्‍याने हलते रान' कविता.
त्यात एक ओळ आहे --

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ
दिव्यांची नगरी

त्या कवितेचं संपूर्ण सूरच ओढाळ आहे. ती ऐकल्यावर एखाद्या प्रचंड मोठ्या मळ्यात, तिन्ही सांजेला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली एकटं बसल्याची भावना मनात निर्माण होते. ग्रेसच्या कवितांनी मला फार लहान वयात वैराग्यातील सौंदर्‍याचा परिचय करून दिला. एकटेपणाचा, अलिप्तपणाचा आणि विरक्तीचा एक अतिशय मुलायम सूर असू शकतो याची जाणीव मला ग्रेसच्या सगळ्याच साहित्याने करून दिली. माझ्या बालपणीचं दुसरं दैवत म्हणजे पु.ल. देशपांडे. त्यांच्या लेखनात ग्रेसच्या लेखनात सापडणारे  हे असे कमळाच्या पानावरील थेंबासारखे भाव,  नेहमीच्या आयुष्यातून शोधून काढण्याची कला होती. पुलंचा नंदा प्रधान ग्रेसच्या कवितेतून बाहेर आलेल्या एखाद्या शापित गंधर्वासारखा भासतो. पण या दोन्ही कलाकारांची कला एकाच काळात वाचता आल्याबद्दल मला कुणाचे आभार मानावे असा प्रश्न पडतो कधी कधी.
बरेच वर्षं काहीही न समजता या कविता मी वाचल्या. आणि काही वर्षांपूर्वी अचानक एक एक कविता उमगू लागली. काही तशाच राहिल्या.
पण कवितेच्या अर्थापेक्षा सुंदरही कवितेत काय असू शकतं याची ओळख ग्रेसच्या काही कवितांमध्ये होते.

ही माझी प्रीत निराळी, संध्येचे श्यामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला, डोहातून बुडवून आणी
हाताने दान कराया, ओंजळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो, रातीरंगातील नि:संग
शपथेवर मज आवडती, गायींचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही, असणार कुठेतरी मूळ
आकाशभाकिते माझी, नक्षत्रकुळही दंग
देठास तोडतानाही, रडले न फुलाचे अंग!

ही सगळी कविता मला कशी पाठ झाली, का पाठ झाली आणी त्यातून मला काय अर्थबोध होतो हे मला अजूनही समजलेलं नाही. पण त्यांच्या कवितेतला प्रत्येक शब्द स्वत:चा कणा घेऊन येतो. त्याच्या अस्तित्वाला कवितेच्या आशयाची गरज नसते. आणी कधीतरी अचानक दोन विचारांच्या मधल्या रिकाम्या जागेत, कवितेला अर्थ फुटला, तरी तिची दिमाखदार शब्दसंपत्ती त्या अर्थापासून अलिप्त राहू शकते. ग्रेसची कविता अर्थासाठी नाहीच मुळी. आणि ती समजावून घेण्याचा आग्रहदेखील करत नाही. एखाद्या टपोर्‍या तजेलदार चांदणीसारखी ती स्वत:च्या शब्द सौंदर्‍यात मग्न आहे. तिच्याकडे आकर्षित होणारे तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण तिच्यातून चांदण्यासारखे पसरलेले अगणिक अर्थ त्यांना अगदी लहान करून टाकतात. कदाचित तिच्या प्रेमात पडणार्‍या प्रत्येकाला ती वेगळी समजते. आणि मग त्यांच्या कवितेलाच जणू, "तू तेव्हा तशी" म्हणावसं वाटतं. कधी आपल्या आनंदी मनाचा ठाव घेत ती ऐल राधा बनते नाहीतर कधी चौफेर पसरलेल्या पाचोळ्यातून चालणारी पैल संध्या होते.


कधी कधी ती इतकी नाठाळ होते की ती ज्या वाटेवरून जाते तोच तिचा मार्ग हे मान्य करून शरणागती पत्करावी लागते. "नको ऐकूस बाई! तुला काय करायचंय ते कर" असं म्हणून सोडून दिलं तरी पुन्हा तिच्या मागून जावसं वाटतं. आणि असा बरोबर प्रवास केल्यावर कधीतरी, आपण हिच्याबरोबर चुकलोय की काय अशी भीती वाटू लागते. पण ती ज्या वाटेवर नेते, त्या वाटेवर हरवून जाण्यातदेखील खूप काही सापडल्याची भावना आहे.

अनुभवांच्या तोडमोडीला भिऊन, तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यासाठी पठडीचा आश्रय
मग प्रेषितांच्या व्याथासुत्रांचे काय?
शरणमंत्रांनी आणि मुल्ला मौलवींच्या पहाट गजरांनी आवाजाची दुनिया घटकाभर स्तब्ध होत असेल
पण ती हादरून जात नाही.
मंत्रांमागचे प्रेषितांचे अनुभव हेच खरे मार्गदर्शक असतात
पठडीबाज गुरूंच्या अश्रायानी मार्ग तर सापडत नाहीच, उलट दिशाभूल होत राहते
अशी दिशाभूल नाकारणे वा स्वीकारणे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न!
पण नाकारल्याशिवाय अस्तित्वाला हादरे बसत नाहीत, आणि हादरे बसल्याशिवाय काही नवनिर्माण होऊच शकत नाही
ही दु:खवैभवाची संपन्नता!



गौतम बुद्धाच्या प्रवासाचं वर्णन करणारी जरी ही कविता असली तरी ग्रेसच्या कवितेचाही प्रवास बुद्धाच्या प्रवासासारखाच होता. कुणा दुसर्‍याच्या अनुभवानी सिद्ध झालेल्या मार्गावरून ती गेली नाही. तिने स्वत:चा तयार केलेला मार्ग हा फक्त आणि फक्त ग्रेसच्या अनुभवांशी प्रामाणिक आहे. हा प्रामाणिकपणा त्यांच्या कवितेला एक वेगळंच लावण्य बहाल करतो.
ग्रेसच्या कवितेतून शिकायला मिळालेली अजून एक गोष्ट म्हणजे एखाद्या मानवी भावनेकडे चारी बाजूंनी बघायची तिची सवय. ग्रेसच्या काही कविता वाचून असं वाटतं की या कवितेच्या मूळ भावनेला पुन्हा पुन्हा उकळून तिचा अर्क काढला असावा. आणी मग तो अर्क असा लीलया इकडे तिकडे सुगंधासारखा विखरून टाकला असावा. मत्सरावर बोट ठेवणारी ही कविता माझ्या खजिन्यात कायमची कैद झाली आहे :

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफडाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्णकळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीकप्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी --राधा
हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!


पुलंच्या गोष्टी वाचताना नेहमी असं वाटायचं की या अशा तरल भावना मला समजाव्यात म्हणून अंतू बर्वा नाहीतर नाथा कामत बनून आल्या आहेत. एखाद्या दिवशी देवानी सुट्टी घेऊन माणसाच्या रूपात यावं तसं पुलंचं साहित्य हसवता हसवता अचानक अंतर्मुख करून जायचं. पण ग्रेसची कविता समजण्यासाठी मात्र स्वत:च्या जडदेहातून थोडावेळ बाहेर पडून देवांच्या दुनियेत जावं लागायचं. अर्थात ते करण्यासाठी कष्ट करावे लागायचे यात वादच नाही. पण ग्रेस म्हणतात तसच:

काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे
जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर उजळे.

त्यांच्या कवितेच्या चांदण्यात उजळून निघायचं असेल, तर जीवाला  जाळणे अपरिहार्य आहे.

सखीच्या मुलीला कसे काय द्यावे
उन्हांतील हे भव्य शब्दांगण?
इथे चंद्र नाही इथे सूर्य येतो
स्वतः सावलीचा मुका साजण...

त्यांची कविता कितीही गूढ असली, अगम्य असली तरी आपल्या सगळ्यांना ग्रेसनी त्यांचं हे भव्य शब्दांगण देऊ केलं आहे.
माझ्या मनाची कित्येक दारं उघडून दिल्याबद्दल मी ग्रेसची कायम ऋणी राहीन.

Thursday, March 15, 2012

फॉर्म्युला काकू

लहान असताना नेहमी आयुष्य म्हणजे एक मोठ्ठीच्या मोठ्ठी फॅक्टरी आहे असं वाटायचं. अजूनही वाटतं.
आमच्या ओळखीत एक काकू आहेत. त्यांचं नाव मी फॉर्म्युला काकू ठेवलंय. फॉर्म्युला काकू ना, सगळ्यासाठी फॉर्म्युले तयार करतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे एकशेएक फॉर्म्युले त्यांच्याकडे आहेत. त्यांची मुलं शाळेत नेहमी खूप अभ्यास करायची. कारण खूप अभ्यास करणे हा त्यांच्या फॉर्म्युल्यातील मोठा घटक होता. तो नेहमी न्यूमरेटरमध्ये जायचा. त्यामुळे जितका जास्ती अभ्यास, तितकं जास्ती यश. आणि यात फक्त खूप अभ्यास करून मागल्या वर्षीपेक्षा जास्त मार्कं मिळवायचे अशी अट नव्हती. खूप अभ्यास करून मागल्या वर्षी जो पहिला आला होता, त्याच्यापेक्षा जास्त मार्कं मिळवायचे. आणि मग त्यांच्या आजूबाजूला जमणार्‍या सगळ्या सवंगड्यांपेक्षा ती किती पुढे आहेत यांचे अडाखेपण असायचे. आणि अभ्यास पण कसा? तर आठवीपासूनच दहावीच्या प्रश्नपत्रिका कशा असतात ते तपासून, त्याच साच्यात बसणारा अभ्यास करायचा. अवांतर अभ्यास बारावी नंतर. आणि मैत्री सुद्धा अभ्यासू मुलांशीच करायची. कारण ढ मुलांशी मैत्री केली तर ती डिनॉमिनेटरमध्ये जायची. आणि त्यामुळे आयुष्यातील अंतिम यशात कपात व्हायची.
नाटक, वक्तृत्व, वादविवाद वगैरे असायचे फॉर्म्युल्यात पण त्यांच्या आधी अपूर्णांकातले, एका पेक्षा कमी असलेले कोएफीशीयंट्स असायचे. त्यामुळे या गोष्टी खूप जास्ती केल्यानी आयुष्यातील अंतिम यशात फारसा फरक पडायचा नाही. आणि नेहमी या क्षेत्रात पुढे असलेल्या मुलामुलींचा अभ्यासाचा आकडा दाखवून, अभ्यास कसा श्रेष्ठ आहे याचं उदाहरण देण्यात यायचं. अवांतर वाचन अभ्यासाच्या आकड्यानुसार न्यूमरेटर नाहीतर डिनॉमिनेटर मध्ये जायचं. पण आठवीनंतर ते खालीच असायचं. दहावीनंतर भाषाकौशल्याला सुद्धा खालच्या मजल्यावर धाडण्यात यायचं. आणि आठवी ते दहावी सायन्सला जाणं कसं महत्वाचं आहे यावर खूप प्रवचन व्हायचं. त्यामुळे फॉर्म्युला काकूंची मुलं फॅक्टरीच्या असेम्बली लाईनवर छान टिकून राहिली. प्रत्येक व्यंगचाचणीतून फॉर्म्युला काकूंची मुलं अगदी माशासारखी सुळकन पुढे जायची. अशी कांगारूसारखी उड्या मारत मारत फॉर्म्युला काकूंची मुलं कुठच्या कुठे गेली! आम्ही बघतच राहिलो. आम्हीपण होतो फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्या सवंगड्यांमध्ये. पण आम्हाला तसा फारसा भाव नव्हता. कारण आम्ही नेहमी त्यांच्या आलेखाच्या मुळाशी बरोब्बर पंचेचाळीस अंशाचा कोन करून उड्डाण करणार्‍या त्या लायनीच्या खाली, नाहीतर वर असायचो. जिथे आम्ही वर असायचो ना, ती क्षेत्रं फॉर्म्युल्यात खाली असायची. आणि वर असलीच तर नगण्य असायची.
मग जशी जशी स्पर्धा वाढू लागली, तसं अर्थातच आमच्यात आणि फॉर्म्युला काकूंच्या मुलांच्यात असलेलं अंतर वाढू लागलं. फॉर्म्युला काकूंची मुलं नेहमी आमच्या पुढे असायची. आणि कधीही त्यांना भेटायला गेलं की आम्हाला सहानुभूतीपर भाषण मिळायचं. त्यात एकदा आयुष्यात अभ्यासातील यशाचा कसा कमी वाटा आहे यावर भाषण देताना, धीरुभाई अंबानींचं उदाहरण आम्हाला देण्यात आलं. मग अर्थात आमच्या नापास झालेल्या, दु:खी (पण चाणाक्ष) मनात असा विचार आला, की फॉर्म्युला काकू त्यांच्या मुलांना अंबानी व्हायला का नाही शिकवत? आणि कदाचित आपण इतके गटांगळ्या खातोय म्हणजे कधीतरी आपणही अंबानी होऊ शकू काय , अशीही एक सुखद शंका आली. पण फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात जोखीम पत्करणे हे भल्या मोठ्या लाल अक्षरात खालच्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावरच्या बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण कुठल्याही प्रकारची जोखीम घेणे म्हणजे काकूंचा फॉर्म्युला अस्थिर करण्यासारखं आहे. आणि यात त्या फॉर्म्युल्यातील इतर घटकांना तपासून बघण्याची जोखीमही धरलेली आहे. अशा प्रकारे फॉर्म्युल्याचा पाया अगदी पक्का करण्यात आलाय. फॉर्म्युला काकूंच्या गणितांनी बिल गेट्स किंवा अंबानीकडे नोकरी मिळवणे हे बिल गेट्स किंवा अंबानी होण्यापेक्षा जास्त यशस्वी मानलं जातं. याचं कारण म्हणजे फॉर्म्युला काकूंच्या स्पर्धेत अंबानी कुठेच येत नाहीत. कारण त्यांनी फॉर्म्युला काकुंचे सगळे नियम अगदी लहान वयातच झुगारून टाकले. पण याला फॉर्म्युला काकू नशीब असं गोड नाव देतात. आणि त्यांच्या मते नशीबवान नसणार्‍या माणसांनी अशी जोखीम पत्करू नये. आणि त्यांच्या मुलांनी मात्र काही झालं तरी पत्करू नये.
फॉर्म्युला काकूंची मुलं जेव्हा घासून, पुसून चकचकीत होऊन फॅक्टरीबाहेर पडली तेव्हा त्यांनी मोठ्ठा, हसरा श्वास घेऊन इकडे तिकडे पाहिलं. आणि त्यांचं यशस्वी फॉर्म्युला जीवन जगायला सुरुवात केली. पण आता करायला अभ्यास नव्हता आणि आजूबाजूला असलेली गर्दी वेगवेगळ्या क्षेत्रातून, देशांतून, भाषांतून आणि अनुभवांतून आली होती. त्यातील फॉर्म्युला काकुंसारख्या आयांची मुलं सोडता बाकी सगळ्यांनी वेगळेच मार्ग घेतले होते. काही जण फॉर्म्युला काकूंच्या मुलांपेक्षा लहान असूनही खूप पुढे गेले होते. काही जण खूप वेळा हरून आले होते. पण प्रत्येक तोट्याचा अभ्यास करून मस्त टगेपण बाळगून होते. काहीजण असं काही व्यक्तिमत्व घेऊन आले होते की फॉर्म्युला काकूंच्या लायनीच्या दोन्ही बाजूंचे लोक त्यांच्यामागून मंत्रमुग्ध होऊन चालू लागायचे. काही जण कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे. काही जण आयुष्यभर तपस्या करून निवडलेला मार्ग अचानक सोडून देणारे, आणि नवीन मार्गावर त्याहीपेक्षा वेगाने पुन्हा प्रगती करणारे. काही लोक फॉर्म्युला काकूंच्या फॉर्म्युल्यात कणभरही नसलेल्या एखाद्या गुणावर आयुष्य बहाल करणारे. कुणी जैविक भाजीवाला, कुणी सात्विक खानावळवाला, कुणी लोकांच्या भिंती स्वत:च्या कल्पनेनी रंगवणारा असे अनेक यशस्वी लोक बघून फॉर्म्युला काकूंची मुलं पार भांबावून गेली. आणि आयुष्यातल्या लहान अपयशानेदेखील त्यांना कानठळ्या बसू लागल्या.
फॉर्म्युला काकूंच्या सगळ्या फुटपट्ट्या खर्‍या जगात तुलनेसाठी अपुर्‍या पडू लागल्या. कारण खर्‍या जगातील सगळी खरी माणसं काही फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली नव्हती. आणि जी फॉर्म्युला काकूंच्या फॅक्टरीतून आली होती ती सगळी काहीतरी एकसारखं करत होती. पण फॉर्म्युला काकूंचा एक फॉर्म्युला मात्र खरा उतरला बरंका. त्यांच्या मुलांना खूप लवकर, खूप जास्ती पैसा मिळाला. लगेच काकूंनी त्यांना मिळालेला पैसा वाढवण्याचाही फॉर्म्युला दिला. आणि मग अभ्यासाची जागा पैशांनी घेतली.
फॉर्म्युला काकूंच्या सुना, जावई आणि मुलं यांनी इतर फॉर्म्युला दांपत्यांशी स्पर्धा सुरु केली. पण यामुळे काय झालं की फॉर्म्युला काकूंच्या मुलांसारख्या मुलांचा एक बुडबुडा तयार झाला. त्या बुडबुड्यात एक छोटी शाळाच तयार झाली जणू. आणि इतर फॉर्म्युला लोकांशी तुलना करता करता फॉर्म्युला मुलांचे फॉर्म्युला आई बाबा झाले. अणि असा एक मोठ्ठा संघ तुलना करण्यात मग्न झाल्यामुळे सगळेच हळू हळू दु:खी होऊ लागले. असं कसं बरं झालं? लौकिक यश विरुद्ध आनंद असा आलेख केल्यावर मात्र फॉर्म्युला लोक अत्यंत यशस्वी परंतु कमी आनंदी निघू लागले. आणि फॉर्म्युला काकूंना अचानक आपला फॉर्म्युला चुकला की काय असं वाटू लागलं. पण अर्थात त्यांनी हे कुण्णालाही बोलून दाखवलं नाही. पण आतल्या आतच त्यांना सारखी हुरहूर लागून राहिली. आपल्या मुलांनी तर सगळे बॉक्सेस टिक केले होते. मग त्यांना असं अपुरं अपुरं का वाटतंय?
पण काकूंचा फॉर्म्युला चुकला नव्हता. फॉर्म्युला यशस्वी आयुष्याचा होता. आणि तो त्याच्या सगळ्या परिमाणांवर चोख उतरला होता. पण काकूंचं एक असमशन चुकलं होतं. ते म्हणजे, या सगळ्या यशाच्या पलीकडे गेलं की आपण आनंदी होऊ. आणि दुसर्‍यांपेक्षा यशस्वी झाल्याने आपण त्यांच्यापेक्षा जास्त आनंदी होऊ. आनंद नेहमी भविष्यकाळात कुठेतरी मृगजाळासारखा धावत सुटणारा, कधीही हाताला न लागणारा पदार्थ आहे असं फॉर्म्युला काकूंचा फॉर्म्युला सांगतो. आणि अचानक धावता धावता धाप लागून असं लक्षात येतं, की आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करणारे, कुठल्याही प्रथापित गणितांना भीक न घालणारे, मनाला वाटेल ते, वाटेल तेव्हा आणि वाटेल तस्सं करणारे, अपयशाची फिकीर न करता हृदयाला भिडणर्‍या सागरात उडी मारणारे लोक कधी कधी जास्ती आनंदी असतात. कारण कदाचित आपली आता कुणाशीच तुलना होऊ शकत नाही, आणि कुणाच्याही तुलनेत आपण आनंदी किंवा दु:खी असू शकत नाही, या जाणीवेतच त्यांना आनंद मिळतो.